You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमित शहा यांचा शिवसेनेवर हल्ला आणि अजित पवार यांच्या ‘नो कमेंट्स’वरून महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा तापलं
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी अनेकदा बोललो. तेव्हा कुणी आक्षेप घेतला नाही. आता मुख्यमंत्रिपदावर दावा हा शिवसेनेचा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे," असं भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.
"आम्ही प्रचारसभांमध्ये जाहीर सांगायचो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील, तेव्हा कुणी आक्षेप का नाही घेतला?" असा सवाल शहा यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना उपस्थित केला.
"आमचं सगळ्यात जास्त नुकसान झालं आहे. विरोधी पक्षाचं नुकसान झालेला नाहीये. देशाच्या जनतेची सहानुभूती मिळवायची आहे त्यांना. देशातल्या लोकांचं नुकसान आम्ही केलेलं नाही, शिवसेनेनं केलं आहे," असंही ते म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभा निकालांनंतर तसंच सत्तास्थापनेवरून युतीत आलेल्या दुराव्यानंतर ते प्रथमच बोलत होते. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यावरही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या तालावर काम करून राष्ट्रपती राजवटीवर लागू केल्याचे आरोप विरोधकांनी केले आहेत. भाजपला सत्तास्थापनेचा दावा करायला तीन दिवस मात्र शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला फक्त 24 तास का, हा दुजाभाव केल्याचा विरोधकांचा आरोप आहे.
त्यावरही गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं, "कोणताच पक्ष सत्ता स्थापन नाही करू शकलं. मग राज्यपाल काय करणार? आणि आता वेळ आहे ना, ज्यांच्याकडे बहुमत असेल तर करावं सरकार स्थापन. संधी मिळाली नाही, यावर इतर पक्ष राजकारण करतायत. दोन दिवस मागत होते, आम्ही सहा महिने दिलेत."
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली असताना पुन्हा निवडणुका व्हाव्यात, असं मला वाटत नाही. राज्यपाल कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करतील, असंही ते म्हणाले.
अजित पवार बारामतीला गेले?
दरम्यान, या मुलाखतीच्या काही क्षणांनंतर ,म्हणजे बुधवारी रात्री 8च्या सुमारास सिल्व्हर ओक अजित पवार हे तडकाफडकी बाहेर निघून गाडीत बसले. पत्रकारांच्या प्रश्नांवर ते जरा चिडून "नो कमेंट्स, नो कमेंट्स. मी बारामतीला चाललोय," असं म्हणाले.
त्यांच्यासोबत गाडीत जयंत पाटीलही बसले. आणि ते पुढे निघाले.
त्यानंतर, अजित पवार हे आघाडीच्या एका महत्त्वाच्या बैठकीतून रागात निघाले, अशी चर्चा सुरू झाली. त्यावर लगेच पृथ्वीराज चव्हाण यांनी आधी बीबीसी मराठीला फोनवर आणि नंतर एक स्वतंत्र ट्वीट करून स्पष्टीकरण दिलं की "आघाडीची कुठलीही बैठक आज सुरू नव्हती. माझ्याकडे काँग्रेसच्या काही नेत्यांच्या अनौपचारिक बैठका सुरू आहेत."
याबद्दल शरद पवार यांना सिल्व्हर ओकमधून बाहेर पडल्यावर विचारणा करण्यात आली, तेव्हा त्यांनी उलट पत्रकारांनाच सुनावलं. "अजित पवार कुठेही गेलेले नाहीत. माध्यमांसमोर ते चेष्टेनं म्हणालेत. तुमच्या अशा मागे धावण्यानं काही प्रायव्हसी उरत नाही, त्यासाठी ते असं म्हणालेत," असं पवार म्हणाले.
दरम्यान, "अजितदादा माझ्यासोबतच आहेत. ते उद्या बारामतीत जातील. आमची बैठक व्यवस्थित सुरू आहे. त्यात काहीही अडचण नाही. महाराष्ट्र राज्याला स्थिर आणि उत्तम काम करणारं सरकार देण्याचंच काम करतोय," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. "महाराष्ट्राचे प्रकल्प, नवे-अर्धवट राहिलेले, आर्थिक परिस्थिती, अशा विविध मुद्द्यांवर आम्ही चर्चा करून मगच शिवसेनेशी बोलणार आहोत," असंही ते पुढे म्हणाले.
यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हेही बोलताना म्हणाले की "अजितदादा बोलताना जरा गावरान झटका देऊन जातात. तसंच बोलले आहेत ते फक्त."
"थोडी गुप्तता पाळण्यासाठी त्यांनी असं सांगितलं. अजितदादा कुठेही गेलेले नाहीत. ते मुंबईच आहेत. मुंबईतल्या मीटिंगमध्ये राज्यातल्या सत्तास्थापनेबद्दल महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत," असंही ते म्हणाले.
थोड्या वेळाने माध्यमांमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची समन्वय समितीची बैठक सुरू झाल्याची वार्ता आली आणि त्यानंतर काही फोटो माध्यमांमध्ये देण्यात आले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)