You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 15 कोटी रुपये जाहिरातींवर खर्च #5मोठ्या बातम्या
वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1) फडणवीस सरकारच्या काळात 15 कोटी रुपये जाहिरातींवर खर्च
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाच्या पाच वर्षांच्या काळात 15 कोटी 51 लाख रुपयांचा खर्चा जाहिरातीवर करण्यात आला. टीव्ही आणि रेडिओ वाहिन्यांवर जाहिरातीसाठी गेल्या पाच वर्षात दिवसाला 85 हजार सरकारी तिजोरीतून खर्च झाला.
माहिती अधिकारातून ही माहिती उघड झाली. RTI कार्यकर्ते नितीन यादव यांनी फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील जाहिरातींवरील खर्चाची माहिती मागवली होती. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
फडणवीस सरकारनं आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील 2017-18 या आर्थिक वर्षात जाहिरातींवर सर्वाधिक खर्च केला. या वर्षात टीव्ही वाहिन्यांवरील जाहिरातीसाठी सरकारी तिजोरीतून तब्बल 5 कोटी 99 लाख 97 हजार 520 रुपये मोजले, तर याच वर्षी रोडिओवरील जाहिरातींसाठी एक कोटी 20 लाख 69 हजार 877 रुपये मोजले.
2) CAA ला पाठिंबा, पण NRC लागू होऊ देणार नाही - उद्धव ठाकरे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) पाठिंबा दिलाय. मात्र, महाराष्ट्रात राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात NRC लागू होऊ देणार नाही, असंही स्पष्ट केलंय. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिलीय.
CAA मुळं देशातील कोणत्याही नागरिकाचं नागरिकत्व हिसकावून घेतलं जाणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र, ते पुढे म्हणाले, NRC लागू झाल्यास हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही धर्मातील लोकांना नागरिकत्व सिद्ध करणं कठीण होऊन बसेल आणि ते मी होऊ देणार नाही.
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, "आम्ही हिंदुत्व सोडलं नाहीय आणि कधीच सोडणार नाही. महाआघाडीचं सरकार स्थापन केलं म्हणजे धर्म बदलला असा अर्थ नाही."
तसंच, हिंदुत्वाच्या विचारधारेशी कुठलीच तडजोड आम्ही केली नाही, असा दावाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
3) महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर मद्यपान करण्यास बंदी
महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर मद्यपान करण्यास राज्य सरकारनं बंदी आणलीय. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तसा आदेशच काढलाय. लोकमतनं ही बातमी दिलीय.
गडकिल्ल्यांवर दारु पिऊन गोंधळ घातल्याची प्रकरणं गेल्या काही महिन्यांमध्ये समोर आली होती. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याविरोधात आवाज उठवला होता.
आता राज्याच्या गृहमंत्रालयानं गड-किल्ल्यांवर मद्यपानबंदी केलीय. तरीही गड-किल्ल्यांवर मद्यपान केल्यास 10 हजार रुपयांचा दंड आणि सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागेल.
4) काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी रुग्णालयात
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. नियमित तपासणीसाठी सोनिया गांधींनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.
सोनिया यांच्यासोबत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देखील आहेत. सोनिया गांधींना पाहण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते.
सोनिया गांधी आता 73 वर्षांच्या असून, त्या नियमित तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये जात असतात. त्याचाच हा भाग असल्याचे सांगितले जातंय.
5) निर्भया प्रकरण : 'दोषींना एक एक करुन फाशी द्यायला हरकत नाही'
दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणावर रविवारी दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी केंद्र सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी निर्भया प्रकरणातील दोषींना एक एक करुन फाशी देण्यास हरकत नसल्याचं म्हणणं मांडलं. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, "काहीतरी कारणं काढून आरोपी फाशी लांबवू पाहतायत. न्यायासाठी उशीर होता कामा नये. त्यामुळं ज्यांचे कायदेशीर पर्याय संपले आहेत, अशांना एक एक करुन फाशी द्यायला हरकत नाही. त्यांच्यासाठी सर्वांची शिक्षा लांबवण्यात येऊ नये."
कायद्यानुसार फाशीच्या 14 दिवस आधी दोषींना नोटीस द्यावी लागते. तुषार मेहता म्हणतात, "निर्भया प्रकरणातल्या दोषींना नोटीस दिल्यानंतर 13 व्या दिवशी एक दोषी कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करतो. हे सर्व दोषी शिक्षा पुढे ढकलण्याचं काम करतायत."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)