अयोध्या: 1992 पूर्वीच्या आणि आताच्या मुंबईत काय फरक आहे?

सुप्रीम कोर्टाने अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणाबाबत सुनावलेल्या निकालाविषयी बीबीसी मराठीचे पत्रकार मयुरेश कोण्णूर यांनी रेडिफ डॉट कॉमचे जेष्ठ संपादक सय्यद फिरदौस अश्रफ आणि ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांच्याशी बातचीत केली.

अयोध्येविषयी जो निकाल आलाय त्याबद्दल आपल्याला काय वाटतं?

सय्यद फिरदौस अश्रफ - हा निकाल काहीसा अपेक्षितच होता. ट्रिपल तलाकचा निर्णय असो किंवा ज्याप्रकारे बाकीच्या गोष्टी घडत होत्या, त्यामुळे मुस्लिम समाजाला असं काही घडू शकतं, याचा काहीसा अंदाज होता. कारण मुस्लिम समाजाविषयी या सरकारने काही खूपच बोल्ड निर्णय घेतलेले आहेत. आणि त्याला विरोधही होत नव्हता.

कोणत्याही समाजात दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. त्या म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था. कायद्याचं सगळ्यांनी पालन करणं अपेक्षित असतं. कायदा असेल तरच सुव्यवस्था राहते. या निर्णयानंतर जर सगळ्यांनी कायदा पाळला, तरच समाजात सुव्यवस्था राहील. जो काही निर्णय आहे, तो आपण स्वीकारायला हवा.

जतीन देसाई - या निकालाबद्दल बरंच काही बोलण्यासारखं आहे. या निकालाबद्दल निश्चितच माझे काही मतभेद आहेत. पण मला असं वाटतं की कुठेतरी आता हा जो काही वाद आहे तो सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे थांबलेला आहे. यापुढे असे मुद्दे निर्माण होणार नाहीत, याकडे आपणं पाहिलं पाहिजे. या निकालामुळे एक 'फुलस्टॉप' - पूर्णविराम मिळालेला आहे. यातनं आपण एक धडा घेतला पाहिजे की अशा प्रकारचे जे काही मुद्दे असतात, त्यात आपण अडकून पडता कामा नये.

या जागेसाठी हिंदू आणि मुसलमान दोघांनी दावे केले होते. आता मुस्लिम समाजाला दुसरीकडे जागा देण्यात यावी असं सांगण्यात आलंय. याकडे मुस्लिम समाज कसं बघेल?

सय्यद फिरदौस अश्रफ - निराशा तर असणारच. जी जागा कायदेशीररीत्या मुस्लिम समाजाची होती, तिथून बाहेर काढल्यासारखं त्यांना वाटणार. सुप्रीम कोर्टाने इतकंच म्हटलं की बाबरी मशीद पाडली जाणं योग्य नव्हतं. हे लॉलीपॉप देण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही पण खुश व्हा. पण महत्त्वाचं हे आहे की आता 25 वर्षांत मुस्लिम समाजातही सगळं बदललेलं आहे. जग बदललंय. भारत देश सेक्युलर आहे. इथे अनेक धर्म आहेत.

भारतात 16 कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे. हा आकडा मोठा आहे. नवीन पिढी यासगळ्या समस्यांकडे स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहते. आपण त्यांच्यासाठी हे ठरवू शकत नाही. माझी मुलगी कदाचित म्हणेल की, एक मशीद गेली तर काय फरक पडतो, आपण तिथे जाणार होतो का? पण माझी पिढी कदाचित त्या सगळ्या मशिदींशी इमोशनली अटॅच्ड होती. नवीन जनरेशनच्या नवीन अडचणी असतात.

या सगळ्यांत जवळपास एक - दीड पिढी गेली. तेव्हाची मुंबई कशी होती आणि आताची मुंबई कशी आहे?

सय्यद फिरदौस अश्रफ - एक गोष्टी नक्की आहे की मुस्लिमांना मुंबईत घर मिळणं खूप कठीण झालंय. 92च्या दंगलींनंतर हा एक अलिखित नियम झालाय. ज्या मुस्लिम वस्त्या आहेत तिथे त्यांना घरं मिळतील किंवा इतर कुठेतरी एखाद-दोन घरं. पण मराठी लोकांनाही घरं मिळत नाहीत, हे मुंबईचं वास्तव आहे.

गुजराती भागात घरं मिळत नाहीत, नॉनव्हेज खातात म्हणून घरं मिळत नाहीत, हे वास्तव आहे. म्हणजे मुस्लिमांसोबतच भेदभाव होतोय असं नाही. प्रत्येकासोबतच वेगवेगळ्या प्रकारे भेदभाव होतोय.

जतीन देसाई - त्या काळात एक भीती होती. मला आठवतंय आम्ही तीन- चार दिवस ऑफिसमध्येच होतो. घरी जाणं शक्यच नव्हतं. पण एका रात्री घरी रहायचा निर्णय घेतला. माझ्यासोबत आऊटलुकचा पत्रकार अजित पिल्लई होता.

