You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दीपा कर्माकरच्या पावलावर पाऊल टाकत चार सुवर्णपदकं जिंकणारी जिम्नॅस्ट प्रियंका
- Author, दिलीप कुमार शर्मा,
- Role, गुवाहाटीवरून, बीबीसी हिंदीसाठी
16 वर्षांची जिम्नॅस्ट प्रियंका दासगुप्ताने गुवाहाटीतील 'खेलो इंडिया' युवा क्रीडास्पर्धांमध्ये चार सुवर्णपदकं जिंकून उदयोन्मुख क्रीडापटू म्हणून लक्षणीय कामगिरी केली आहे.
भारताची प्रसिद्ध जिम्नॅस्ट दीपा कर्माकरप्रमाणे प्रियंकाही त्रिपुराचीच असून दोघींचे प्रशिक्षक बिशेस्वर नंदी हेच आहेत.
'खेलो इंडिया' युवा क्रीडास्पर्धांच्या तिसऱ्या पर्वात 17 वर्षाखालील वयोगटात जिम्नॅस्टिकच्या विविध प्रकारांमध्ये प्रियंकाने चार सुवर्णपदकं जिंकली. त्रिपुरासारख्या लहान राज्याच्या दृष्टीने हे मोठं यश मानलं जातं आहे.
10 जानेवारीपासून सुरू झालेल्या 'खेलो इंडिया' युवा क्रीडास्पर्धांमध्ये प्रियंकाचा अपवाद वगळता त्रिपुराच्या इतर कोणत्याही क्रीडापटूला अजून सुवर्णपदक मिळालेलं नाही.
प्रियंका या यशाचं श्रेय तिच्या पहिल्या प्रशिक्षिका सोमा नंदी, द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त प्रशिक्षक बिशेस्वर नंदी आणि विशेषतः तिची आई यांना देते.
गुवाहाटीतील भोगेश्वरी फुकनानी इन डोअर स्टेडिअममध्ये बीबीसीला दिलेल्या खास मुलाखतीत प्रियंका म्हणाली, "लहानपणी मी मस्तीखोर असल्यामुळे आणि धावपळ करायच्या स्वभावामुळे आईला मला स्पोर्ट्समध्ये टाकावंसं वाटलं. मग आईने मला जिम्नॅस्टिक शिकण्यासाठी अकॅडमीत पाठवलं. आता मला चांगली जिम्नॅस्ट म्हणून कामगिरी करायची आहे. त्यासाठी मी रोज सहा ते सात तास ट्रेनिंगमध्ये घालवते. आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धांमध्ये खेळून मेडल जिंकायचं, हे माझं लक्ष्य आहे. त्यानंतर मला ऑलम्पिकमध्ये खेळायचंय."
दीपा कर्माकरपासून प्रेरणा घेतली का, या प्रश्नावर प्रियंका म्हणाली, "जिम्नॅस्टिकबाबत दीपाताईची समर्पणवृत्ती आणि जिममध्ये कष्ट घेण्याचा तिचा स्वभाव, आम्हा सर्वांनाच प्रेरणादायी आहे. मला खऱ्या आयुष्यात कोणी भाऊ-बहीण नाही. आई-बाबांची मी एकुलती एक लेक आहे, म्हणून दीपाताई माझं सर्वस्व आहे. ती माझा आदर्श आहे. 'खेलो इंडिया' युवा क्रीडास्पर्धांमध्ये सुवर्णपदकं जिंकल्यावर पहिल्यांदा ताईने माझं अभिनंदन केलं, ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. माझे प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कारविजेते नंदी सर यांनी माझं अभिनंदन केलं, यानेही मला खूप आनंद झालाय."
घरातील वातावरण आणि आईवडिलांचा पाठिंबा, याबद्दल प्रियंका म्हणते, "आमच्या कुटुंबात मुलगी किंवा मुलगा असा काही भेदभाव नाहीये. माझ्या आईवडिलांनी कायमच मला पाठिंबा दिला, त्यामुळे मला सातत्याने माझी कामगिरी उंचावता येतीये. आमची घरची परिस्थिती गरीबीची आहे. माझे वडील टॅक्सी चालवतात. बाबा खूप मेहनत करतात. अनेकदा ते पहाटे पाचला घर सोडतात आणि रात्री उशिरा घरी परततात. मला त्यांच्याशी धड बोलायलाही मिळत नाही. ते घरी परततात तोपर्यंत मी झोपलेली असते. त्यामुळे या खेळातील माझं लक्ष्य मला माहीत आहे. मला पुढे जाऊन बरेच कष्ट करायचेत. त्याचबरोबर मला अभ्यासही सुरू ठेवायचाय. खेळाच्या नादाला लागल्याने मी शिक्षणात वाया गेले, असं कुणी माझ्या बाबांना बोलायला नको."
आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याशी संबंधित एका प्रश्नावर प्रियंकानं म्हटलं, "माझे प्रशिक्षक नंदी सर सांगतील तितके तास मी प्रॅक्टिस करेन. सर नेहमी एक गोष्ट सांगतात की, एका एलिमेन्टची एक हजार वेळा प्रॅक्टिस केली की त्यात आपण परफेक्ट होतो. 'खेलो इंडिया' स्पर्धांमध्ये ज्या चार प्रकारांमध्ये मी सुवर्णपदक जिंकलं, त्या प्रकारांचा सराव मी शेकडो वेळा केला आहे. नवीन एलिमेन्ट शिकताना डोक्याला इजा होण्याची थोडी भीती असते. पण नंदी सर इतकं चांगलं शिकवतात की, सगळं सोपं होऊन जातं. गेल्या वर्षी खेलो इंडियामध्ये मला तीन रौप्य पदकं मिळाली होती. तेव्हाच मी ठरवलेलं की, खूप मेहनत घेऊन या वर्षी सुवर्णपदक जिंकायचंच."
जिम्नॅस्टिक व्यतिरिक्त प्रियंकाला क्रिकेट बघायला आवडतं. ती म्हणते, "बहुतेकदा मी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टचे व्हीडिओ बघते. पण मला विराट कोहलीसुद्धा खूप आवडतात. विराट बॅटिंग करायला येतात, तेव्हा मी जोरदार चीअर करते. रिओ ऑलम्पिकसाठी दीपाताई पात्र ठरली, तेव्हा सचिन तेंडुलकर सरांनी तिचं अभिनंदन केलं होतं आणि स्तुतीही केली होती. ही खूप मोठी गोष्ट आहे."
विराट कोहलीने शुभेच्छा द्याव्यात, असं वाटतं का? या प्रश्नावर प्रियंका म्हणते, "अजून तर मी काही मोठं काम केलेलं नाही. मला आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक जिंकायचंय, मग कदाचित विराट सर माझं अभिनंदन करतील."
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधून आलेल्या मुलांसाठी सरकारने अधिक सुविधा पुरवाव्यात, अशी अपेक्षा प्रियंकाच्या पहिल्या प्रशिक्षिका सोमा नंदी यांनी व्यक्त केली.
त्या म्हणतात, "आमच्याकडे बहुसंख्य मुलं गरीब कुटुंबांमधून आलेली असतात. त्यांच्यात प्रतिभा असते, पण घरच्या परिस्थितीमुळे खेळात सातत्य राखणं त्यांना अवघड जातं. आपलं सरकार खेळाच्या बाबतीत खूप चांगलं काम करतंय. त्रिपुरामध्ये विशेषतः जिम्नॅस्टिकच्या प्रशिक्षणासंदर्भात जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. पण आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या पालकांना मुलांच्या शिक्षणाचा व खेळाचा खर्च एकत्र पेलणं थोडं अवघड जातं. अनेक प्रतिभावान मुलांचे वडील टॅक्सीचालक आहेत किंवा रिक्षाचालक आहेत. अशा गरीब कुटुंबांमधील मुलांना पुढे आणण्याची गरज आहे. मी आणि माझे पती अशा गुणवान मुलांना मदत करतो आहोत. येत्या काळात त्रिपुरामधून असे अनेक प्रतिभावान जिम्नॅस्ट पुढे येतील."
दीपा कर्माकर व प्रियंका यांच्या खेळातील साधर्म्याविषयी सोमा नंदी म्हणाल्या, "जिम्नॅस्टिक्सबाबत दीपाचा उत्साह सगळ्यांहून वेगळाच आहे. ती खूप जिद्दी आहे. कोणत्याही एलिमेन्टमध्ये परफेक्शन गाठेपर्यंत ती माघार घेत नाही. प्रियंकाही खूप गुणवान जिम्नॅस्ट आहे. पण तिला अजून समर्पित भावनेने प्रशिक्षण घ्यावं लागेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी तिला अजून मेहनत करावी लागेल. अजून तिचं वय तसं लहान आहे."
प्रियंकाच्या कुटुंबातील आर्थिक परिस्थितीविषयी त्या म्हणतात, "प्रियंकाच्या घरची परिस्थिती ठीक नाहीये. तिचे वडील टॅक्सी चालवून घरचं भागवतात आणि मुलीला जिम्नॅस्ट करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलं खेळण्यासाठी प्रियंकाला आर्थिक मदत लागेल. जिम्नॅस्टिकमध्ये पोशाखाव्यतिरिक्त चांगल्या आहारापासून ते इतर अनेक गरजा असतात. तिच्यात गुणवत्तेची अजिबात कमतरता नाहीये, पण घरच्या परिस्थितीमुळे तिचा खेळ थांबू नये."
प्रियंकाला दीपा कर्माकरसोबतच रिओ ऑलम्पिकमधील विजेतील जिम्नॅस्ट सिमॉन बाइल्स आणि रशियाची कलात्मक जिम्नॅस्ट आलिआ मुस्तफिना याही आवडतात. फावल्या वेळात प्रियंका या महान क्रीडापटूंचे व्हीडिओ पाहते, जेणेकरून तिला स्वतःच्या खेळात सुधारणा करता येतील.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)