अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी, राजकीय हालचालींना वेग

राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात प्रमुख पक्षांच्या बैठकी आणि गाठी-भेटींचं सत्र सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांची भेट घेतली.

दुसरीकडे, अजित पवार यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांचे आभार मानणारे ट्वीट केल्यानं पुन्हा राजकीय तर्क-वितर्कांना सुरूवात झाली.

राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भातील राज्यपालांकडे सादर करण्यात आलेली कागदपत्रं सुप्रीम कोर्टाने उद्या सकाळी साडेदहा वाजता मागवली आहेत.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुप्रीम कोर्टाने तशी नोटीसही जारी केली आहे. यावर सोमवारी (25 नोव्हेंबर) पुन्हा सुनावणी होईल आणि त्यानंतर योग्य तो आदेश देऊ, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय.

पाहा सर्वात ताजे अपडेट्स इथे-

रात्री 22.15- अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी

सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले आहेत.

सोमवारी (25 नोव्हेंबर) राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

रात्री 8.45- राष्ट्रवादीच्या आमदारांचा रेनेसाँमधला मुक्काम हलवला

राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या आमदारांचा हॉटेल रेनेसाँमधला मुक्काम हलवला असून सर्व आमदारांना ग्रँड हयात हॉटेलमध्ये हलविण्यात आलं आहे.

रात्री 8.00- संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची 'सिल्वहर ओक' या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

6.00 अजित पवारांचं ट्वीट दिशाभूल करणारं- शरद पवार

अजित पवार यांचं ट्वीट हे चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

अजित पवार यांनी सलग ट्वीट करताना एकीकडे भाजपच्या नेत्यांचे आभार मानले तर दुसरीकडे शरद पवार हेच आमचे नेते आहेत असं म्हणत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी राज्याला स्थिर सरकार देईल, असा विश्वास व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या ट्वीटला उत्तर देताना म्हटलं, की भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेना आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय एकमतानं घेतला आहे.

5.30- भाजपकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न : अशोक चव्हाण

भाजपकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे.

"भाजप सुप्रीम कोर्टाकडून अधिक वेळ घेण्याचा प्रयत्न करत आहे. यामागचा हेतू स्पष्ट आहे. इतर पक्षातील आमदार फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे," असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं.

5.00- मी अजूनही एनसीपीमध्येच : अजित पवार

ट्वीटरच्या माध्यमातून भाजप नेत्यांचे आभार मानणाऱ्या अजित पवार यांनी नवीन ट्वीट केलं आहे. अजित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये 'मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि शरद पवार हेच आमचे नेते आहेत,' असं म्हटल्यानं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी राज्याला पाच वर्षे स्थिर सरकार देईल, असा विश्वासही अजित पवार यांनी आपल्या ट्वीटमधून व्यक्त केला.

4.33- बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजप तयार : आशिष शेलार

बहुमत सिद्ध करण्यासाठी आजच्या बैठकीत रणनीती आखण्यात आल्याचं भाजप नेते आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव या बैठकीत संमत करण्यात आल्याचंही आशिष शेलार यांनी म्हटलं.

दादरमधल्या वसंतस्मृती इथं आज (24 नोव्हेंबर) भाजपच्या विधिमंडळ गटाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

स्पष्ट जनादेश असतानाही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देत 30 वर्षांची युती तोडल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी केला.

4.25- उद्धव ठाकरे शिवसेना आमदारांच्या भेटीला

शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रेनेसाँ हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे हे शिवसेना आमदारांच्या भेटीसाठी ललित हॉटेलकडे रवाना झाले.

दरम्यान, आपली आघाडी ही दीर्घकाळ टिकेल. तुम्ही काळजी करू नका, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांशी बोलताना व्यक्त केला.

4.01- अजित पवारांनी मानले मोदींचे आभार

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 'नॉट रिचेबल' झालेल्या अजित पवार यांनी अखेरीस आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजित पवार यांनी ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

शनिवारी (23 नोव्हेंबर) देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. या शपथविधीनंतर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी फडणवीस आणि अजित पवारांचं अभिनंदन केलं होतं. तब्बल 24 तास उलटल्यानंतर अजित पवार यांनी मोदी आणि शाहांचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्रात स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटला उत्तर देताना म्हटलं आहे.

