शरद पवारांच्या हाती राज्यातील सत्तेच्या चाव्या आल्या आहेत का?

    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"आमचे पैलवान तेल लावून उभे आहेत पण त्यांच्याविरोधात लढण्यासाठी कुणीच उभं नाही," असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हटलं होतं.

राज्यात आपल्याला कुणीच विरोधक नाही आणि आपल्याला आव्हानच नाही हे भाजपनं वारंवार सांगितलं, पण गेल्या काही दिवसात राज्याच्या सत्तेच्या पेचप्रसंगात भाजपचा सहभाग कुठेच दिसत नाहीये.

सिंगल लार्जेस्ट पार्टी किंवा सर्वाधिक बहुमत मिळवणारा पक्ष म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपला सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं, पण शिवसेना आणि भाजपमध्ये असलेली कोंडी न फुटल्यामुळे भाजपने जाहीर केलं, की आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार नाही.

त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर होता शिवसेना पक्ष. त्यांचे एकूण 56 आमदार निवडून आले आणि काही अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिल्यानंतर त्यांची संख्या 67 वर गेली असल्याचं शिवसेना नेत्यांनी सांगितलं. सरकार स्थापनेसाठी त्यांना राज्यपालांनी पाचारण केलं. 145 ही मॅजिक फिगर शिवसेना कशी गाठणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं.

11 नोव्हेंबरला काय घडलं?

जर शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा हवा असेल, त्यांना आघाडीबरोबर यायचं असेल तर त्यांनी NDA तून बाहेर पडावं, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलं. त्यानुसार सोमवारी ( 11 नोव्हेंबर) शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि हे सूचित केलं की आपण NDA तून बाहेर पडलो.

तुम्ही NDAतून बाहेर पडलात का असा प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटलं, की आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न झाला आहे त्यामुळे मी राजीनामा देत आहे बाकी मी बाहेर पडलो की नाही हे तुम्ही समजून घ्या.

त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. "जर सर्वांत मोठ्या पक्षाने सत्तास्थापनेसाठी दावा केला नसेल तर पुन्हा निवडणुका न लागण्यासाठी किंवा राष्ट्रपती राजवट लागू नये म्हणून प्रयत्न करणं ही आमची जबाबदारी आहे," असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं.

त्याच दिवशी शरद पवारांना हे विचारण्यात आलं, की तुम्ही शिवसेनेला पाठिंबा देणार का? यावर त्यांनी म्हटलं, की आम्ही काँग्रेसबरोबर आहोत आणि काँग्रेसच्या सहमतीशिवाय आम्ही कोणतंच पाऊल उचलणार नाही.

त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक झाली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला. काँग्रेसचे आमदार शिवसेना-राष्ट्रवादीसोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत, असं राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींच्या कानावर घातलं. या परिस्थितीत काँग्रेस अध्यक्ष काय निर्णय घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

या बैठकीचं पहिलं सत्र संपलं आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं, की चार वाजता पुन्हा एक बैठक होईल. त्यानंतर आमचा निर्णय कळवला जाईल. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात मुंबईतल्या ताज लॅंड्स एंड हॉटेलमध्ये बैठक झाली. राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेची जी मुदत दिली होती त्यासाठी अवघे काही तास बाकी होते पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या पाठिंब्याची पत्रं शिवसेनेला मिळाली नव्हती.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे सुभाष देसाई यांच्याबरोबर राज भवनात गेले तिथे त्यांनी राज्यपालांकडे मुदत मागून घेतली पण त्यांना ती मिळाली नाही. तिथे ते उभे होते पण त्यांच्याकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पत्रं नव्हती. त्यामुळे त्यांचा दावा फेटाळण्यात आला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी पाचारण केलं.

शिवसेनेला पत्रं का मिळाली नाहीत?

अजित पवार यांना याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते दिल्ली आणि जयपूरमध्ये असल्यानं त्यांच्याशी चर्चा करणं कठीण होऊन बसल्याचं म्हटलं. एकप्रकारे अजित पवार यांनी पत्र द्यायला काँग्रेसकडूनच उशीर झाल्याचं सूचित करून टाकलं.

तर शिवसेनेला पत्र न देण्याचं कारण देतासा सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं, "काँग्रेसने पत्र द्यायला कुठलाही उशीर केलेला नाही. आम्ही सुरुवातीपासूनच अलर्ट होतो, राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही पत्र दिलं का, असं आम्ही विचारलं तर त्यांनी दिलं नव्हतं. जे काय करायचं आहे ते दोघांना एकत्र करावं लागेल."

शिवसेनेला पत्र न देण्यामागे फक्त तांत्रिक अडचणी असाव्यात अशी शक्यता बीबीसीचे डिजिटल एडिटर मिलिंद खांडेकर यांनी फेटाळून लावली. ते सांगतात, "शिवसेना NDA तून बाहेर पडल्यानंतर वाटाघाटींसाठी तिन्ही पक्षांकडे कमी वेळ होता."

"काँग्रेस आणि शिवसेनेची विचारसरणी एकदम वेगळी आहे. शिवसेनेची अल्पसंख्यांक आणि स्थलांतरांतरितांवर स्पष्ट भूमिका काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय काँग्रेसनं पाठिंब्याचं पत्र देण्याची शक्यता कमी होती, असं खांडेकर यांना वाटतं.

शिवसेनेला राष्ट्रवादीनं कोंडीत पकडलं आहे का?

