You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र कृषी दिन : 'शेतकरी बाप अपमान गिळून गप्प बसायचा, पण पोरगं गप्प बसणार नाही' - ब्लॉग
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
आज महाराष्ट्र शेतकरी दिन. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिन (1 जुलै) हा राज्य कृषी दिन म्हणून पाळला जातो. या निमित्ताने शेतकऱ्यांच्या स्थितीवर टाकलेला एक प्रकाशझोत.
माझं गाव विदर्भातल्या बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा तालुक्यात येतं. दिवाळीचा टाईम होता. एका दुकानात मी उभा होतो. माझ्यापुढे एक शेतकरी उभा होता.
बराच वेळ ताटकळत उभा राहिल्यांनंतर, 'शेठ आपलं पाहा लवकर,' असं तो शेतकरी दुकानदाराला म्हणाला.
त्यावर शेठ चिडला आणि म्हणाला, "लेका! वाट पाहून राहिला तर उपकार करून राहिला का? आमच्याकडून उधार नेता तेव्हा नाही का उशीर होत? घरी जाऊन कोणते कांदे निसायचे?"
शेठचं हे वाक्य ऐकून शेतकरी अजून मागे सरकला. मी त्या शेतकऱ्याच्या मागेच उभा होतो.
माझ्या शेजारीच गॉगल लावून एक पोरगं उभं होतं, त्याच्या एका हातात थैली होती. पुढचे 10 सेकंद शांततेत गेले आणि मग त्यानं बोलायला सुरुवात केली.
"शेठ, जरा व्यवस्थित बोला की माझ्या बापाशी. आता नगदीमध्ये किराणा माल नेतोय. तुम्ही आम्हाला उधारीत सामान देता, फुकटात नाही. जितकं देता त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं कमावलंय तुम्ही शेतकऱ्याच्या जीवावर. जरा अदबीनं बोला."
हे ऐकून शेठ नरमला, त्याचे डोळेच चमकले. शेतकऱ्याकडे पाहून शेठ म्हणाला, "अरे! हा तुझा पोरगा आहे का? बाळा तुझ्या बापाचे आणि आमचे जुने संबंध आहेत, जुना व्यवहार आहे आमचा. आम्ही असंच बोलत असतो."
यानंतर शेतकरी बापानं पोराला नमतं घ्यायला सांगितलं आणि ते बाप-लेक तिथून निघून गेले.
पण, मला हा प्रसंग शेतकऱ्यांच्या पुढच्या पीढीची चुणूक दाखवून देणारा वाटतो - शेतकरी बापाला अपमान गिळून गप्प बसायची सवय लागली असली, तरी पोरगं मात्र गप्प बसणार नाही.
दुष्टचक्र
शेतकऱ्यांच्या यापूर्वीच्या पिढ्यांनी शेतीसाठी त्यांच्या जमिनी गहाण ठेवल्या. पण त्यावेळेस त्यांना हे कळालं नाही की, त्यांनी फक्त जमिनीच नाही, तर जमिनींसोबतच स्वत:चा स्वाभिमान आणि अस्तित्वही गहाण ठेवलं होतं.
माझा बाप जेव्हा बँकेत कर्जासाठी चकरा मारायचा, तेव्हा त्याला चपरासीसुद्धा विचारायचा नाही. 10 टक्के कमिशन दिलं तर बापाच्या कर्जाची फाईल मंजूर व्हायची, त्याला बँकेबाहेरील चहाच्या टपरीवर चहा पाजला जायचा. त्याचे पैसेही माझाच बाप द्यायचा.
काय भावना असतील, तेव्हा बापाच्या मनात असा विचार जरी आला की अंगावर काटा येतो. 'बकरा खुद चल के आया कटने को,' अशी ही रीत.
दुसरा पर्याय असायचा सावकरी कर्जाचा. आजही गावागावांमध्ये 20 टक्के व्याजानं सावकार लोक सर्रास पैसे देतात. आता सावकारीचं स्वरूप तेवढं बदलत चाललंय.
खासगी फायनान्स कंपन्या आता 'आधुनिक सावकार' म्हणून समोर आल्यात. या कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालायला सुरुवात केलीय. पूर्वी हे काम गावातले सावकार करायचे, आता तेच काम या फायनान्स कंपन्या करत आहेत.
जमिनी गहाण ठेवून कर्ज मिळत नसेल, तर शेवटी घरातल्या लेकी-बाळीच्या अंगावरील सोनं तारण ठेवून कर्ज काढलं जायचं. हा तिसरा आणि शेवटचा पर्याय असायचा.
हे तिन्ही पर्याय वापरून शेती कसली जायची. आजही ती तशीच कसली जातेय. दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, शेतीविरोधी कायदे, यासारख्या कारणांमुळे शेतकरी कायम तोट्यात राहिले आहेत.