अजित पवार यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाहांसोबतच भाजपच्या इतर नेत्यांचेही आभार मानले आहेत. राजनाथ सिंह, पीयुष गोयल, निर्मला सीतारमण, स्मृती इराणी, धमेंद्र प्रधान, अनुराग ठाकूर आणि अन्य नेत्यांचे आभार मानले.

3.00- भाजप आमदारांची बैठक

राज्यातील सत्ता स्थापनेच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विधिमंडळ गटाची बैठक मुंबईतील वसंत स्मृती इथं होत आहे. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, विनोद तावडे, पंकजा मुंडे तसंच भाजपचे निर्वाचित आमदार उपस्थित आहेत.

या बैठकीला भाजपच्या आमदारांसह मित्रपक्ष तसंच भाजपला समर्थन देणारे अपक्ष आमदारही उपस्थित आहेत.

2. 20- उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या भेटीला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची भेट घेण्यासाठी हॉटेल रेनेसाँमध्ये पोहोचले आहेत.

त्यांच्यासोबत शिवसेना नेते संजय राऊत तसंच एकनाथ शिंदेदेखील उपस्थित आहेत.

1.10- हे अनौरस सरकार-रणदीप सुरजेवाला

"न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना नोटीस देऊन उद्यापर्यंत पाठिंब्याचं पत्र न्यायालयात दाखल करण्यास सांगितलं आहे. तिन्ही पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश देण्याची मागणी केली आहे. यावर निर्णय येणं अद्याप बाकी आहे. दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून निर्णय घेण्यात येईल. हे एक अनौरस सरकार आहे," असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले.

"राज्यपालांच्या कार्यालयाचा गैरवापर करून त्यांनी सरकार स्थापन केलं आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी त्यांच्याकडे बहुमत नसल्याचं सिद्ध होईल," असा आरोपही त्यांनी केला.

1.00 - अजित पवार यांची गटनेतेपदी नियुक्ती वैध- आशिष शेलार

"सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्यामध्ये फ्लोअर टेस्ट आजच्या आज घ्यावी, ही मागणी फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना तोंडावर आपटली आहे. याबाबात न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला नाही," असं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले, "अजित पवार यांना स्वतःचं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. अजित पवार यांची गटनेतेपदी नियुक्ती वैध आहे. नवीन नियुक्ती केली असल्यामुळे नवीन नियुक्तीच्या आधारावर दावा पेश केला. त्यामुळे अजित पवार हेच गटनेते आहेत, असा आमचा दावा आहे. हे राज्यात चालणार नाही. स्वतः लोकशाही आणि अधिकारांच्या गोष्टी करायच्या आणि आमदारांना बंदिवान बनवून ठेवायचं, असा प्रकार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे."

12.30- कागदपत्रं सादर करा

राज्यपालांनी कोणत्या मुद्यांच्या आधारे सत्तास्थापनेचा दावा केला ती कागदपत्रं न्यायालयासमोर सादर करावीत, असा आदेश सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना देण्यात आला आहे. सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

12.20- 'तीन आठवडे तीन पक्ष झोपले होते का'?

'विश्वासदर्शक ठराव दोन ते तीन दिवसात आयोजित करता येईल. त्यांनी अचानक येऊन सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात अडथळा आणला. विश्वासदर्शक ठराव घ्या असं सर्वोच्च न्यायालय राज्यपालांना सांगू शकतं का? ते तीन आठवडे झोपले होते का? सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी त्यांच्याकडे समाधानकारक कागदपत्रं नाहीत', असं रोहतगी म्हणाले.

12.10- राज्यपालांच्या निर्णयाची समीक्षा होऊ शकत नाही-मुकुल रोहतगी

भाजपचे काही आमदार तसंच स्वतंत्र आमदारांचा प्रतिनिधी म्हणून मी बाजू मांडत आहे. रविवारी सुनावणी आयोजित करण्याची गरजच नव्हती. घटनेच्या 361 कलमानुसार राज्यपालांच्या निर्णयाची न्यायिक समीक्षा होऊ शकत नाही असा दावा मुकुल रोहतगी यांनी केला आहे. राज्यपालांचा निर्णय रद्द करण्याची मागणी चूक आहे असं रोहतगी यांनी सांगितलं. बहुमत होतं तर त्यांच्याकडे वेळ होता, त्यांनी सरकार स्थापन करायला हवं होतं. राज्यपालांच्या निर्णयात कायद्याचं उल्लंघन होणारं काहीच नाही. विश्वासदर्शक ठरावाची तारीख न्यायालयाने ठरवू नये. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मूलभूत अधिकारच नाही.

