Republic Day रामनाथ कोविंद अभिभाषण : 'संघर्ष करताना अहिंसेचा मार्ग विसरू नका' #5मोठ्याबातम्या

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. रामनाथ कोविंद : युवकांनी संघर्ष करताना अहिंसेचा मार्ग विसरू नये

"कुठल्याही प्रश्नावर लढताना सर्वानी विशेष करून युवकांनी अहिंसक मार्गाचाच अवलंब करावा," असा संदेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून केले.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (CAA) विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या अनुषंगाने कोविंद यांनी हिंसक मार्गाचा त्याग करण्याचे आवाहन केले. 'इंडियन एक्सप्रेस'नं ही बातमी दिली आहे.

"सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करताना घटनात्मक मूल्यांना बांधील असलं पाहिजे," असंही राष्ट्रपतींनी म्हटलं. महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या तत्त्वाची जाणीव करून देताना त्यांनी म्हटलं, ''गांधीजींनी कुठलीही कृती योग्य की अयोग्य यासाठी घालून दिलेला अहिंसेचा निकष आपल्या लोकशाही राज्यपद्धतीच्या कार्यालाही तितकाच लागू आहे.''

राष्ट्रउभारणीत गांधीजींचे आदर्श पाळणे गरजेचे असल्याचे सांगून त्यांनी म्हटलं, की सत्य आणि अहिंसेच्या गांधीजींनी घालून दिलेल्या मूल्यांच्या आधारे आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे.

2. अदनान सामीच्या 'पद्मश्री'ला मनसेचा विरोध

गायक अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार देण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करून अदनानला जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्काराचा तीव्र निषेध केला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीये.

अदनान सामी मूळ पाकिस्तानचा असल्याने त्याला पुरस्कार द्यायला मनसेचा विरोध आहे.

अमेय खोपकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, की मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये, हे मनसेचं ठाम मत आहे. त्यामुळे त्याला बहाल केलेल्या 'पद्मश्री' पुरस्काराचा मनसेकडून तीव्र शब्दात निषेध. अदनान सामीला जाहीर झालेला पद्म पुरस्कार त्वरित रद्द करण्यात यावा ही मनसेची मागणी आहे.'

3. 'एल्गार परिषदे'चा तपास आधीच केंद्राकडे का सोपवला नाही?- प्रकाश आंबेडकर

एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरण NIA कडे सोपविण्याच्या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. "एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा ही प्रकरणं राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित होती, तर त्याचा तपास तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच केंद्राकडे का पाठवला नाही," असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. लोकसत्तानं ही बातमी प्रसिद्ध केलीये.

'एबीपी माझा' वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ देत लोकसत्तानं ही बातमी दिलीये.

या बातमीत आंबेडकरांनी म्हटलं, की शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेचं मी स्वागत करतो. हे प्रकरण केंद्रानं NIAकडे दिलं आहे. हा एक प्रकारे मुख्यमंत्र्यांवर केंद्रानं दाखवलेला अविश्वासच आहे. त्यामुळे शिवसेनेनं प्रश्न उपस्थित केला नाही, तर केंद्र सरकार मनमानी करेल.

दरम्यान, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणात प्रकाश आंबेडकर हेच संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना वाचवत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे जर गुन्हेगार आहेत असं त्यांना वाटत होतं तर त्यांनी त्यांच्या साक्षीत तसा उल्लेख का केला नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला.

4. निर्भया : राष्ट्रपतींच्या दया अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला मुकेश सिंहचं आव्हान

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंहने राष्ट्रपतींच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुकेश सिंहचा दयेचा अर्ज फेटाळून लावला होता. हिंदुस्तान टाइम्सनं हे वृत्त दिलं आहे.

रामनाथ कोविंद यांच्या निर्णयाला मुकेशच्या वकिलांनी आव्हान दिलं आहे. 17 जानेवारीला मुकेश याचा दया अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला होता.

मुकेश सिंह याने तिहार तुरुंग प्रशानसाकडे दयेचा अर्ज दिला होता. तिहार तुरुंगामार्फत हा अर्ज दिल्ली सरकार, त्यानंतर दिल्लीचे उपराज्यपाल आणि मग केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत राष्ट्रपतींकडे गेला होता.

5. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून दीड कोटी वसूल करणारे टीसी

मध्य रेल्वेमधील एका तिकीट चेकरनं 2019 या वर्षात विनातिकीट प्रवास करणाऱ्या तब्बल 22 हजार 680 लोकांना पकडलं आहे. त्यांच्याकडून 1 कोटी 51 लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. मिंटनं ही बातमी दिलीये.

मध्य रेल्वेतील फ्लाइंग स्क्वॉडचा भाग असलेल्या तिकीट इन्स्पेक्टर एस. बी. गलांडे हे सर्वाधिक दंड गोळा करणारे कलेक्टर ठरले आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त मध्य रेल्वेच्या अन्य तीन तिकीट चेकर्सनंही प्रत्येकी 1 कोटी रुपयांची दंड वसुली केली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)