You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BBC Indian Sportswoman of the Year 2019 साठी 5 खेळाडूंना नामांकन
- Author, बीबीसी स्पोर्ट्स टीम
- Role, नवी दिल्ली
बीबीसीतर्फे पहिल्यांदाच देण्यात येणाऱ्या 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2019' या पुरस्कारासाठीची नामांकनं जाहीर करण्यात आली आहेत.
ही पाच नामांकनं आहेत:
- दुती चंद - अॅथलेटिक्स
- मानसी जोशी - पॅरा बॅडमिंटन
- मेरी कोम - बॉक्सिंग
- पी. व्ही. सिंधू - बॅडमिंटन
- विनेश फोगाट -फ्रिस्टाईल रेसलिंग
तुम्ही तुमच्या आवडत्या स्पोर्ट्सवुमनला बीबीसीच्या भारतीय भाषांच्या वेबसाईटवर जाऊन मत देऊ शकता.
बीबीसीच्या भारतीय भाषांच्या प्रमुक रूपा झा यांनी नामांकनांची घोषणा करताना म्हटलं, "भारतीय महिला इतिहास रचत आहेत. मात्र आजपर्यंत आपण त्यांना प्रोत्साहन दिलेलं नाही. अशा महिलांना त्यांची संधी देणं बीबीसीला महत्त्वाचं वाटतं, म्हणून आम्ही आज हा पुरस्कार घेऊन आलोय."
त्यांनी म्हटलं, "ज्यांना संधी मिळत नाही त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे आमच्यासाठी आणि बीबीसीसाठी खूप महत्त्वाचं आहे. बीबीसी नेहमीच या गोष्टीचा विचार करते आणि त्यासाठी कटिबद्ध आहे. त्यादिशेने हे आमचं पहिलं पाऊल आहे.
"तरुण महिलांचा आत्मविश्वास वाढवणं पत्रकारांची जबाबदारी आहे, असं मला वाटतं. म्हणून बीबीसी हे पुरस्कार घेऊन येत आहे," असं बीबीसीचे बिझनेस डेव्हलपमेंट प्रमुख, आशिया आणि पॅसिफिक प्रदेश, इंदुशेखर सिन्हा यांनी म्हटलं.
या 5 नामांकित खेळाडू कोण?
1.दुती चंद
वय-23, खेळ- अॅथलेटिक्स
द्युती चंद सध्या बायकांच्या 100 मी गटातील राष्ट्रीय खेळाडू आहे. 2016 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक्समध्ये 100 मी स्पर्धेसाठी निवडली गेलेली ती तिसरी भारतीय खेळाडू आहे.
2018 मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई खेळांमध्ये तिला सुवर्णपदक मिळालं होतं. 1998 पासून हे भारताचं पहिलं पदक होतं. द्युती विविध कारणांमुळे वादात सापडली असली तरी ती भारतातली उदयोन्मुख धावपटू आहे.
2.मानसी जोशी
वय- 30, खेळ- पॅरा बॅडमिंटन
स्वित्झर्लंड येथील बेसल मध्ये 2019 साली झालेल्या पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत मानसी जोशीने सुवर्णपदक जिंकलं.
पॅरा बॅडमिंटन या खेळात ती जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. आशियाई खेळात तिने कांस्यपदक मिळवलं होतं. 2011 मध्ये झालेल्या एका अपघातात तिला तिचा पाय गमवावा लागला. तरीही बॅडमिंटन खेळात नैपुण्य मिळवण्यापासून तिला कुणीही रोखू शकलं नाही.
3.मेरी कोम
वय- 36, खेळ- बॉक्सिंग
मांगटे चंगनेजांग मेरी कोम या नावाने ओळखली जाते. आठ जागतिक चॅम्पिअनशिप जिंकणारी ती एकमेव बॉक्सर आहे.
त्यापैकी सात स्पर्धांमध्ये तिला पदक मिळालं होतं. जागतिक हौशी बॉक्सिंग चॅम्पिअन स्पर्धेत सहा वेळा विजेतेपद पटकावणारी ती पहिली महिला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी मेरी कोम ही पहिली महिला आहे.
मेरी कोम सध्या राज्यसभेची खासदार आहे. जागतिक ऑलिम्पिक संघटनेतर्फे OLY ही बिरुदावली मेरी कोमला देण्यात आली आहे.
4.पी.व्ही. सिंधू
वय- 24 खेळ- बॅडमिंटन
गेल्या वर्षी पी.व्ही.सिंधू (पुरसुला वेंकट सिंधू) स्वित्झर्लंडमधील जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे.
आतापर्यंत तिने पाच जागतिक पातळीवरील स्पर्धा जिंकल्या आहेत. ऑलिम्पिक मध्ये सिंगल्स गटात सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे. 2012 मध्ये अवघ्या 17 वर्षी BWF च्या जागतिक वर्गवारीत सर्वौच्च 20 खेळाडूंमध्ये तिचा समावेश होता. गेल्या चार वर्षांत हे तिने हे स्थान टिकवलं आहे.
टोकियो येथे होऊ घातलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीयांना तिच्याकडून अनेक अपेक्षा आहेत.
5. विनेश फोगट
वय- 25 खेळ- फ्रीस्टाईल कुस्ती
पैलवानाच्या घराण्यातील सदस्या असलेल्या विनेश फोगट आशियाई स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली भारतीय पैलवान आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतही तिला दोन सुवर्णपदकं मिळाली आहेत. 2019 मध्ये कांस्य पदक मिळवत जागतिक पातळीवर तिने पदकं मिळवलं.
मतदानाविषयी सर्वकाही
हे मतदान 24 फेब्रुवारी 2020 च्या रात्री 11.30 वाजेपर्यंत करता येईल. विजेत्यांची घोषणा 8 मार्च 2020 ला एका कार्यक्रमात केली जाईल. वेबसाईटवर यासंबंधीचे सर्व नियम आणि अटींची माहिती दिली आहे.
बीबीसी स्पोर्टस् आणि भारतीय भाषांच्या वेबसाईटवरही हे निकाल जाहीर करण्यात येतील. ज्या खेळाडूला सर्वाधिक मतं मिळतील तिला 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' हा पुरस्कार देण्यात येईल.
भारतातील आघाडीचे खेळ पत्रकार, लेखक आणि तज्ज्ञांकडून या पाच खेळांडूंना नामांकन देण्यात आलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)