You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे सरकार : नितीन राऊत यांना प्राधान्य देऊन काँग्रेसनं जातीय-प्रादेशिक समीकरण साधलं?
शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ तर काँग्रेसकडून डॉ. नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात यांनी शपथ घेतली.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रत्येक पक्षातील दोन नेते शपथ घेतील हे निश्चित झाल्यानंतर काँग्रेसकडून मंत्रिपदासाठी बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा पहिल्यापासून सुरू होती. मात्र दुसरं नाव कोणतं असेल याबद्दल सस्पेन्स कायम होता.
सुरुवातीला माध्यमांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव चर्चेत येऊ लागलं. मात्र नंतर काँग्रेसकडून अधिकृतपणे नितीन राऊत यांच्या नावाची घोषणा झाली.
डॉ. नितीन राऊत हे यापूर्वीही आघाडी सरकारच्या काळात मंत्री होते. मात्र मुख्यमंत्र्यांसोबत पहिल्यांदा शपथ घेणाऱ्या मंत्र्यामध्ये काँग्रेसनं डॉ.नितीन राऊतांचा समावेश कसा केला? पक्षातील दिग्गज नेत्यांना डावलून राऊतांना प्राधान्य देण्यामागे काँग्रेसची नेमकी काय गणितं आहेत? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीनं केला.
नितीन राऊतांची राजकीय कारकीर्द
डॉ. नितीन राऊत हे उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. रिपब्लिकन चळवळीचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर नागपूरमधून डॉ. नितीन राऊत हे 1999, 2004 आणि 2009 साली विधानसभेवर निवडून आले होते.
2014 च्या निवडणुकीत मात्र भाजपच्या डॉ. मिलिंद माने यांनी नितीन राऊतांचा पराभव केला. यंदाच्या निवडणुकीत नितीन राऊत पुन्हा एकदा निवडून आले.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये त्यांनी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री, गृह राज्यमंत्री, जलसंवर्धन मंत्री म्हणून काम पाहिलं होतं.
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसनं बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करताना पाच कार्यकारी अध्यक्षांचीही नेमणूक केली होती. त्यामध्ये डॉ. नितीन राऊत यांच्या नावाचा समावेश होता.
डॉ. नितीन राऊत हे काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे प्रमुखही आहेत.
'मागासवर्गीय, वंचित समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न'
"नितीन राऊत हे काँग्रेसच्या अनुसुचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मागील तीस वर्षांपासून भाजपची साथसंगत करणारी शिवसेना नव्या सरकारचे नेतृत्व करणार आहे. त्यांची आक्रमकता लक्षात घेतली तरी मागासवर्गीयांच्या प्राधान्यक्रमाचे विस्मरण आम्हाला झालेले नाही असे स्पष्ट संकेत काँग्रेसश्रेष्ठींनी राऊतांच्या प्रारंभीच्या समावेशातून दिले आहेत," असं महाराष्ट्र टाइम्सच्या विदर्भ आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजित यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.
"तळागाळातील समाजामधील शंकानिरसनाची काळजीही त्यातून घेण्यात आली आहे. एकतर नितीन राऊत हे दीक्षाभूमी असलेल्या शहराचे प्रतिनिधित्व करतात. दुसरे म्हणजे केंद्रीय सत्तेचा तसेच आजवर महाराष्ट्रात असलेल्या सरकारचा रिमोट ज्या महानगरात असल्याचे बोलले जाते, त्या प्रदेशातून त्यांची सरशी झाली आहे. हे स्थानमहात्म्य देखील त्यांना शपथविधीत मिळालेल्या बढतीमागे निश्चितच आहे. शेतकरी आत्महत्यांमुळे हळहळणाऱ्या विदर्भातील एक कर्तबगार नेतृत्वाला संधी देण्याचीही काँग्रेसची भावना असावी," असंही अपराजित यांनी म्हटलं.
जातीय-प्रादेशिक समीकरण साधलं?
उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीच्या दिवशीच नितीन राऊत यांनाही शपथ देण्यामागे काँग्रेसनं दोन गोष्टींचा विचार केलेला असू शकतो, असं लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक गजानन जानभोर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
"एक म्हणजे 2014 मध्ये आंबेडकरी, दलित समाज काँग्रेसपासून दूर गेल्याचं चित्र होतं. 2019 मध्ये लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीत तो काही प्रमाणात काँग्रेसकडे वळलेला दिसला. त्यामुळे त्या समाजात आश्वासक संदेश देण्यासाठी काँग्रेसनं नितीन राऊत यांना पहिल्या दिवशी शपथविधीसाठी प्राधान्य दिलं असावं. कारण आंबेडकरी चळवळीत नितीन राऊतांचं योगदान मोठं आहे. ते त्यांच्या विचारांशी प्रामाणिक आहेत," असं गजानन जानभोर यांनी म्हटलं.
जानभोर यांनी सांगितलं, "दुसरी गोष्ट म्हणजे नितीन राऊत यांच्या निवडीतून आपण विदर्भाला प्राधान्य देत आहोत, हेदेखील काँग्रेसनं अधोरेखित केलं. कारण मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदासह अर्थ, वित्त, ऊर्जा यांसारखी महत्त्वाची खातीही विदर्भाकडे होती. दुसरीकडे शिवसेनेवर विदर्भाला उपेक्षित ठेवल्याचा आरोप होतो आणि या सरकारमध्येही असंच होईल, अशी भावना विदर्भातील जनतेच्या मनात होती. पण नितीन राऊतांच्या निवडीमधून काँग्रेस आणि शिवसेनेनं आम्ही विदर्भाला प्राधान्यानं प्रतिनिधीत्व देत आहोत, हा संदेशही दिला."
नितीन राऊत यांची निवड केवळ जातीय आणि प्रादेशिक समिकरणांच्या आधारे झालेली नाही, हे सांगताना गजानन जानभोर यांनी म्हटलं, की नितीन राऊत काँग्रेसमधील सीनिअर नेते आहेत. चौथ्यांदा आमदार झाले आहेत. त्यांनी आघाडी सरकारमध्ये यापूर्वीही मंत्रिपदं भूषवली आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)