शिवसेनेला पाठिंबा द्यावा असं शरद पवारांनी म्हटल्यानंतरच काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला. त्यांनी चर्चेला सुरुवात केली. पण ऐनवेळी काँग्रेसनं पत्रच दिलं नाही. यामागे शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा हेतू असावा का? अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

तर अशी काही शक्यता नसल्याचं ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांना वाटतं. बीबीसी मराठीला त्यांनी सांगितलं, की शरद पवार आणि मी समवयस्क आहोत. आता या वयात आपल्याला कोणताही कलंक लागू नये असंच कुणालाही वाटतं.

"विरोधकांना चितपट केलं म्हणून जेव्हा पवारांच्या तारुण्यात त्यांते समर्थक त्यांची स्तुती करत तेव्हा ते या स्तुतीला 'मोनालिसा हास्य' करून दाद देत असत. पण आता मात्र ते या प्रकारच्या राजकारणात पडणार नाहीत, आता त्यांनी शिवसेनेला शब्द दिला आहे. त्यांनी शिवसेनेसमोर NDA तून बाहेर पडण्याची अट घातली होती ती शिवसेनेनी पूर्ण केली. त्यामुळे शिवसेनेला समर्थन देण्याची आणि काँग्रेसलाही सोबत घेण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. जर काँग्रेस त्यांच्याबरोबर गेली नाही तर काँग्रेसच्या दृष्टीने ते गैरसोयीचं ठरू शकतं," असं सप्तर्षी सांगतात.

बिगर बीजेपी सरकार येणं तिन्ही पक्षांची गरज?

गेल्या काही दिवसांत आपण हे पाहिलं की राज्यातल्या विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांच्या पाठीमागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला. जर अशा चौकशांना बाहेरच ठेवायचं असेल तर राज्यात भाजपचा मुख्यमंत्री नको, असं शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांना वाटत असावं असा अंदाज सप्तर्षी व्यक्त करतात.

ते सांगतात, "कोणत्याही राज्यात केंद्राला चौकशी लावायची असेल तर त्यासाठी राज्याच्या सहकार्याची आवश्यकता असते. आपली राज्यघटनात्मक रचनाच तशी आहे. त्यामुळे हे तिन्ही पक्ष भाजपला बाहेर ठेवण्यासाठी अजूनही प्रयत्न करतील."

"राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली म्हणजे सारं काही संपलं असं होत नाही. ज्यावेळी 145 आमदारांच्या सह्यांची पक्ष ज्यांच्याकडे असतील ते राज्यपालांकडे जाऊ शकतात," असं सप्तर्षी सांगतात.

"किंवा फ्लोअर टेस्ट झाली आणि तिन्ही पक्ष एकत्र आले तर त्यांचं सरकार स्थापन होऊ शकतं. कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर आधारित सरकार स्थापन होऊ शकतं. हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे असं नाही. अगदी विरुद्ध विचारसरणीचे पक्ष एकत्र आल्याचं आपण पाहिलं आहे. ( जसं की भाजप आणि पीडीपी - काश्मीरमध्ये) 1967 मध्ये 9 राज्यांमध्ये विविध विचारसरणीच्या पक्षांची सरकारं होती," याची आठवण सप्तर्षी करून देतात.

पुढे काय होऊ शकतं?

जर सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी-शिवसेना आणि काँग्रेस तयार आहेत तर आता वेळ का लागत आहे असं विचारलं असता ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी सांगतात, "भारतीय जनता पक्षाला दोन दिवस दिले पण त्यांचं सरकार बनू शकलं नाही. राष्ट्रवादी आणि सेनेला मिळूनही दोन दिवस मिळाले पण त्यांचंही सरकार बनू शकलं नाही. त्यांचं संगनमत होण्यासाठी, एकूण खाते वाटप इत्यादी गोष्टींच्या चर्चेसाठी हा वेळ गेला असण्याची शक्यता आहे."

"त्यामुळे आता राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राष्ट्रपती राजवट लागू होणं म्हणजे विधानसभा बरखास्त होणं नाही." असं मत ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी व्यक्त केलं.

तिन्ही पक्ष एकत्र आले तर शरद पवारांची भूमिका काय राहील?

या बिकट पेचप्रसंगात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार काय भूमिका बजावतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये संवादाचा सेतू निर्माण करण्याचं काम शरद पवार करू शकतात असं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांना वाटतं.

ते सांगतात, "शरद पवारांचा अनुभव आणि वय पाहता आणि त्यांचे सर्वपक्षांशी सौहार्दाचे संबंध पाहता ते कोऑर्डिनेशन कमिटीचे प्रमुख अशीच भूमिका बजावू शकतील. जनता पक्षाचं सरकार आलं होतं तेव्हा जयप्रकाश नारायण यांनी अशीच भूमिका बजावली होती. त्यामुळे हे सरकार बनवण्यासाठी तसेच चालवण्यासाठी शरद पवारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते."

"शरद पवारांचा मूळ पिंड काँग्रेसी आहे आणि त्यांचे बाळासाहेबांशी सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे ते दोन्ही पक्षांमधला बायडिंग फोर्स ठरू शकतील. म्हणजेच ते फेव्हिकॉलचं काम करतील," असं देसाई यांना वाटतं.

शरद पवार हे अनुभव संपन्न आहेत याची पावती देवेंद्र फडणवीस यांनीच निवडणुकीनंतर दिली. 'त्यांचे पैलवान तयारच नाही,' असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटलं, की पावसात भिजावं लागतं हे समजण्यासाठी आमचा अनुभव कमी पडला. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांच्या अनुभवाचा प्रत्यक्ष फायदा राज्यातली सत्तेची कोंडी फोडण्यात होईल की तो बिकट करण्यात होईल याचं उत्तर येणारा काळच देईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)