You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार यांच्या कौतुकात राष्ट्रवादीतल्या समस्या झाकल्या जात आहेत का?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि शिवसेना-भाजपनं बहुमत मिळवलं. मात्र, 2014 च्या तुलनेत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या जागांची संख्या कमी झाली. या पिछेहाटीला शरद पवारांचा झंझावात कारणीभूत असल्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आणि त्यामुळं शरद पवारांवर कौतुकही सुरू झालं.
शिवसेना-भाजपनं सत्ता राखली, मात्र चर्चेच्या केंद्रस्थानी शरद पवार राहिले. कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा 41 वरून 54 वर गेल्या. शिवाय, अवघ्या विरोधी पक्षांचा चेहरा बनलेल्या शरद पवारांमुळं काँग्रेसच्याही जागा वाढल्या. काँग्रेसच्या जागा 42 वरून 44 वर गेल्या.
शरद पवार यांनी वय वर्षे 79 असूनही, राज्यव्यापी दौरा करत प्रचार केला. साताऱ्यात तर भर पावसात सभा घेतली आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. परिणामी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना पराभव पत्कारावा लागला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतली कामगिरी
शरद पवारांच्या राज्यव्यापी दौरा आणि प्रचारसभांमुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढल्या असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष म्हणून प्रभावाची चर्चा आता होऊ लागलीय. शरद पवार यांचं कौतुक होत असल्यानं, त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या समस्या झाकल्या जातायत का, हा प्रश्न समोर आलाय.
राष्ट्रवादीचं नेतृत्त्व कोण करणार?
वयाच्या 79 व्या वर्षीही शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा बनले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही ठोस नेतृत्त्व पुढे आणलं जात नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा कुणाच्या खांद्यावर दिली जाणार, याची चर्चा सुरू असताना, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचं नाव पुढे येतात. आता रोहित पवार यांचंही नाव चर्चेत असतं.
ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित म्हणतात, "राष्ट्रवादीला प्रोत्साहनाची गरज होती, संघ एकत्र येण्याची जी गरज असते, ती शरद पवारांनी नक्कीच केली. मात्र, वय विचारात घेता त्यांना दुसरी फळी, त्यांना काय काय काम द्यावं आणि कशाप्रकारे त्यांची रचना करावी, याचा विचार करावाच लागेल."
तसेच, "नवीन पिढीकडे सूत्र देताना, नवीन पिढीत सामंजस्य कसं राहील, याकडे शरद पवारांनी लक्ष द्यायला हवं. शरद पवारांना आता धोनीसारखं काम करावं लागेल. स्वत: उत्तम खेळतातच, मात्र संघातलं बेस्ट टॅलेंट पुढे आणावं लागेल," असंही प्रशांत दीक्षित म्हणाले.
तर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर म्हणाले, "तरूण नेतृत्व नेमकं कुणाकडे द्यायचं हा पेच आहे. जर पवार कुटुंबातल्याच तरुणांकडे राहिलं, तर राष्ट्रवादी हा पवारांचा पक्ष आहे, हा शिक्का कायम राहील आणि पवार कुटुंबाच्या बाहेर नेतृत्व गेलं, तर पक्षातील अंतर्गत गटबाजी वाढेल, हा तो पेच आहे."
"एकूणच सरकारी पक्ष म्हणून जो पवारांच्या तरूण नेत्यांवर शिक्का बसलेला आहे, त्यातून बाहेर येऊन लोकांचा पक्ष आणि लोकांचा नेता अशी जी पवारांची प्रतिमा आहे, तशी प्रतिमा घडवणारा नेता आता तरी राष्ट्रवादीत कुणी दिसत नाही," असंही पळशीकर निरीक्षण नोंदवतात.
'...अन्यथा पक्ष विस्कटण्याची शक्यता'
याबाबत बोलताना राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. दीपक पवार म्हणतात, "शरद पवारांनी दुसरी फळी तयारी केलीय. त्यात सुप्रिया सुळेंपासून धनंजय मुंडेपर्यंत सगळेच जण आहेत. मात्र, यांच्यातील पवारांचा नेमका वारसदार कोण आहे? की पवार टीम म्हणून काम करून घेऊ इच्छित आहेत का? हे स्पष्ट केले जात नाहीय."
