अवकाळी पाऊस: शेकूबाई आणि आदिवासींना वनजमीन मिळाली, पण पावसानं पीक सडवलं

    • Author, निरंजन छानवाल
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

रक्तबंबाळ पायांनी शेतकरी लाँग मार्चमध्ये नाशिकहून मुंबई गाठणाऱ्या शेकूबाई आठवतात? जून महिन्यात त्यांना वनजमिनीचा हक्काचा एक एकरचा तुकडा तर मिळाला, पण हा आनंद त्यांना जास्त काळ टिकवता आला नाही.

शेकूबाईंनी मोठ्या आशेने लावलेलं सोयाबीनचं पीक अवकाळी पावसानं सडलं. सोंगून ठेवलेल्या सोयाबीनच्या ढिगाकडं हताश नजरेनं पाहण्याशिवाय त्यांच्याकडे कुठलाच पर्याय नाही.

66 वर्षांच्या शेकूबाई (उर्फ छबूबाई) वागले रक्तबंबाळ पायांनी चालत असल्याचं महाराष्ट्राने गेल्या वर्षी पाहिलं होतं. 2018 सालचा मार्च महिना होता तो. शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी होऊन त्या नाशिकमधल्या गावापासून मुंबईपर्यंत अनवाणी चालल्या होत्या.

कैक वर्षांपासून वनजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनी मार्च 2018मध्ये नाशिक ते मुंबई असा शेतकरी लाँग मार्च काढला होता. या मोर्चात 66 वर्षांच्या शेकूबाई सहभागी झाल्या होत्या. सरकारने आश्वासन देऊनही वर्षभरानंतरही त्यांना जमीन मिळाली नाही.

वर्षभरानंतर बीबीसी मराठीने त्यांना शोधून काढलं. ज्या जमिनीच्या तुकड्यासाठी त्या अनवाणी पायाने मुंबईत आल्या होत्या ती जमीन त्यांच्या नावावर अद्यापही झालेली नसल्याची माहिती मिळाली. बीबीसी मराठीने या बातमीचा पाठपुरावा केल्यानंतर नाशिकमधल्या प्रशासनाने शेकूबाईंच्या प्रकरणाचा शोध घेऊन एक एकर जमिनीचा तुकडा त्यांच्या नावावर केला.

पावसाचा फटका

महाराष्ट्रात एकीकडे सरकार स्थापनेचा खेळ सुरू असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातलाय. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागांना याचा सर्वाधिक फटका बसला.

टेकड्यांनी वेढलेल्या मुरमाड जमिनीवर शेतीचे काही तुकडे. त्यात माजलेलं गवत. आजूबाजूचा परिसर द्राक्षांच्या बागांनी वेढलेला. अधून-मधून डोकावणारी उसाची शेती. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वरखेडा गावाचा हा परिसर.

दिंडोरी तालुका हा द्राक्ष बागांसाठी ओळखला जातो. अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांच्या नुकसानीची चर्चा सर्वत्र असताना मी दिंडोरी तालुक्यातलं वरखेडा गाठलं. याआधीही लोकसभा निवडणुकीच्यावेळी मी शेकूबाईंना शोधत इथं आलो होतो. त्यानंतर जून महिन्यात पन्नास वर्षांहून अधिक काळ कसणाऱ्या शेकूबाईंच्या नावावर हा तुकडा झाला.

आदिवासी कुटुंबांना घरकुलात मिळालेल्या घरांच्या गल्लीतच शेकूबाई भावासोबत राहतात. त्या परित्यक्ता आहेत. अंगणात बसलेल्या शेकूबाईंनी मला ओळखलं. तोच सुरकुतलेला चेहरा. कपाळावरून मागे गेलेली केसांची पांढरी बट.

शेकूबाईंची बहीण आणि मेहुणे बाजूलाच राहतात. त्यांच्याच घरात शेकूबाईंनी मला नेलं. मोठ्या कौतुकाने त्यांनी सरकारकडून जमीन मिळाल्याचं प्रमाणपत्र मला दाखवलं. लॅमिनेशन केलं होतं ते.

'पावसाला दमच नाही'

"पाय कसा आहे आता?" मी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी तळपायाला जखमांमुळे पडलेले खड्डे दाखवले.

