You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कणकवली: नितेश राणे विजयी, शिवसेनेचे सतीश सावंत पराभूत
कोकणातील सर्वांत लक्षवेधी लढत म्हणून कणकवली विधानसभा मतदारसंघाकडे पाहिलं गेलं. या लढतीमध्ये भाजपचे नितेश राणे विजयी झाले आहेत. त्यांनी सतीश सावंत यांचा पराभव केला.
राज्यभरात युती असतानाही कणकवलीत भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेनं सतीश सावंत यांच्या रूपानं उमेदवार दिला गेला.
कशी झाली ही लढत?
कणवली मतदारसंघात कणकवली, देवग, वैभववाडी अशी तीन तालुके येतात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला म्हणून कणकवलीची ओळख आहे.
कुठलीही जातीय समीकरणं नसलेला मतदारसंघ असल्यानं नेते आणि पक्षांचा प्रभाव, परंपरागत राजकीय संघर्ष आणि स्थानिक मुद्दे यांभोवतीच कणकवलीची निवडणूक फिरते.
राणे विरुद्ध शिवसेना
यंदा निवडणुकीच्या तोंडावर नितेश राणे पक्षांतर करून, भाजपच्या तिकिटावर लढत आहेत.
दुसरीकडे, नितेश राणे हे भाजपचे उमेदवार असूनही शिवसेनेनं पाऊल मागे न घेता, तिथे उमेदवार देत राणेंविरोधातील जुना संघर्ष कायम ठेवलाय.
राणे विरूद्ध ठाकरे हा वाद आता दशकभराहून अधिक काळाचा झालाय. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या काही टप्पांनी या वादावरच वळणं घेतल्याचं दिसून आली.
2014च्या निवडणुकीनंतर काय झालं होतं?
2014 साली कणकवलीतून काँग्रेसच्या तिकिटावर नितेश राणे जिंकले होते.
दरम्यानच्या काळात नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला आणि भाजपच्या तिकिटावर राज्यसभेत गेले.
नितेश राणे हे या काळात काँग्रेसचेच आमदार होते. मात्र काँग्रेसवर टीका करण्यासह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या व्यासपीठांवरही ते दिसायचे. त्यामुळे ते काँग्रेस सोडणार हे निश्चित मानलं जातं होतं. झालंही तसंच. नितेश राणे यांनी छोटेखानी कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला.
त्यामुळे विधानसभा निकालानंतर सिंधुदुर्गात कुणाची ताकद हे स्पष्ट होईलच. मात्र सिंधुदुर्गासह इतरत्र राणे आणि शिवसेना यांच्यातील संबंध कसे राहतील, हे ठरण्यासही सिंधुदुर्गातील निकाल महत्त्वाचे ठरतील.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)