"आता तरी स्वत: शरद पवार फ्रंट रनर म्हणून प्रचार करतायत. मात्र, असा प्रचार ते आणखी किती वर्षे करू शकतील? त्यामुळं पवारांनी एकमुखी नेतृत्त्व उभं केलं नाही, तर मग हा पक्ष विस्कटण्याची शक्यता आहे," असं डॉ. दीपक पवार म्हणतात.
दुसऱ्या फळीचं काय?
विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांची दुसरी फळी फारशी कुठे दिसली नाही. विरोधी पक्ष म्हणून शरद पवार हे नावच कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. मात्र, मग शरद पवारांची दुसरी फळी निष्प्रभ ठरली का, की दुसऱ्या फळीत विसंवाद आहे, असे अनेक प्रश्न समोर येतात.
शरद पवार यांच्यानंतर छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील अशा नेत्यांची फळी आहे. मात्र, हे सर्व आपापल्या जिल्ह्यात किंवा मतदारसंघात अडकून राहिल. बऱ्याचदा तर या फळीतले वादही समोर आले.
बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्यावरून अजित पवार यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत चूक झाल्याचं म्हटलं आणि अप्रत्यक्षरित्या छगन भुजबळांना तोंडघशी पाडलं. नंतर छगन भुजबळांनी बीबीसी मराठीला दिलेल्य मुलाखतीत अजित पवारांनी माहिती घेऊन बोलायलं हवं होतं, असं म्हटलं. त्यामुळं एकूणच दुसऱ्या फळीत विसंवाद दिसून आला.
याबाबत बोलताना डॉ. दीपक पवार म्हणतात, "राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीत जी काही माणसं आहेत, ती संस्थानिक आणि त्यांची मुलं आहेत. अशा संस्थानिक नेत्यांमध्येही मतभेद होतेच. पण हे मतभेद कधीकधी पवारांच्या फायद्याचं होतं, असं वाटतं. कारण सगळेच नेते मग पवारांचे ऐकत. पण एका पातळीवर तोटाही आहे की, ऐंशीव्या वर्षी तुम्हाला धावपळ करावी लागते. त्यातून लोकांनी पाठिंबा दिला, पण हा प्रयोग नेहमी नाही करू शकत."
पक्षसंघटनेचं काय?
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आली. त्यामुळं पक्षातील अनेक नेत्यांनी विरोधक म्हणून भूमिकाच बजावली नव्हती. त्याचा फटका गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसनं अनुभवला आहे.
सत्तेत राहिल्यानंतर लोकांशी फारसा संपर्क राहत नाही, असं जाणकार सांगतात. हेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सद्यस्थितीवरून लक्षात येतं. त्याचवेळी शरद पवारांनी मात्र विरोधक म्हणूनही राज्य आणि देशात काम केलंय.
मात्र, आज ज्यांच्या खांद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस उभी आहे, ते पक्षसंघटनेचं काय करणार आहेत आहेत, हा प्रश्न उरतोच.
त्यावर डॉ. दीपक पवार म्हणतात, "लोकांच्या संपर्कात राहण्याच्या पवारांच्या ताकदीचा राष्ट्रवादीतल्या इतर नेत्यांमध्ये मेळच नाहीय. पवार एसी रूममध्ये बसतात, पण गावातल्या लोकांशी कनेक्ट आहे. राष्ट्रवादीतल्या इतर नेत्यांचं एसी रूमपर्यंतच कनेक्ट राहिलाय आणि त्यांना बांडगूळ स्वरूपाचे नेते लागतात म्हणून संघटन कोसळलंय."
"राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रव्यापी पक्ष नसून, पश्चिम महाराष्ट्र आणि काही प्रमाणात विदर्भात पाठबल असलेला पक्ष आहे. त्यामुळं त्यांनी आता इथल्या स्थानिकांच्या माणसांच्या अपेक्षा काय आहेत, स्थलांतर, मराठी भाषा, शिक्षण इत्यादी गोष्टींबाबत बोलायला हवं. इथल्या लोकांचे मुद्देच तुम्हाला उचलावे लागतील, हे निश्चित," असंही डॉ. दीपक पवार म्हणतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)