अयोध्या : रामजन्मभूमी-बाबरी मशीद निकालानंतर पाकिस्तानमध्ये उमटल्या अशा प्रतिक्रिया

अयोध्या निकाल हा कायद्याला अनुसुरून आहे की भाजपच्या जाहीरनाम्यानुसार आहे, अशी टीका पाकिस्तानने केली आहे.

शनिवारी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगाई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सर्वसंमतीने वादग्रस्त जमिनीसंदर्भात निकाल दिला. रामलल्लाच्या बाजूने हा निर्णय लागला आणि मुस्लिम पक्षाला स्वतंत्र अशी पाच एकर जमीन मशिदीसाठी देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.

देशभरातून विविध पक्षांनी, संघटनांनी संयमाने प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मात्र पाकिस्तानने आक्रमकपणे नाराजी व्यक्त केली.

पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "जगाने पुन्हा एकदा भारताचा कट्टरवादी चेहरा पाहिला. 5 ऑगस्टला भारताने काश्मीरला असलेला घटनात्मक विशेष दर्जा रद्द केला. आज बाबरी मशिदीसंदर्भात निर्णय झाला. पाकिस्तानने अन्य धर्मांचा आदर करत गुरु नानक यांच्या भाविकांना कर्तारपूर कॉरिडॉर खुला केला," असं त्यांनी म्हटलं आहे.

अयोध्येसंदर्भातील निकाल म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कट्टरतेची झलक आहे असं मत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी रेडिओ पाकिस्तानशी बोलताना सांगितलं.

"पाकिस्तानने ज्या दिवशी कर्तारपूर कॉरिडॉर खुला केला त्याच दिवशी अयोध्येचा निर्णय का यावा? भारतातील मुसलमान आधीच दडपणाखाली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर हे दडपण आणखी वाढेल" असं ते म्हणाले.

कुरेशी यांच्या मते या निर्णयाने भारताचा सेक्युलर चेहरा उघड झाला आहे.

भारताविरुद्ध नेहमीच वादग्रस्त विधानं करण्यासाठी प्रसिद्ध पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी अयोध्येसंदर्भातील निकाल लाजिरवाणा, फालतू, बेकायदेशीर आणि अनैतिक असल्याचं म्हटलंय.

"ज्या वेळी हा निकाल जाहीर करण्यात आला त्यावरून अनेक प्रश्न निर्माण होतात. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल याच आठवड्यात का जाहीर केला? पाकिस्तानने शीख भाविकांसाठी कर्तारपूर कॉरिडॉर खुला केला त्यावर प्रतिक्रिया म्हणून भारताने हे केलं का? हा निकाल कायद्यावर आधारित आहे का भाजपच्या जाहीरनाम्यानुसार?"

पाकिस्तानामधील समा टीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार नदीम मलिक यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे,"भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त निर्णय दिला आहे. वादग्रस्त जमीन हिंदूंच्या मंदिरासाठी देण्यात आली आहे. 460 जुनी मशीद हिंदूंनी 1992 मध्ये पाडली. मुसलमानांना मशिदीसाठी पाच एकर जमीन स्वतंत्र ठिकाणी देण्यात येणार आहे."

पाकिस्तानमध्ये ट्वीटरवर बाबरी मशीद हॅशटॅग ट्रेंड करत होता.

दुसऱ्या क्रमांकावर अयोध्या व्हर्डिक्ट आणि पाचव्या क्रमांकावर राम मंदिर हॅशटॅग होता.

बशीर अहमद ग्वाख नावाच्या पत्रकाराने या हॅशटॅगच्या माध्यमातून पाकिस्तानच्या भूमिकेचा निषेध केला आहे. "पाकिस्ताने अयोध्या निकालावरून नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे पाकिस्तानातील अहमदिया मशीद पंजाबमधील हासिलपूर इथं तोडण्यात आली."

दरम्यान भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला परखड शब्दात उत्तर दिलं आहे. 'भारताच्या अत्यंत अंतर्गत अशा विषयावर, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पाकिस्तानने अश्लाघ्य आणि अनावश्यक टीका आम्ही फेटाळतो. सर्वधर्मीयांचा सन्मान आणि कायद्याचा आदर हा आमच्या संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे पाकिस्तानला याचं आकलन न होणं साहजिक आहे. द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने भारताच्या अंतर्गत मुद्यावर अहमहमिकेने पाकिस्तानने प्रतिक्रिया देणं ही पाकिस्तानची अपरिहार्यता आहे', अशा शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)