You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाही', हे कळल्यावर जेव्हा शेतकऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न
- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
महाराष्ट्र राजकारणाचं महानाट्याचा अंतिम अंक सुरू झाला आहे, असं सध्यातरी म्हणता येईल. उद्धव ठाकरे यांच्या नावावर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब झालं आहे.
अनेक नाट्यमय वळणं पाहिलेल्या गेल्या महिन्याभरात महाराष्ट्राची जनता हैराण झाली आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटरवरच्या मीम्समधून लोक व्यक्त होत आहेत. राजकीय पक्ष आणि आमदारांच्या या रस्सीखेचात कार्यकर्ते तसंच सामान्य माणूस किती त्रस्त झाला आहे, हे यातून दिसून येतं.
मात्र काही लोकांनी या घडामोडींचा जरा जास्तच धक्का बसलेला दिसतोय.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न झाल्याने शिवसैनिकाचा आत्महत्येचा प्रयत्न
22 नोव्हेंबरच्या रात्री उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून तिन्ही पक्षांनी निश्चित केलं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. मात्र त्यानंतर अवघ्या 16-17 तासांमध्ये पारडं फिरलं.
23 नोव्हेंबरच्या सकाळी आठ वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून तडकाफडकी शपथ घेतली. अगदी माध्यमांनाच हा धक्का बसला तर मग सामान्यांना तर तो सहन न होणं सहाजिक होतंच, विशेषतः जर ते शिवसैनिक असतील तर.
राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा, यासाठी वाशीमच्या एका शिवसैनिकाने हातावर धारदार पात्याने वार करून स्वतःला जखमी केलं. दिग्रसच्या शिवाजी चौकात हा थरार अनेकांनी अनुभवला.
रमेश जाधव असं या शिवसैनिकाचं नाव आहे. व्यवसायाने शेतकरी असलेले रमेश जाधव मूळ वाशिम जिल्ह्यातील उमरीगड येथील रहिवाशी आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असल्याचं त्यांना एक दिवसापूर्वीच कळालं होतं. आता कास्तकारांचे चांगले दिवस येतील, असा विचार करून ते प्रचंड खुश होते.
मात्र सकाळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याची बातमीने ते चांगलेच संतापले. या बातमीने "गोरगरिबांचा, शेतकऱ्यांचा कुणीच वाली राहिलेलं नाही आणि शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही," असं त्यांना वाटलं आणि त्यांनी आपल्या हातावर वार केले.
मात्र आसपास उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं आणि त्यांचा जीव वाचला.
"मी एक गरीब कास्तकार आहे, कर्जाने त्रासलो आहे. जेव्हा मला कळालं की आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार तेव्हा मला खूप आनंद झाला. असं वाटलं की आपली दुःखं आता संपणार. पण जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्याचं कळालं, तेव्हा मला धक्काच बसला. उद्धव ठाकरे मुख्यंमंत्री व्हावे म्हणून मी खूप प्रयत्न केले आहेत आणि ते जर मुख्यमंत्री झाले नाहीत तर आत्महत्या करणार असं मी ठरवलं होतं. आणि म्हणूनच मी ब्लेडने माझ्या अंगावर वार करून घेतले."
वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, "रमेश जाधवांच्या मदतीला शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख धावलेत. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे, अशी उद्धव साहेबांची इच्छा होती, तसंच धोरण त्यांनी आखलं होतं.
"उद्धवजी मुख्यमंत्री व्हावेत ही सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची इच्छा आहे. आणि तसं होताना दिसलं नाही म्हणून रमेश जाधवांनी हे आत्मघातकी पाऊल उचललं. पण माझी सगळ्या शिवसैनिकांना तसंच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की काहीही असलं तरी असं पाऊल उचलू नका."
'मला धक्का बसलाय, मला सुटी द्या'
चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूरच्या सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात सैय्यद जहीर इंग्रजीचे शिक्षक आहेत. गेल्या 20 वर्षांपासून ते शिक्षकी पेशात आहेत.
त्यांनी मतदान केंद्रावरही केंद्र अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे, म्हणजे महाराष्ट्रातील अनेक निवडणुकांमध्ये आजपर्यंत त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग नोंदवला आहे. मात्र महाराष्ट्रातला राजकीय भूकंप त्यांनी पहिल्यांदा अनुभवला.
महाविकासआघाडीची सत्ता यायच्या आधीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा सैय्यद जहीर या शिक्षकाला जोरदार धक्का बसला, असं त्यांचं म्हणणं आहे.
"आपल्या या नव्या सत्तासमीकरणाचा धक्का बसला असून त्यातून सावरण्यासाठी आपण रजेचा अर्ज करत आहोत," असं मुख्यध्यापकांना दिलेल्या अर्जात त्यांनी म्हटलं आहे.
जहिर यांचा सुटीचा अर्ज मुख्याध्यापक दत्तात्रय चौधरी यांनी अमान्य केला. ते म्हणाले "सुटीच्या अर्जाच कारण पाहून मी आधी चक्रावून गेलो. गमतीने हा अर्ज मला दिला असेल असं सुरुवातीला वाटलं. मात्र जहिर सुटीच्या अर्जावर गंभीर होते.
"आधी त्यांना खुर्चीवर बसवलं. 'राजकीय भूकंप हा राजकारणात आलाय, आपण नोकरदार आहोत, आणि आपण आपलं काम करायचं. राजकारणी राजकारण्यांचं काम करतात, आपण आपलं काम करायचं,' अशी समज देऊन त्यांना वर्गात पाठवलं. मात्र सुटीचा अर्ज त्यांनी व्हायरल कधी केला, हे कळलंच नाही," चौधरी सांगतात.
महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्न आणि शेतकऱ्यांना वेळीच मदतीसाठी जहीर यांना स्थिर सरकार हवंय. सरकार कोणतही असो ते स्थिर असायला हवं. सध्या स्थितीत स्थापन झालेले सरकार गोंधळलेलं आहे, अस जहीर यांचं म्हणणं आहे.
ते म्हणतात "पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना शोभत नाही. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या, मध्यमवर्गीयांची अवस्था बघता विकासाच्या दृष्टिकोनातून पाच वर्षं चालणारी स्थिर सरकार महाराष्ट्राला अपेक्षित आहे.
"एका रात्रीतून महाराष्ट्रातल्या घडामोडी बदलत चालल्या आहे. एका रात्रीतून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतात. या सगळ्या घडामोडी आमच्यासाठी अनपेक्षित आहेत. पहिल्या दिवशी सत्तास्थापनेचा दावा वेगळ्या पक्षाने केला असतांना सकाळी दोन वेगळे पक्ष शपथ घेऊन मोकळे होतात. अच्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी या घटना व्यथित करणाऱ्या आहेत," जहीर नमूद करतात.
जहीर यांचा रजेचा अर्ज व्हायरल झाल्यानंतर जहिर यांना अनेक फोन आलेत. "या अर्जामुळे मला इतके फोन येतील अशी अजिबात अपेक्षा नव्हती. तो अर्ज व्हायरल झाल्यानंतर काही लोकांनी शुभेच्छाही दिल्यात, तर काहींनी आमचा आवाज इतरांपर्यंत पोहचवल्याबदद्ल अभिनंदनही केलं," जहीर म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)