आम्ही रात्री ट्रेन पकडली त्या आख्या ट्रेनमध्ये आम्ही दोघेच प्रवासी होतो. अंधेरी स्टेशनच्या अलीकडे स्टेशनला ट्रॅकला लागून ज्या बिल्डिंग आहेत, त्या सगळ्यांनी कोण हल्ला करायला येतंय का, हे आधीच कळावं म्हणून मोठमोठे फ्लड लाईट्स लावलेले होते. त्याकाळात सोशल मीडिया, इंटरनेट नसलं, तरी बातम्या वेगाने पोहोचत होत्या. आणि लोक त्याकाळात खूप रिअॅक्ट झाले.

कारण लोक भावनिक पातळीवर जोडले गेलेले होते. पण आता पुलाखालून खूप पाणी वाहून गेलेलं आहे. मुस्लिम समाज असो वा हिंदू समाज या दोघांनाही असं वाटतंय की जे झालं ते झालं, तो इतिहास आहे आणि आपण त्याच्या पुढे जायला हवं.

यानंतर अनेक राजकीय स्थित्यंतरं झाली. अशा प्रकारच्या घटनांचे राजकीय परिणाम होणार नाहीत, अशा टप्प्यावर आपण आज आलेलो आहोत का?

जतीन देसाई - आज जर आपण पाहिलं, तर आज एकूण परिस्थिती बदललेली आहे. आज भाजपचं सरकार आहे. तेव्हा भाजपचं सरकार उत्तर प्रदेशात असलं तरी देशावर त्यांचं सरकार नव्हतं. आज सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलाय त्याकडे लोकं अशा स्वरूपाने पाहत आहेत की हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि यात केंद्र सरकारची भूमिका नाहीये.

हा निकाल म्हणजे आपला विजय मानणाऱ्यांनीही कुठेतरी हे मान्य केलंय, की हा विजय त्यांना नरेंद्र मोदी सरकारमुळे नाही तर सुप्रीम कोर्टामुळे मिळालाय. मला वाटतं याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न निश्चितच काही प्रमाणात होईल.

हा निकाल जर हिंदूंच्या बाजूने आला तर केंद्र सरकारला त्याचं श्रेय घेता येणार नाही हे काल उद्धव ठाकरेंनीही बोलून दाखवलं होतं. त्यांनी मांडलेली ही भूमिका अत्यंत सकारात्मक असल्याचं मला वाटतं. सगळ्यांनी कायद्याचं राज्य मान्य केलं पाहिजे. लोकशाहीचा तो गाभा आहे.

सय्यद फिरदौस अश्रफ - 2014पासून हिंदू समाजामध्ये एक जाग आलेली आहे. इराणमध्ये 1979ला असं झालं होतं. आपण त्या दिशेने जात आहोत. पण भारतात अनेक धर्म आहेत. पण आता सेक्युलर म्हणजे 'प्रो - मुस्लिम' म्हणजे मुस्लिम धार्जिणे अशी काहीशी समजूत हिंदू समाजात झालेली आहे. काँग्रेस पार्टी म्हणजे मुस्लिम पार्टी असं मत झालंय. मला वाटतं भाजपला याचा नक्कीच फायदा मिळणार. कारण शेवटी हा निर्णय मोदी सरकारच्याच काळात झालाय. मी हिंदू समाज अत्यंत जवळून पाहिलेला आहे. मी त्यांच्यासोबत राहिलो आहे.

हिंदू समाजात एक 'टेक्टॉनिक शिफ्ट' झालाय. आणि मुस्लिम समाजाबाबत बोलायचं झालं तर तरुणांना काय वाटतंय हे अनेकांना माहितच नाही. म्हणून आता जरी सगळं काही ठीक असल्याचं वाटत असलं, तरी कोणाच्या डोक्यात काय चालू आहे हे या क्षणाला सांगणं कठीण आहे. कारण राग हा नेहमीच आत कुठेतरी धुमसत असतो. लोकं विसरत नाहीत. त्यांच्या मनात हे राहतंच. कधी कुठे काही झालं, तर हे उफाळून बाहेर येतं. म्हणूनच आपल्याला सोशल मीडियासकट सगळ्यावर नियंत्रण ठेवायला हवं. म्हणजे तिरस्काराला खतपाणी मिळणार नाही.

समजा निर्णय आपल्या बाजूने लागला नाही, तरी शांतता बाळगावी, आंदोलन करू नये, असं मुंबईतल्या सगळ्या मशिदींमधून आवाहन करण्यात आलं. समाजातून असे प्रयत्न करण्यात येतायत. पोलीस नेत्यांशी बोलताहेत. या सगळ्या चांगल्या गोष्टी असल्या, तरी घटना या एका क्षणात घडतात. म्हणून आपण कायम दक्ष असायला हवं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)