12.09-सर्वोच्च न्यायालयाने विश्वासदर्शक ठरावाचा आदेश द्यावा-सिंघवी

1998 मध्ये उत्तर प्रदेशात असो किंवा 2018 मध्ये कर्नाटकात, सर्वोच्च न्यायालयाने विश्वासदर्शक ठराव घेण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांच्याकडे बहुमताचा आकडा असेल ते जिंकतील.

12.00 अजित पवारांकडचं पत्र अवैध-सिंघवी

अजित पवारांनी सही केलेलं पत्र सादर करण्यात आलं असेल तर ते अवैध आणि दिशाभूल करणारं आहे असं सिंघवी यांनी सांगितलं. विश्वासदर्शक ठराव घेणं हाच योग्य पर्याय असल्याचा दावा सिंघवी यांनी केला.

11.56: ही तर लोकशाहीचीहत्या- अभिषेक मनू सिंघवी

शनिवारी जे घडलं ती लोकशाहीचा हत्या आहे असं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बाजू मांडणारे अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयासमोर सांगितलं. अजित पवार विधिमंडळाचे नेते नाहीत असं राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितलं. पक्षाचा पाठिंबा नसताना ते उपमुख्यमंत्री म्हणून कसे शपथ घेऊ शकतात? असा सवाल सिंघवी यांनी केला.

11.45: बहुमत असेल तर सिद्ध करा-कपिल सिब्बल

कपिल सिब्बल यांनी तिन्ही पक्षांच्या वतीने बाजू मांडली. ते म्हणाले, 'रात्री 7वाजता घोषणेनंतर जे घडलं ते अतर्क्य होतं. भारतीय राजकारणात मी असा प्रकार पाहिला नाही. सकाळी 5.17 वाजता राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली. 8वाजता दोन व्यक्तींनी शपथ घेतली. कोणती कागदपत्रं सादर करण्यात आली? पक्षाचा ठराव काय होता? निमंत्रण कधी मिळालं? याविषयीचा तपशील नाही. कशाच्या आधारे सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला याची माहिती देण्यात आली नाही. राज्यपालांनी अशाप्रकारे सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देणं यातून पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन दिसतो'.

ते पुढे म्हणाले, 'संध्याकाळी सात वाजता शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन होईल असं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतरचं राज्यपालांचा शपथविधीचा निर्णय आकसातून घेतल्याचं जाणवतं. भाजप आणि अजित पवार यांच्याकडे बहुमताचा आकडा असेल तर त्यांनी तो सिद्ध करावा. त्यांनी किती कालावधी देण्यात आला आहे याची आम्हाला कल्पना नाही. राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी दिलेलं निमंत्रण जाहीर करण्यात आलेलं नाही. बहुमत असेल तर विश्वासदर्शक ठरावाद्वारे सिद्ध करावं. त्यांच्याकडे बहुमत नसेल तर सत्तास्थापनेसाठी आम्हाला संधी देण्यात यावी'.

महाराष्ट्राच्या जनतेला स्थिर सरकार हवं आहे. बहुमत आहे म्हणत असेल तर ते सिद्ध करा. आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही ते सिद्ध करू शकतो. आम्ही उद्याही बहुमत सिद्ध करू शकतो.

11.25: आमदारांच्या पत्राचा दुरुपयोग- अशोक चव्हाण

शरद पवार यांना आम्ही भेटलो. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. आमदारांच्या पत्रांचा दुरूपयोग अजित पवार यांनी केला होता. अजित पवारांचा हा निर्णय शरद पवार यांनी स्वीकारलेला नाही. अशा प्रकारचं पत्र जयंत पाटील यांच्यासोबत सर्वोच्च न्यायालयात पाठवण्यात आल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे. यावर सर्वोच्च न्यायालय जो निर्णय घेईल त्यावरून पुढील डावपेच ठरवू', असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, 'आमच्याजवळ बहुमताची संख्या आहे. काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी मिळून आमच्याकडे पुरेशी संख्या आहे. काही आमदारांना दिशाभूल करून नेण्यात आलं होतं. त्यापैकी काही जण परत आले आहेत. काँग्रेसचे 44 सदस्य योग्य ठिकाणी सुरक्षित आहेत. त्यांच्याबाबत आम्हाला काहीच काळजी नाही. फडणवीस यांनी अजित पवारांच्या समर्थनाच्या आधारे सरकार स्थापन केलं होतं. पण मुळात तशी परिस्थिती नाही. त्यापैकी सगळेच आमदार राष्ट्रवादीसोबत आहेत. हे अल्पमतातलं सरकार कसं चालवू शकतात? त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे'.

