अजित पवारांसोबत आता नेमके किती आमदार आहेत?

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, शरद पवारांना धोका दिला. त्यांची देहबोली पहिल्यापासूनच संशयास्पद होती. शरद पवार यांना घरातूनच दगा देण्याचा प्रयत्न झाला आहे. पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून हे करण्यात आलं आहे."

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही पहिली प्रतिक्रिया.

शनिवारी सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते म्हणून शपथ घेतली की स्वतंत्र आमदार म्हणून, हे लगेचच स्पष्ट होत नव्हतं.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष मिळून 'महाविकासआघाडी'चं सरकार सत्तास्थापन करणार, असं चित्र असतानाच शनिवारी सकाळी शपथविधी सोहळा उरकल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

मतदानापूर्वी आणि निकालांनंतरही अजित पवार नाराज असल्याचं अनेकदा दिसलं होतं. त्यामुळे अजित पवारांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला की फोडला, अशा प्रश्नांना ऊत आला आहे.

अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काय म्हणाले?

शरद पवारांचा तुमच्या निर्णयाला पाठिंबा आहे का, या प्रश्नावर ANIशी बोलताना अजित पवार म्हणाले, "स्थिर सरकारबद्दल आपण निर्णय घेतला पाहिजे, असं मी त्यांना पहिल्यापासून म्हणत होतो. लोकांनी कुणालाच पूर्ण बहुमत दिलेलं नाही. दोघांनी किंवा तिघांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणं गरजेचं होतं. तिघांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यापेक्षा दोघांनी सरकार स्थापन करणं केव्हाही जास्त उपयुक्त ठरतं."

मात्र भाजपसोबत जाण्याच्या अजित पवार यांच्या निर्णयाची त्यांचे काका आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना कल्पना होती का? अजित पवार यांच्याबरोबर किती आमदार आहेत? अशा विविध शक्यता निर्माण झाल्या आहेत.

"अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे," असं ट्वीट शरद पवार यांनी केलं.

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, "अजित पवार फुटून जातील असं वाटलं नव्हतं. सकाळच्या शपथविधीसाठी दहा ते अकरा आमदार आम्हाला फोटोत दिसले. तीनजण या पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत. आणखी काही आमदार परत येत आहेत,"असं शरद पवार यांनी सांगितलं.

किती आमदार अजित पवारांच्या संपर्कात?

राष्ट्रवादीचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे सकाळी अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित होते.

त्यांनी बीबीसीला सांगितलं, "सकाळी 7 वाजता आम्हाला मुंबईला बोलावण्यात आलं. आम्ही 10 आमदार होतो. पण, नेमकं कशासाठी बोलावण्यात आलं याची काहीही कल्पना आम्हाला देण्यात आली नाही. त्यानंतर आम्हाला राजभवनात नेण्यात आलं. तिथं पोहोचल्यानंतर आम्हाला थोडी शंका आली. नंतर तिथं देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन आले. थोड्यावेळानं राज्यपाल आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार घेतील, असं सांगण्यात आलं, त्यावेळी मात्र आम्ही अचंबित झालो. त्यांचा शपथविधी झाल्यानंतर मी शरद पवारांना जाऊन भेटलो आणि त्यांना वस्तुस्थिती सांगितली. नंतर अजित पवार म्हणाले, याबद्दल मी तुम्हा सगळ्यांना भेटून सविस्तर माहिती सांगतो."

हीच भूमिका शपथविधीला उपस्थित राष्ट्रवादीचे आमगदार सुनिल भुसार आणि संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर हे सकाळी अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित होते. 

त्यांनी ट्वीट केलं आहे की, "मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच आहे. माझा आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. अजित पवार हे गटनेते असल्याने त्यांच्या सांगण्यावरून मी इतर आमदारांसोबत राजभवनात गेलो होतो. तिथ काय होणार आहे, या बाबत कोणतीही कल्पना नव्हती, मी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही !"

आमदार माणिकराव कोकोटे यांनी म्हटलं की, "मी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही. अजितदादा पवार यांच्या सांगण्यावरुन मी राजभवनावर गेलो होतो. गटनेते असल्यानं आदेश पाळला. तिथं काय होणार आहे, याबाबत काहीच माहीत नव्हतं. पण मी पक्षासोबत आहे. एकदा घेतलेला निर्णय आपण कदापि बदलणार नाही."

अजित पवारांचं बंड

"अजित पवारांनी बंड केलं आहे. त्यांच्या या धोरणामुळे राष्ट्रवादी पक्षच नाही, तर पवार कुटुंबही फुटलं आहे," असं मत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे व्यक्त करतात. ते सांगतात, "अजित पवार यांच्यावर राज्य सहकारी बँकेप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे, सिंचन घोटाळ्यातही त्यांची चौकशी सुरू आहे. या सगळ्यामुळे त्यांच्यामागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे अजित पवारांनी हे पाऊल उचलेलं आहे."

"पण, आता विधिमंडळाच्या पटलावर अजित पवारांना राष्ट्रवादी पक्षाचं समर्थन आहे, हे सिद्ध करावं लागेल. दोन-तृतीयांश आमदारांचा पाठिंबा असल्याशिवाय पक्षाची फूट अधिकृत मानली जाते. याचाच अर्थ त्यांना 54 पैकी 36 आमदारांचा पाठिंबा आहे, हे सिद्ध करावं लागेल. त्यामुळे आता पुढे काय होतं, हे पाहावं लागेल," चोरमारे पुढे म्हणाले.

सत्तेसाठी की स्थिर सरकारसाठी?

"राज्यात सत्तास्थापनेचा गोंधळ महिन्याभरापासून सुरू होता. काँग्रेस पाठिंबा देणार की नाही, हे स्पष्ट नव्हतं. दुसरीकडे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील की नाही, हेही स्पष्ट नव्हतं. त्यामुळे या अशा सगळ्या परिस्थितीत अजित पवारांनी हा निर्णय घेतला आहे. राज्यात स्थिर सरकार यावं, यासाठी त्यांनी हे पाऊल उचलेलं दिसून येतं," असं मत 'लोकमत'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान व्यक्त करतात.

अजित पवार यांनी सत्तेसाठी हे पाऊल उचलल्याचं राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सांगतात.

"अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यापासूनच फोडलेली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून त्यांचे तसे प्रयत्न सुरू होते. अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना वाटत होतं की, राज्यात सत्ता हवी असेल, तर भाजपसोबत जायला हवं, कारण भाजप केंद्रात सत्तेत आहे. अजित पवार आणि कंपनीचं सत्तेच्या आधारे राजकारण सुरू आहे, सत्तेसाठीच त्यांनी हे केलं आहे," हेमंत देसाई सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)