You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
धनंजय मुंडे यांची अजित पवारांच्या शपथविधीतली भूमिका संशयास्पद?
राज्यात ज्या वेगवान घडामोडी घडल्या त्यात एक महत्त्वाचं केंद्र होतं ते नरिमन पॉइंटमधला B4 हा बंगला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा हा बंगला.
इथेच अजित पवार यांनी काही आमदारांना महत्त्वाची चर्चा करण्यासाठी बोलावलंआणि इथूनच ते त्यांना राजभवनावर घेऊन गेले असा त्या आमदारांचा दावा आहे.
राजभवनावर शपथविधी पार पडताच त्यातले काही आमदार तडक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले. त्यानंतर त्यातल्या 3 आमदारांना शरद पवार थेट पत्रकार परिषदेतच घेऊन आले. त्यातल्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी घडलेला सगळा घटनाक्रम पत्रकारांसमोर उलगडून सांगितला.
या घटनाक्रमात धनंजय मुंडे यांचं नाव सातत्यानं येत राहिलं. मग शोध सुरू झाला तो धनंजय मुंडे कुठे आहेत याचा. प्रसारमाध्यमांमध्ये ते नॉट रिचेबल असल्याचं वृत्त आलं. त्यांच्याबरोबर काही आमदार असल्याच्याही चर्चा मीडियात सुरू झाल्या.
या नाट्यामध्ये त्यांनी नेमकी काय भूमिका बजावली असेल याची चर्चा सुरू झाली. गायब असलेल्या आमदारांच्या गाड्या धनंजय मुंडेंच्या बंगल्याच्या बाहेरच पार्क असल्यानं ते धनंजय मुंडे यांच्याच बरोबर आहेत असं बोललं जाऊ लागलं. मात्र रविवारी मुंडे यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहोत असं ट्वीट केलं आहे त्यामुळे या सर्व शक्यतांवर पडदा पडला असं म्हणता येईल.
संध्याकाळी 5 पर्यंत धनंजय मुंडे यांच्याबाबत बऱ्याच वावड्या उठल्या. मात्र संध्याकाळी पाचनंतर अचानक ते मुंबईतल्या वाय. बी. चव्हाण सेंटरवर दाखल झाले. त्यावेळी इथे उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी तिथं एवढी गर्दी होती की धक्काबुक्कीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यातून कशीतरी वाट काढत धनंजय मुंडे सेंटरच्या इमारतीत शिरले.
दरम्यानच्या काळात बीबीसी प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनीसुद्धा धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा फोन त्यावेळी नॉट रिचेबल होता. तसंच त्याच्या स्वीय सहाय्यकांकडून फोन कट केला जात होता.
धनंजय मुंडे यांची सक्रिय भूमिका?
पण खरंच धनंजय मुंडे यांनी या सर्व घडामोडींमध्ये काही भूमिका बजावली आहे का?
धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात, त्यामुळे त्यांची यामध्ये भूमिका असण्याची शक्यता राजकीय विश्लेषक संजय मिस्कीन व्यक्त करतात.
ते सांगतात, "धनंजय मुंडे अजित पवार यांच्याजवळचे आहेत. त्यांच्याबरोबर अजित पवार यांनी सल्लामसल्लत केली असू शकते. किंवा त्यांना याची कल्पना असू शकते. कारण आमदार त्यांच्या घरी बोलावण्यात आले होते. घडामोडी घडल्यानंतर धनंजय मुंडे नॉट रिचेबल होते. ते कुठे आहेत याची चर्चा सुरु होती. ते अजित पवार यांच्यासोबतच आहेत असं म्हटलं जात होतं. एवढी मोठी प्रक्रिया सुरू असताना ते 5 वाजेपर्यंत गायब होते. त्यांचा बंगला वाय. बी. चव्हाण सेंटरपासून जवळच आहे. त्यामुळेच त्यांच्यावरची शंका अधोरेखित होत आहे."
याच विषयावर फ्री प्रेस वृत्तपत्राचे राजकीय संपादक प्रमोद चुंचुवार सांगतात, "धनंजय मुंडे यांचे देवेंद्र फडणवीसांशी उत्तम संबंध आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांनी बोलावलं होतं. त्यावेळी रात्री दीड वाजता धनंजय मुंडे आणि अजित पवार हे दोघेही तिथं गेले होते."
"त्यामुळे या सर्व घडामोडींमध्ये त्यांचा रोल असेल हे नक्की. करण त्यांच्या बंगल्यातच सर्व लोकांना बोलावण्यात आलं होतं. ते अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात," असं चुंचुवार पुढे सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)