कधीच शेतीचे कायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाहीत. त्यांना शेतीचं अर्थशास्त्र समजून सांगण्यात आलं नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या आतापर्यंतच्या पीढ्या उधारीच्या जगण्यात अडकल्या आणि याच चक्रानं त्यांचा स्वाभिमान हिरावून घेतला.
पण आपल्या पुढच्या पीढीनं यात अडकू नये, म्हणून शेतकरी माय-बापांनी उरल्या-सुरल्या जमिनी विकून अथवा गहाण ठेवून पोराबाळांना शिकवायला सुरुवात केली. तुम्ही कोणत्याही शेतकऱ्याच्या पोराला विचारा, तो बापासारखं शेतकरी व्हायचं म्हणून कधीच सांगणार नाही. कारण त्यानं त्याच्या बापाचं जिवंतपणी मरण अनुभवलेलं असतं.
आकडेवारीही तसंच सांगते. Centre for Study of Developing Societies (CSDS)नं 2018मध्ये देशातल्या 18 राज्यांमधील 5 हजार शेतकरी कुटुंबाचं सर्वेक्षण केलं, त्यानुसार 76 टक्के शेतकऱ्यांनी शेती सोडायची इच्छा व्यक्त केली.
वावर म्हणजेच पॉवर?
आता शेतीची धुरा याच शिकल्या-सवरलेल्या शेतकऱ्यांच्या पोरांवर आहे, तरुण शेतकऱ्यांवर आहे. लाचारीचं जीनं जगत राहायचं, आत्महत्यांची आकडेवारी बघून हतबल होत राहायचं, की 'वावर म्हणजे पॉवर आहे,' हे सिद्ध करून दाखवायचं आणि शेतकऱ्यांचं वैभव, त्यांचा स्वाभिमान परत मिळवायचा, हे या पोरांना ठरवायचं आहे.
आपल्या पूर्वजांच्या चुकांची पुनरावृत्ती न करता स्वत:ला शेतकरी म्हणून सक्षम करायचं आहे. शेतकऱ्याचं एक सकारात्मक चित्र निर्माण करण्यासाठी शेतीच्या फायद्याचे कायदे आणि अर्थशास्त्र शिकून त्याच्या अंमलबजावणीसाठी झगडायचं आहे.
आणि आजची शेतकऱ्यांची पोरं या दिशेनं जात आहेत, असं मला वाटतं. आज जेव्हा-केव्हा मी बातम्यांसाठी गावोगावी फिरतो, तेव्हा आम्हाला आमच्या घामाचा दाम द्या, आमच्या मालाला भाव द्या, अशी मागणी तरुण शेतकरी करताना दिसताना. तुम्ही मालाला भाव द्या, कर्जमाफी द्यायची गरज पडणार नाही, असं ठासून सांगतात.
या पोरांचा मीडियावर प्रचंड राग आहे. ज्या शेतकऱ्याची राज्यात सर्वाधिक संख्या आहे, त्याच्या बातम्या सर्वांत कमी कशा काय, असा प्रश्न ही मंडळी विचारतात. खरंच आहे त्यांचं.
लक्षपूर्वक पाहिलं तर शेतकऱ्यांना मीडियात फक्त दोनदा जागा मिळते - एखादा शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा, किंवा कर्जमाफी जाहीर होते तेव्हा. यापल्याड मीडियाला शेती-मातीच्या प्रश्नांशी काही घेणं-देणं असल्याचं दिसत नाही.
आकडेवारीही तसंच सांगते. भारतात जवळपास 12 कोटी शेतकरी राहतात. पण इंग्रजी वर्तमानपत्रांत शेतीविषयक बातम्यांच्या रिपोर्टिंगचं प्रमाण केवळ 0.6 टक्के इतकं आहे.
पण मीडिया दाखवत नाही म्हणून शेतकऱ्यांच्या पोरांनी आपलं म्हणणं थांबवलं नाही. सोशल मीडियाचा वापर ते आपले प्रश्न मांडण्यासाठी करत आहेत. आपले प्रश्न आपणच मांडायचे आणि ठासून मांडायचे. भूतकाळात सहन केलं, पण आता आवाज चढा असेल, असं ही मंडळी यातून सांगत आहेत.
म्हणूनच "आमच्या शेतकरी बापाशी जरा अदबीनं बोला," हे त्या पोराचं वाक्य मला आजच्या याच तरुण शेतकऱ्यांच्या मनातील खदखदीचं प्रतिनिधित्व करताना दिसतं. या सगळ्या पोरांना आपल्या शेतकरी बापाला स्वाभिमान परत मिळवून द्यायचाय, आपल्या जीवावर शेठ झालेल्या पुढच्या माणसाला आमच्याशी अदबीनं बोल म्हणून सांगायचंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)