अयोध्या प्रकरण: के. परासरन - सुप्रीम कोर्टात हिंदू पक्षाची बाजू मांडणारे देणारे 93 वर्षांचे वकील

बाबरी मशीद-राम मंदिर वादग्रस्त जमिनीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं ही जमीन राम मंदिरासाठी देण्याचा निर्णय दिला आहे. या बरोबरच सर्वोच्च न्यायालयानं सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच योग्य ठिकाणी पाच एकर जमीन देण्याचे आदेशही दिले आहेत.

रामलल्ला विराजमानतर्फे वरिष्ठ वकील के. परासरन यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. परासरन 93 वर्षांचे आहेत. त्यांच्याबरोबर तरुण वकिलांची टीम या खटल्यात कार्यरत होती.

तमिळनाडूमधल्या श्रीरंगम येथे 9 ऑक्टोबर 1927 रोजी परासरन यांचा जन्म झाला. तमिळनाडू राज्यात त्यांनी महाधिवक्तापदावर काम केलं आहे. तसंच त्यांनी अॅटर्नी जनरल म्हणूनही कार्य केले आहे.

याशिवाय 2012 ते 2018 या कालावधीत राज्यसभेचे सदस्यही होते. परासरन यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषणने गौरवण्यात आले आहे.

हिंदू कायद्याचे विशेषतज्ज्ञ

परासरन कायद्याचे पदवीधर आहेत. हिंदू कायद्यात त्यांना गोल्ड मेडलने गौरवण्यात आले आहे. त्यांनी पन्नासच्या दशकात वकिली सुरी केली.

परासरन यांचे काँग्रेस पक्षाशी जवळचे संबंध होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात राज्यघटनेच्या कामकाजातील समीक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या संपादकीय समितीमध्येही त्यांचा सहभाग होता.

हिंदू धर्मावर त्यांचं प्रभुत्व असल्यानं या खटल्यात त्यांना इतकं स्वारस्य होतं. खटल्याच्या 40 दिवस चाललेल्या सुनावणीसाठी ते स्वतः फार मेहनत घेत होते, असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

सलग 40 दिवस सकाळी 10.30 वाजता सुनावणीला सुरुवात व्हायची आणि संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत संपायची. परंतु सुनावणीला सुरुवात होण्यापूर्वीच परासरन खटल्यातल्या सर्व गोष्टींवर बारकाईनं काम करायला सुरुवात करायचे.

परासरन यांच्या टीममध्ये पी. व्ही. योगेश्वरन, अनिरुद्ध शर्मा, श्रीधर पोट्टाराजू, आदिती दाणी, अश्विन कुमार DS आणि भक्ती वर्धन सिंह आदी तरुण वकिलांचा समावेश होता. परासरन यांची या वयातली ऊर्जा आणि स्मरणशक्ती पाहून थक्क व्हायला व्हायचं, असं त्यांचे टीममधले सदस्य सांगतात.

सर्व महत्त्वपूर्ण खटले ते सलग म्हणून दाखवायचे, त्यांची स्मरणशक्ती फारच तीक्ष्ण आहे.

परासरन यांचे सर्वोच्च न्यायालयातील खटले

रामलल्ला विराजमान ऊर्फ भगवान श्रीरामाच्या वतीने परासरन यांनी खटला लढला. या प्रकरणी ते म्हणाले होते की, या खटल्यात ठोस पुराव्यांमध्ये थोडी सूट द्यायला हवी. कारण या जमिनीवर प्रभू श्रीराम यांचे अस्तित्व असल्याचा ठाम विश्वास हिंदू जनतेत आहे, म्हणूनच या ठिकाणी श्रद्धाळू लोकांचा या जमिनीत जीव अडकला आहे.

यावर येशू ख्रिस्त बेथलहॅमला जन्मले होते, त्याबद्दल कुठल्या न्यायालयात प्रश्न उभा राहिलाय का? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. ए. बोबडे यांनी परासरन यांना केला होता.

याशिवाय त्यांनी सर्वोच्च न्यायालयापुढे अन्य काही दावेही केले होते. यातील प्रमुख दावा होता, की प्रभू राम हे एक न्यायिक व्यक्ती आहे. ही भूमी अविभाज्य आहे, त्यामुळे त्यावर कुणाचा संयुक्त ताबा असू शकणार नाही. वादग्रस्त भूमी म्हणजे साक्षात प्रभू श्रीराम असल्याचं परासरन यांनी म्हटलं होतं. हिंदू धर्म मूर्तींशिवाय सूर्य, नदी, वृक्ष यांच्यातील देवत्वही मानते. यामुळेच भूमीही देवाचेच स्वरूप आहे, असं परासरन यांनी सांगितलं होतं.

राम जन्मभूमीबरोबरच परासरन यांनी बाबरी मशिदीच्या निर्मितीवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. दुसरं धार्मिळ स्थळ नष्ट करून बाबरी मशीद बांधलेली असल्यानं, मुस्लीम कायद्यानुसार ती स्थापन करण्यात आली आहे, असं म्हणता येणार नाही, असंही ते म्हणाले होते. याशिवाय त्यांनी आणखी एक दावा केला होता की बाबरी मशीद बंद मशिदीच्या स्वरूपात ठेवण्यात आल्यानं, येथे मुस्लिमांनी नमाज पढणं बंद केलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)