You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार: भविष्यात काय घडेल सांगता येत नाही, पवारांच्या या वक्तव्याचा अर्थ काय?
शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत कुठलीही चर्चा झालेली नाही. पण भविष्यात काय घडेल ते आता सांगू शकत नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
"जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. सरकार स्थापन करण्याची जबाबदारी भाजप-शिवसेनेची आहे," असं पवार म्हणाले. शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादी पाठिंबा देणार का? या प्रश्नावर पवारांच्या उत्तराने गूढ वाढवलं आहे.
"शिवसेनेसोबत चर्चा नाकारता येत नाही. शिवसेनेकडून अद्याप विचारणा झालेली नाही. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून विचारणा व्हायला हवी. आम्हाला कोणाकडूनही प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," असं पवार यांनी सांगितलं.
'मी मुख्यमंत्री होणार नाही'
महाराष्ट्रात शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री बनणार का? या प्रश्नाला नाही म्हणत पवारांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीची माहिती दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या बैठकीला उपस्थित होते. राज्यातली स्थिती भाजपला अनुकूल नाही. मात्र सर्वाधिक मताधिक्य भाजपकडे आहे. सोनिया गांधी यांची पुन्हा भेट घेणार असून, त्यानंतर नेमकं काय ते सांगू शकेन असं पवार म्हणाले.
170चा आकडा आला कुठून?
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि शिवतीर्थावर शपथविधी होईल असं संजय राऊत म्हणाले होते. मात्र हा 170चा आकडा संजय राऊत यांनी कुठून काढला ते माहिती नाही. भाजपातील आमदार त्यांच्या पाठिशी असावेत असा टोला पवार यांनी लगावला.
राज्यपालांची सदिच्छा भेट-राऊत
दरम्यान राज्यातील सत्तास्थापनेत शिवसेनेचा कोणताही अडथळा नाही असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. राऊत यांच्यासह शिवसेना नेते रामदास कदम यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
ही केवळ सदिच्छा भेट असल्याचंही त्यांनी सांगितलं. सत्तास्थापनेत शिवसेनेचा कोणताही अडथळा नाही. सरकारस्थापनेला का उशीर होत आहे याची माहिती आम्हाला नाही. घटनेनुसार जे योग्य असेल त्यासाठी शिवसेना सहकार्य करेल. त्यामुळे लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
राज्याला कायद्याची आणि राजकारणाची जाण असणारे राज्यपाल मिळाले आहेत. राज्यपाल हे तटस्थ असतात, ते कोणत्याही पक्षाचे नसतात. त्यामुळे ते त्यांचा निर्णय घेतील असं राऊत म्हणाले.
लवकरच सरकार स्थापन होईल- मुख्यमंत्री
दरम्यान सत्तेच्या समीकरणासंदर्भात कोण काय बोलतंय यावर मी बिल्कूल काही बोलणार नाही. भाजपमधूनही कुणी काही बोलणार नाही.
महाराष्ट्राला नवीन सरकारची आवश्यकता आहे आणि ते सरकार महाराष्ट्रात निश्चितपणे बनेल याबाबत आम्ही पूर्णपणे आश्वस्त आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट घेतल्यानंतर बोलताना सांगितलं.
शरद पवारांनी 'संकेत' दिले का?
आज झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार याच पत्रकार परिषदेत पवार म्हणाले आम्हाला विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याचा कौल दिला आहे. पण पुढे ते म्हणाले की अद्याप प्रस्ताव नाही पण भविष्यात काहीही होऊ शकतं. यावरून त्यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
शरद पवारांनी सत्ता स्थापनेबाबत संकेत दिले असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार संजय मिसकीन यांनी व्यक्त केलं. ते सांगतात, "शरद पवारांच्या या वक्तव्याने सत्तेचं समीकरण बदलणारे दरवाजे उघडले आहेत असं आपण म्हणू शकतो. पवारांनी चर्चेसाठी आपण तयार आहोत असं सांगून संकेत दिला आहे. उद्या त्यांची आणि सोनिया गांधी यांची पुन्हा चर्चा होईल त्यानंतर पुडची दिशा स्पष्ट होईल."
'शिवसेना-भाजप यांच्यात परस्पर अविश्वास'
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना आव्हान देण्याची संधी म्हणूनही शरद पवार याकडे पाहत असतील अशी एक शक्यता ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी यांनी व्यक्त केली आहे. ते सांगतात, "भाजप आपल्याला मोठं होऊ देणार नाही हे शिवसेनेला पक्कं माहिती आहे. भाजपच्या सर्वाधिक जागा आहेत. तरीही ते सरकार स्थापन करू शकलेले नाहीत. राज्यपाल त्यांना बोलावू शकतात पण तसंही झालेलं नाही."
पुढे ते सांगतात, "शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा सामाईक शत्रू भाजप आहे. भाजपने शिवसेनेला दुखावलं असेल तर हे तीन पक्ष एकत्र येऊ शकतात. हा मुकाबला शरद पवार विरुद्ध नरेंद्र मोदी किंवा अमित शाह असा आहे."
"भाजपच्या राज्यातील नेतृत्वात केंद्रीय नेतृत्वाला काही विचारण्याची ताकद नाही. निकालात भाजपला सर्वाधिक जागा आहेत मात्र तरीही त्यांचं सरकार स्थापन झालेलं नाही. हे लोकशाहीत अपवादानेच घडतं. शिवसेना आणि भाजप यांच्यात परस्पर अविश्वास आहे म्हणून हे होतं आहे', असं केसरी यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)