"काय पेरलं होतं यंदा?" मी त्यांना प्रश्न केला. "एक पिशवी सोयाबीन लावल्तं. काही उतरली (उगवली) तर काही पाण्यानं सडून गेली. खत टाकलं होतं. त्यानं गवत माजलं. पावसाला दमच नाही. निंदता आलं नाही," शेकूबाई सांगत होत्या.

गेल्या वेळेस सुद्धा त्यांनी सोयाबीन लावलं होतं. पण पाऊस न झाल्यानं हातात फार काही पडलं नाही. यावेळेस जास्तीचा पाऊस झाला आणि पुन्हा हाती निराशा आली.

मोर्चादरम्यान पायाला जखम झाल्याने उपचारासाठी शेकूबाईंनी नथ गहाण ठेवली होती. उपचाराचे पैसे तर फिटत आले पण नथ यंदाही सोडवता येणार नाही याचं दुःख त्यांना होतं.

"तेराशे रुपयाची सोयाबीनची बॅग आणल्ती. जावयानं पेरणीसाठी मदत केल्ती. महागामोलाचं खत टाकलं. पण पावसानं दमच धरला नाही. निंदता आलं नाही म्हणून गुडघाभर गवत झालं. एक एक काडी वेचून सोयाबीन सोंगती.

"तशीच शेतात जाती. एकट्यान जमलं तेवढं करती. एका हातानंच सोयाबीन सोंगत होती. अजूनपण शेतात सोयाबीन उभंय. सोंगून ठेवलेली सोयाबीन सडू लागलीये," शेतात रचून ठेवलेल्या ढिगाकडं पाहत शेकूबाई सगळं सांगत होत्या.

शेताच्या मध्यभागी ताडपत्रीनं झाकलेला एक ढिग होता. त्यावर गवत टाकलेलं होतं. थोडीशी ताडपत्री बाजूला करून शेकूबाईंनी ढिगात हात घातला. हाताला लागली ती काळी पडलेली सोयाबीन. ओलीच होती.

आदिवासींच्या वनजमिनींचे पंचनामे कधी?

शेतात सगळीकडे गवत पसरलेलं होतं. त्यात कुठेतरी एखाद दुसरी सोयाबीनची काळी पडलेली काडी दिसायची. लगडलेल्या दोन-चार शेंगा.

शेकूबाई यांच्या शेजारीच रतन बेंडकुळे यांचा एक एकर जमिनीचा तुकडा आहे. तेही गेल्या वेळेस मुंबईला निघालेल्या शेतकरी लाँग मार्चमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या नावावर वनजमिनीचा हा तुकडा तर झाला, पण त्यांचीही अवस्था शेकूबाईंसारखीच आहे.

सडत चाललेलं सोयाबीन दाखवत रतन बेंडकुळे म्हणाले, "सोयाबीन, भुईमुग नगदी पीक असल्यानं आम्ही लोक हेच पीक घेतो. यंदा पावसानं मात्र घात केला. काहींच्या हाती थोडंफार भुईमुग लागलं. तेवढंच ते काय."

भूईमुंगाच्या शेंगानाही कोंब निघू लागले आहेत.

शेकूबाईंनी सोयाबीनबरोबरच शेताच्या बांधानं भगर (वरीचे तांदूळ) लावलेली होती. अर्धअधिक पीक पाखरांनी खाऊन टाकलं. जे काही तग धरून उभं होतं, ते पावसानं आडवं झालं.

खडकाळ आणि मुरूमाडाच्या या शेतजमिनींच्या चोहोबाजूंनी द्राक्षाच्या बागा होत्या. द्राक्षाची बागायती शेती असल्याने त्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली. त्याच वेळी थोडंफार पीक तरी हाताला लागेल या आशेने शेतात राबणाऱ्या या आदिवासींच्या आशा सरकारच्या पंचनाम्याकडे लागले होते.

शेकूबाईंना आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पंचनाम्याविषयी विचारलं असता त्यांनी अद्याप पंचनामे झाले नसल्याचे सांगितलं.

ज्या तलाठी कार्यालयात शेकूबाईंचा शोध घेत मी गेल्यावे वेळेस पोहोचलो होतो, तिथं पुन्हा गेलो. तलाठी सज्जात कोतवाल होते. त्यांना तलाठी कुठे गेले म्हणून विचारले तर त्यांनी पंचनामे सुरू असल्याचे सांगितले. नजिकच्याच परमुरी गावात ते पंचनामे करत असल्याचं कोतवालांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)