You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवसेना: आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करावं या मागणीचा अर्थ काय?
विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला 105 जागा मिळाल्या आणि शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. आम्हाला सत्तेमध्ये समान वाटा हवा आहे असं शिवसेनेनं भाजपला स्पष्ट सांगितलं आहे.
मुख्यमंत्रिपद अडीच वर्षांसाठी देणार असाल आणि ते ही लिखित स्वरूपात लिहून देणार असाल तरच आम्ही तुमच्यासोबत सत्तेत येऊ असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
इतर खातीही 50:50 टक्के द्यावीत हे असं शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी निवडून आलेल्या शिवसेना आमदारांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेच्या आमदारांनी अशी मागणी केली की अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देऊ असा प्रस्ताव लिखित स्वरूपात दिला तरच भाजपसोबत सत्ता स्थापन करायची.
शिवसेनेच्या प्रस्तावाबाबत भाजपचा काय विचार आहे असं भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांना विचारलं असता ते म्हणाले शिवसेनेच्या या मागणीवर निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार पक्षाचे अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेतील.
30 ऑक्टोबर रोजी भाजपच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळाच्या नेत्याची निवड होणार आहे. त्यानंतरच भाजप आपली प्रतिक्रिया देणार असल्याचं भाजपचे नेते सांगत आहेत.
पुढचा मुख्यमंत्री मीच होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे असं बीबीसी प्रतिनिधीने शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांना विचारलं त्यावर ते म्हणाले की अडीच वर्षं ते मुख्यमंत्री राहू शकतात. त्यांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल.
शिवसेनेकडून कोण मुख्यमंत्री होईल याबाबत सरनाईक यांनी सांगितलं की आदित्य ठाकरे हे युवकांच्या गळ्यातील ताईत आहेत आणि ते मुख्यमंत्री व्हावेत अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. पण अंतिम निर्णय हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच राहील.
मातोश्रीबाहेर आदित्य ठाकरे यांचे होर्डिंग लावण्यात आलं आहे. 'CM महाराष्ट्र फक्त आदित्य साहेब ठाकरे' असं होर्डिंगवर लिहिलं आहे.
शिवसेनेचं दबावतंत्र?
शिवसेना आणि आमच्यात आधीच ठरलंय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. पण जर त्यांचं आधीच ठरलं आहे तर शिवसेनेनी ही मागणी करण्यामागचा अर्थ काय हे बीबीसीनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
"शिवसेना भाजप यांचं नेमकं काय ठरलंय ते काहीच सांगायला तयार नाहीत. त्याचं जर आधीच सगळं ठरलं असेल तर पुन्हा लेखी लिहून द्यायची काय गरज आहे," असा प्रश्न ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई मांडतात.
देसाई सांगतात, "प्रताप सरनाईकांनी बाहेर जाऊन असं सांगणं म्हणजे दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मागताना पहिल्यांदा कोण मुख्यमंत्री होणार, हे त्यांना ठरवून घ्यायचं असेल."
"पण दुसऱ्या बाजूने विचार करायचा झाला तर युतीसोबत निवडणूक लढवलेली असल्याने भाजपसोबत त्यांना जावंच लागेल. भाजप मुख्यमंत्रिपद देणार नाही, हे शिवसेनेला माहीत आहे. पण तरीसुद्धा महत्त्वाच्या खात्यांवर दावा करण्यासाठी मुख्यमंत्रिपद मागणं आणि ते पद मिळत नसेल तर महसूल, नगरविकास आणि गृह मंत्रालयासारखी खाती मिळवणं, हे शिवसेनेचं प्रमुख ध्येय आहे," असे देसाई सांगतात.
समान विचारांची प्रतिमा असल्याची अडसर
एकमेकांचे समान हिंदुत्ववादी विचार ही शिवसेनेची अडसर असल्याचं देसाई सांगतात. ते सांगतात, "दोन्ही पक्षांची प्रतिमा हिंदुत्ववादी अशी आहे. समान विचारसरणी असल्यामुळे दोन्ही पक्षांना वाढण्यासाठी एकमेकांना कमकुवत करणं गरजेचं आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांना एकमेकांची जागा घ्यायची आहे.
"अशा स्थितीत शिवसेनेला हिंदुत्ववादी विचार सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत राहावं लागेल. त्यांनी असं केलं तरच भाजपसमोर त्यांचा टिकाव लागू शकतो. अशा प्रकारचं राजकारण त्यांना दीर्घकाळासाठी फायद्याचं ठरेल," देसाई सांगतात.
काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर शिवसेना जाईल का?
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, "शिवसेनेने पूर्वी जे ठरलंय ते द्या अशी मागणी केली आहे. निवडणुकीत अर्ध्या जागांचं आश्वासन भाजपनं पाळलं नाही. बाकीच्या गोष्टी तरी पाळल्या जाव्यात म्हणून बदललेल्या संख्याबळानुसार शिवसेनेने आवाज वाढवला आहे.
ते पुढे सांगतात, "असं असलं तरी कांग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन ते सत्ता मिळवतील अशी शक्यता नाही. हेच राष्ट्रवादी काँग्रेसने ओळखलं आहे. त्यामुळे शिवसेना सोबत येणार नसल्याचं लक्षात आल्यामुळेच त्यांनी सत्तेच्या मागे जाणार नसल्याचं म्हटलं आहे."
निवडणुकीआधी युती झाल्यामुळे पेच?
देशपांडे सांगतात, "कर्नाटक निवडणुकीचं उदाहरण दिलं जात आहे. पण तिथं धर्मनिरपेक्ष जनता दल, काँग्रेस आणि भाजप हे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. पण महाराष्ट्रात युती-आघाडी करून निवडणूक झाली आहे. त्यामुळे आता वेगळं व्हायचं असेल तर त्याचे परिणामही होतील. केंद्रात भाजपचं सरकार आहे. त्यामुळे शिवसेनेनं वेगळा प्रयोग केल्यास भाजप त्यांना सुखाने नांदू देईल, याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आहे त्याच युतीत राहून जास्तीत जास्त मिळवण्यासाठी प्रयत्न ते करतील."
भाजपचं काम पद्धतशीरपणे सुरू
भाजपने विधिमंडळ नेता निवडीसाठी पक्षाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे ते काही शिवसेनेसाठी थांबलेले नाहीत. त्यांचं नियोजन त्यांच्या कार्यक्रमानुसार सुरू आहे, असं देशपांडे यांना वाटतं.
ते सांगतात, "सध्यातरी शिवसेना तुटेल इतकं ताणणार नाही. किमान शेवटचं एक वर्ष किंवा मध्ये एखादं वर्ष मुख्यमंत्रिपद मागू शकतात. अडीच वर्ष त्यांना मुख्यमंत्रिपद मिळणं सध्या तरी कठीण आहे.ज्याप्रमाणे भाजपने 124 जागा म्हणजेच 50:50 जागावाटप असं शिवसेनेला मान्य करायला लावलं. तसंच एक वर्ष मुख्यमंत्रिपद म्हणजेच 50:50 असं भाजप शिवसेनेला मान्य करण्यास भाग पाडू शकतं."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)