11.20 वाजता: अजित पवार यांच्याकडून चूक झाली- नवाब मलिक

'अजित पवार यांच्याकडून चूक झाली आहे. हे सरकार चुकीच्या पद्धतीने स्थापन झालं आहे. काल पाच आमदार आमच्याकडे नव्हते. संध्याकाळपर्यंत सगळे आमदार परत येतील. हे सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकू शकणार नाही. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा', असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.

11.00 वाजता: सत्तेसाठी ते रामाला विसरले, शपथविधी रामप्रहरी झाला- आशिष शेलार

'राज्यपालांनी 30 नोव्हेंबर ही तारीख बहुमत सिद्ध करण्यासाठी दिली आहे. किमान 170 किंवा त्यापेक्षा जास्त मतांनी आम्ही विश्वासदर्शक ठराव जिंकू. हे सरकार स्थायी सरकार म्हणून काम करेल', असं भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, काही लोकांनी आरोप प्रत्यारोपांची मालिका चालवली आहे. आम्ही सकाळी सहाच्या शाखेत जाणारे स्वयंसेवक आहोत. आम्हाला ती पहाट असते. त्यांचा दिवस उशिरा सुरू होतो. शपथविधीची वेळ रामप्रहराची वेळ. रामाला विसरलेत त्यांना शपथविधीची वेळ काळोखी वाटते. अयोध्येला जाण्याचा कार्यक्रम सत्तेसाठी पुढे ढकलला. काळ्या काचेच्या गाडीतून अहमद पटेलांना भेटायला जातात'.

ते पुढे म्हणाले, 'सोनिया गांधींशी केलेली सलगी हा गोराबाजार आणि अजित पवारांशी हातमिळवणी हा काळाबाजार. संजय राऊतांनी मानक सिद्ध केलं. इंदिरा गांधींनी जारी केलेली आणिबाणी काळा दिवसच होता अशी आमची भूमिका. राऊतांनी आणीबाणी भयंकर होती हे मान्य केलं. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली स्थायी सरकार देऊ. संसदेत एनआरसी विधेयक सादर होऊ शकतं. काँग्रेस एनआरसीला विरोध करत आहे. शिवसेना सत्तेसाठी विरोध करणार का? इंदिरा गांधींवर टीका करणारे महाविकास आघाडी कशी चालवणार हे जनतेला कळेल'.

10.10 वाजता: लोकशाहीसाठी काळा दिवस-संजय राऊत

'शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. अजित पवारांना फोडणं हा शेवटचा डाव आहे. हा डाव त्यांच्यावर उलटणार. राष्ट्रवादीचे 25 उमेदवार त्यांच्याबरोबर जातील या भ्रमातून भाजप बाहेर पडला असेल. जवळजवळ सर्व आमदार राष्ट्रवादीत परतले आहेत. पाच आमदारांच्या बदल्यात अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं. भाजपला व्यापार करतो असं मी मानत होतो. व्यापार सचोटीचा केला असता तर भाजपवर दर दर के ठोकर खाण्याची वेळ आली नसती', असं राऊत यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, ' काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीकडे 165 आकडा आहे. खालच्या स्तरावरचं राजकारण म्हणजे कालचा घाणेरडा प्रकार. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आणि जनतेलाच माहिती नाही. देशाच्या इतिहासात असा काळा दिवस आम्ही पाहिला नाही. राष्ट्रपती भवन आणि राजभवनाचा काळाबाजार. भयंकर कृत्य. पोरखेळ. बहुमत होतं, नैतिकता होती तर मग महाराष्ट्र झोपलेला असताना शपथ का घेतली? बहुमत सिद्ध करण्याकरता का थांबलात. राज्यपालांना ईश्वराचा अवतार मानतात. त्यांच्या पक्षाला वेगळा न्याय देतात. फोडाफोड, माणसं विकत घेण्यासाठी संधी. आणिबाणीपेक्षा वाईट. मोदींची प्रतिमेला तडा देण्याचं काम. काहीही करा, विधानसभेत महाआघाडी बहुमत सिद्ध करेल. न्यायालयात निर्णय लागेल त्याचा आदर करू. काल शपथविधी झाल्यानंतर दोन-चार लोकांनी लाडू भरवले पण हा लाडू खाली गेलेला नाही. संजय राऊत घाबरणारा नाही. तुम्हाला घाबरवून पळून लावू. स्वत:च्याच जाळ्यात भाजप फसला आहे'.

