गगनयान : चंद्रावर जाणाऱ्या भारतीय अंतराळवीरांसाठी शिजलंय चिकन, मटण आणि बिरयाणी

    • Author, इमरान कुरैशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

गगनयन मोहिमेची तयारी करत असलेले भारतीय अंतराळवीर आता त्यांना चिकन करी आणि पालक करी किती मसालेदार हवी, हे ठरवणार आहेत. 2021 च्या गगनयान या समानव अंतराळ मोहिमेदरम्यान अंतराळवीर हेच जेवण सोबत नेणार आहेत.

म्हैसूरमधली संरक्षण खाद्यान्न संशोधन प्रयोगशाळेने (DFRL) अंतराळ मोहिमेसाठी 22 प्रकारचे पदार्थ तयार आहेत. यात हलके-फुलके स्नॅक्स, जास्त एनर्जी असलेलं जेवण, ड्राय-फ्रूट्स आणि फळं यांचा समावेश आहे.

हे खाद्यपदार्थ चाचणीसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (ISRO) पाठवण्यात आले आहेत.

इस्रोचे अध्यक्ष सिवन यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताच्या गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड केल्याची घोषणा केली होती. या अंतराळवीरांची बंगळुरूमधल्या इंस्टिट्युट ऑफ एव्हिएशन मेडिसीनमध्ये (IAM) तपासणी करण्यात आली होती.

हे चारही अंतराळवीर याच महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात प्रशिक्षणासाठी रशियाला रवाना होणार आहेत.

निवड झालेल्या अंतराळवीरांची ओळख मात्र गुप्त ठेवण्यात आली आहे.

अंतराळवीर चव चाखणार

DFRLचे संचालक डॉ. अनिल दत्त सेमवाल यांनी बीबीसीला सांगितलं, "खाण्याचे सर्व पदार्थ अंतराळवीर चाखून बघतील. कारण त्यांना हे जेवण कितपत आवडतं, हेदेखील महत्त्वाचं आहे. इस्रोची एक टीम हे जेवण तपासेल."

डॉ. अनिल दत्त सेमवाल पुढे सांगतात, "अंतराळवीरांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ बनवण्यात आले आहेत. हे पदार्थ गरम करून खाता येतील. भारतीयांना गरम जेवण आवडतं. जेवण गरम करण्यासाठी आम्ही एक उपकरणही देणार आहोत. या उपकरणात 92 वॉटच्या उर्जेवर जेवण गरम करता येईल. या उपकरणाने पदार्थ 70 ते 75 डिग्रीपर्यंत गरम होऊ शकतात."

"हे पदार्थ पोषक आहेत आणि वर्षभर टिकू शकतात. त्यांना (इस्रोला) मटन किंवा चिकन हवं आहे. आम्ही चिकन करी आणि बिरयाणी बनवली आहे. हे जेवण पॅकेटमधून काढून गरम करून खाऊ शकतो."

स्नॅक्ससाठी अननस आणि फणस दिला आहे. हा स्नॅक्सचा आरोग्यदायी पर्याय असल्याचं डॉ. सेमवाल सांगतात. अंतराळवीरांना देण्यात येणारं जेवण पूर्णपणे रेडीमेड आहे. उदाहरणार्थ सांबार आणि इडली. यात पाणी टाकून गरम करून खाऊ शकतो.

डॉ. अनिल दत्त सेमवाल सांगतात, "एका गोष्टीची मात्र काळजी घ्यायची आहे की पॅकेट उघडल्यानंतर तो पदार्थ 24 तासांत संपला पाहिजे. पदार्थ अर्धवट ठेवून नंतर खाता येणार नाही."

नासाच्या निकषांनुसार तयार केले पदार्थ

DFRL या संस्थेत अंतराळ मोहिमेसाठीचा प्रत्येक पदार्थ नासाच्या निकषांनुसारच तयार केला आहे. अंतराळवीरांनी खाद्यपदार्थाचं पॅकेट उघडल्यावर त्यांच्या आजूबाजूला जंतू असता कामा नये. अंतराळातील खाद्यापदार्थ्यांसाठी बरेच निकष असतात.

इस्रोला देण्यात आलेल्या खाद्यसामुग्रीत छोटे चमचे आणि प्लेट्स यांचा समावेश नाही, असं डॉ. सेमवाल यांनी सांगितलं.

DFRL ने 1984 साली अंतराळ मोहिमेवर जाणारे पहिले भारतीय राकेश शर्मा यांच्यासाठीही जेवण तयार केलं होतं. डॉ. सेमवाल सांगतात, "आमच्याकडे याची एक्सपर्टी आहे."

सियाचीन ही जगातली सर्वात उंच युद्धभूमी आहे. 1984 साली इथे भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धही झालं आहे. जगातल्या या सर्वांत उंच युद्धभूमीवर तैनात जवानांसाठी जे जेवण पाठवलं जातं, त्यापेक्षा अंतराळवीरांना देण्यात येणारं जेवण वेगळं असतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)