You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार म्हणाले 'आधी शिवसेनेशी चर्चा करू' म्हणून काँग्रेसने पाठिंब्याचं पत्र पाठवलं नाही - पृथ्वीराज चव्हाण
शिवसेनेशी प्रत्येक मुद्द्यावर चर्चा झाल्याशिवाय पाठिंब्याचं पत्र द्यायचं नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी घेतली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनाही ती पटली, म्हणूनच शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र दिलं नाही," असं काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं.
महाराष्ट्र राज्यामध्ये 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्याबरोबरच राजकीय हालचाली खूप वेगानं घडत आहेत. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार येईल किंवा नाही यावर घमासान चर्चा सुरू आहे. या संदर्भात मयुरेश कोण्णूर यांच्याशी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिका मांडली.
पाहा संपूर्ण मुलाखत
शिवसेना 11 नोव्हेंबर रोजी एनडीएमधून अधिकृतरीत्या बाहेर पडल्यानंतर आम्ही अधिकृत चर्चेला सुरुवात केली. आमच्यात अनौपचारिक चर्चा होत होती, परंतु शिवसेना युतीतून अधिकृतरीत्या बाहेर पडत नाही, तोपर्यंत आम्ही काहीही बोलणं शक्य नव्हतं, असंही ते म्हणाले.
"आमच्यात अनेकदा झालेल्या अनौपचारिक चर्चांनंतर सोनिया गांधींचा विरोध थोडा सौम्य झाला होता. राष्ट्रवादीही अनेकदा अनौपचारिक चर्चा केल्यावर पाठिंबा द्यायला तयार झाली होती. परंतु शिवसेनेशी प्रत्येक मुद्द्यावर चर्चा झाल्याशिवाय पाठिंब्याचं पत्र द्यायचं नाही, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली. सोनिया गांधींनाही ती पटली आणि म्हणूनच आम्ही पाठिंब्याचं पत्र 12 नोव्हेंबर रोजी सेनेला पाठवलं नाही. पत्रं तयार होती परंतु ती थांबवण्यात आली," अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
तीनही पक्षांचा सत्ता स्थापनेचा निर्णय कधी पूर्ण होणार या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे इतर मित्रपक्ष अशी निवडणूकपूर्व जी आघाडी होती त्यांच्यात सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल. किमान समान कार्यक्रम ठरवला जाईल, सत्ता वाटणीच्या सूत्रांवर चर्चा होईल आणि मगच निर्णय घेतला जाईल."
भाजपने ज्या प्रकारे गेल्या पाच वर्षांमध्ये सत्ता राबवली आहे त्याला जनता कंटाळली आहे आणि त्याचेच परिणाम निवडणुकीत त्यांना दिसले आहेत, अशी टीकाही चव्हाण यांनी यावेळी केली.
"तीन पक्षांनी मिळून सत्ता स्थापन करण्यात अडचणी येणारच आहेत. परंतु त्या सोडवून पुढे जाण्याचं आमचं काम आहे. मी अशा आघाडीच्या सरकारमध्ये काम केलेलं आहे. मी स्वतः आघाडीतला मुख्यमंत्री होतो. त्यामुळे अडचणी दूर करण्याचा मला अनुभव आहे," अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
याबरोबर चर्चा सकारात्मक धर्तीवर सुरू असून, मुख्यमंत्री मोठ्या पक्षाचा होतो, असं मुख्यमंत्रिपदाबद्दल मोघम उत्तर त्यांनी दिलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)