'2014मध्ये बँड-बाजा लावून शपथ घेतली होती. आता काहीच नाही. सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स आणि पोलीस हे चार प्रमुख कार्यकर्ते आहेत. राष्ट्रपती आणि राज्यपाल हे भाजपचे राखीव खेळाडू. माझ्यावर घाणेरड्या भाषेत टीका केली. पण माझ्यावर परिणाम होणार नाही', असं राऊत म्हणाले.

'अजित पवार यांनी आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली. ज्या वयात काकांना साथ द्यायची त्या वेळी ते साथ सोडून गेले', असं राऊत यांनी सांगितलं.

9.45 वाजता: अजित पवार घरी परतले - PTI

शनिवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पूर्ण दिवस त्यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या घरी होते. मात्र रविवारी पहाटे ते आपल्या चर्चगेट येथील घरी पोहोचले, असं PTI वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ट्वीट केलं आहे.

पाहा अजित पवारांनी पवार कुटुंबात कशी पाडली उभी फूट -

सकाळी 9.00: 'मी येऊ शकतो तर तुम्ही का नाही?'

"देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता 30 नोव्हेंबरला विश्वासदर्शक ठरावात आम्ही बहुमत सिद्ध करू," असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

"अजित पवारांप्रमाणे शरद पवार आणि पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी भाजपला साथ द्यावी. पूर्वी मी भाजप-शिवसेनेला विरोध करायचो. पण मी आता भाजपबरोबर आहे. मी येऊ शकतो तर तुम्ही भाजपबरोबर का येऊ शकत नाही?," असा सवाल रामदास आठवले यांनी केला.

सकाळी 8.30: सुप्रीम कोर्टात 11.30ला सुनावणी

फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याच्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयाला शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. त्यांच्या रिट याचिकेवर रविवारी सकाळी 11.30ला सुनावणी होणार आहे.

बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेचं अधिवेशन तातडीने रविवारी बोलावण्यात यावं आणि त्या कामकाजाचं चित्रिकरणही केलं जावं, अशी विनंती न्यायालयाला केल्याचं ज्येष्ठ विधिज्ञ देवदत्त कामत यांनी सांगितलं.

सुप्रीम कोर्टात न्या. NV रामण्णा, न्या. अशोक भूषण आणि न्या. संजीव खन्ना हे तीन सदस्यीय खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी घेणार आहे.

सकाळी 8: संजय राऊत यांचं आजचं ट्वीट

शिवसेना नेते संजय राऊत यांचा ट्वीटचा सिलसिला कायम आहे. "Accidental शपथग्रहण", असा टोला राऊत यांनी हाणला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पवईतील हॉटेल रेनेसॉमध्ये (Hotel Renaissance) एकत्र झाले आहेत. काँग्रेसचे आमदार जयपूरला जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे आमदार मुंबईतच आहेत. विश्वासदर्शक ठरावाआधी आमदार फुटू नयेत म्हणून प्रत्येक पक्ष काळजी घेत आहे.

उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले अजित पवार बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानाहून स्वत:च्या मुंबईतील निवासस्थानी रवाना झाले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आज एक महिना सुरू झाला. अतिशय नाट्यमय राजकारणानंतर राज्याला काल सरकार तर मिळालं पण त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आता उभा झाला आहे. शनिवारी झालेला शपथविधीचा प्रकार आणिबाणीपेक्षाही भयंकर असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याच्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयाला शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

त्र अजित पवारांना नेमका किती आमदारांचा पाठिंबा आहे, हे स्पष्ट होऊ शकलं नाही. बंड करून भाजपच्या गोटात दाखल झालेल्या अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदावरून हटवण्यात आलं. त्यांचा पक्षादेश (व्हिप) काढण्याचा अधिकारही पक्षाने रद्द केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे विधिमंडळ पक्ष नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली.

दरम्यान विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला 30 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी 26 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. अजित पवार किती आमदारांचा पाठिंबा आणू शकतात तसंच किती अपक्ष आमदार भाजपच्या गळाला लागणार हे पाहणं रंजक असणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)