निर्मला सीतारमण: भारतीय अर्थव्यवस्था आव्हानांना तोंड देतेय #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात.

1) भारतीय अर्थव्यवस्था आव्हानांना तोंड देतेय - निर्मला सीतारमण

भारत सध्या आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे, असं भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या. व्ही. अनंता नागेश्वरन आणि गुलजार नटराजन यांच्या अर्थविषयक पुस्तकाच्या प्रकाशनावेळी अर्थमंत्री सीतारामण यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात उपस्थितांशी संवाद साधला. मनी कंट्रोलनं ही बातमी दिलीय.

"हे पुस्तक लोकप्रिय होईलच, मात्र धोरणात्मक निर्णयांसाठी उपयुक्त ठरेल. दुसरं म्हणजे, पुस्तकाच्या प्रकाशानाची वेळही अत्यंत महत्त्वाची आहे. आपण सध्या आर्थिक आव्हानांना तोंड देतोय," असं सीतारमण म्हणाल्या.

भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ गेल्या सहा वर्षातली सर्वांत कमी म्हणून नोंदवली गेलीय. पहिली तिमाहीत ही वाढ 5 टक्क्यांवर आली आहे.

2) BSNL च्या 57 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचे स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी दूरसंचार कंपनीतील 57 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. लाईव्ह मिंटनं ही बातमी दिलीय.

स्वेच्छानिवृत्तीसाठी बीएसएनएलनं विशेष योजना आणली आहे. 4 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या काळाता निवृत्ती घेता येईल.

स्वेच्छानिवृत्ती 31 जानेवारी 2020 पासून लागू होईल, अशी माहिती बीएसएनएलनं दिली.

3) अयोध्या : NSA अजित डोभाल यांची धार्मिक नेत्यांसोबत बैठक

रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादासंदर्भात सुप्रीम कोर्टात निकाल लागल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून देशात कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली होती. सामाजिक सलोखा कायम राहावा म्हणून धार्मिक नेत्यांचीही मदत घेण्यात आली. याचाच भाग म्हणून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी देशातील धार्मिक नेत्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. द हिंदूनं ही बातमी दिलीय.

देशातील किंवा परदेशातील राष्ट्रविरोधी शक्ती परिस्थितीचा गैरफायदा घेऊन राष्ट्रहिताला बाधा पोहोचवू शकतात, याची उपस्थिती धार्मिक नेत्यांना कल्पना होती, असं जारी केलेल्या निवदेनात म्हटलं आहे.

शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी सरकारला मदत करण्याचं आश्वासन हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही धार्मिक नेत्यांना या बैठकीतून आवाहन करण्यात आलं.

4) अयोध्येतली जमीन स्वीकारण्याबाबत सुन्नी वक्फ बोर्ड 26 नोव्हेंबरला निर्णय घेणार

अयोध्या निकालात सुप्रीम कोर्टानं 5 एकर जमीन मशिदीसाठी दिली. मात्र, ही जागा स्वीकारायची की नाही, याचा निर्णय सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाकडून येत्या 26 नोव्हेंबरला घेतला जाणार आहे. इंडिया टुडेनं ही बातमी दिलीय.

13 नोव्हेंबर रोजीच सुन्नी वक्फ बोर्डाची बैठक नियोजित होती. मात्र, अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवरबैठक पुढे ढकलण्यात आली. 26 नोव्हेंबरला बैठक होण्याची शक्यता असून, याच बैठकीत जमिनीबाबतचा निर्णय घेतला जाईल.

दुसरीकडे, ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड अयोध्या प्रकरणावरील निकालावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे.

5) टी 20 मालिका : भारताचा बांगलादेशवर विजय

बांगलदेशविरूद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवून भारतानं मालिकाही जिंकली आहे. भारतानं 2-1 असा या टी-20 मालिकेवर विजय मिळवला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांची अर्धशतकं यामुळं भारतानं बांगलादेशपुढे 175 धावांचं आव्हान ठेवलं होतं. तर भारतीय गोलंदाज दीपक चहरची हॅटट्रिक साधली. चहरनं 7 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. 'सामनावीर' म्हणूनही चहरला गौरवण्यात आलं.

भारतानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची दमछाक झाली. नईम आणि मिथून यांची भागीदारी सुरू असतानाच मिथून 27 धावांवर बाद झाला. त्यानंतर नईमही 81 धावांवर परतला. त्यामुळं बांगलादेशचा डाव 144 धावांवरच आटोपला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)