You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीड निकाल : जयदत्त क्षीरसागर यांच्यावर संदीप क्षीरसागर यांची मात
बीड मतदारसंघात तब्बल 34 उमेदवार रिंगणात होते. पण खरी लढत झाली ती शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर या काकापुतण्यांमध्ये.
या लढतीत पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी बाजी मारली. संदीप यांना 99 हजार 934 तर जयदत्ती क्षीरसागर यांना 97 हजार 950 मते मिळाली.
अखेरच्या फेरीपर्यंत कोणाचाही विजय निश्चित होत नव्हता मात्र अखेरीस संदीप यांनी विजयाचा गुलाल उधळला.
बीड मतदारसंघ
बीड मतदारसंघात बीड तालुक्यातील- मांजरसुंभा, चौसाळा, नळवंडी, राजुरी नवगण, बीड शहर, शिरूर तालुका आणि रायमोहा हे भाग येतात.
बहुजन वंचित आघाडीने अशोक हिंगे यांना उमेदवारी दिलीय. गेल्या 2014च्या निवडणुकीतल्या मोदी लाटेमध्येही जयदत्त क्षीरसागर हे एकटेच राष्ट्रवादीच्या तिकीटावर बीडमधून निवडून आले होते.
विनायक मेटे यांना 71,002 मतं मिळाली तर जयदत्त क्षीरसागर यांना 77,134 मतं मिळाली होती. तर 2009मध्ये त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा तब्बल 75917 मतांनी पराभव केला होता.
पक्षबदल आणि काका-पुतण्या वाद
धनंजय मुंडे यांच्यावरच्या नाराजीतून जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसने याच मतदारसंघातून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे बीड मतदारसंघातली लढत काका - पुतण्यातली लढत झाली.
क्षीरसागर कुटुंबाच्या तीन पिढ्या या राजकारणात आहेत. केशरबाई क्षीरसागर या काँग्रेसच्या खासदार होत्या. जयदत्त क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर आणि रवींद्र क्षीरसागर ही त्यांची तीन मुलं राजकारणात आहेत. आईसह तिघाही भावांची कारकीर्द आधी काँग्रेसमध्ये गेली आणि नंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर तिघेही राष्ट्रवादीत दाखल झाले.
मात्र राष्ट्रवादीत असतानाच या तिन्ही भावांमध्ये विसंवाद सुरू झाला आणि त्याला कारण ठरलं सत्तेतील वाटा.
आता जयदत्त क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर हे शिवसेनेत, तर रवींद्र क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीत आहेत.
या बीड मतदारसंघामध्ये 21 ऑक्टोबरला 65.49% मतदान झालं. एकूण 3,35,150 मतदारांपैकी 2,19,500 मतदारांनी मतदान केलं.
पारडं कोणाचं जड?
शिवसेनेसाठी बीड मतदारसंघ महत्त्वाचा आहे. शिवसेनेचे सुरेश नवले, सुनील धांडे हे बीडमधून निवडून आलेले होते. आता जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत दाखल झाल्याने इथे पुन्हा एकदा शिवसेनेचा वरचस्मा पहायला मिळू शकतो. पण यामध्ये अनेक गोष्टी महत्त्वाच्या ठरणार असल्याचं ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी सांगतात. ते म्हणतात, "मुळात ही लढत पक्षीय पातळीवर झाली नाही. हा क्षीरसागर कुटुंबातला वाद झाला. सत्तेचं असमान वाटप झाल्याच्या भावनेतून क्षीरसागर कुटुंबात ही फूट पडली.
"राष्ट्रवादी काँग्रेसमधलं संदीप क्षीरसागर यांचं वजन वाढल्याने जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत गेले. पण त्यांचे सगळे विरोधक त्यांच्या विरुद्ध एकवटले आणि या सगळ्यांनी संदीपची पाठराखण केली. मराठा समाज हा संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने उभा आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्या बाजूने भाजपचे परंपरागत मतदार, कट्टर शिवसैनिक आणि त्यांचे स्वतःचे समर्थक आहेत.
"पण पंकजांना क्षीरसागरांना येऊ द्यायचंय का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पंकजांनी त्यांच्यासाठी सभा घेतल्या, पण ते निवडून आल्यास बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर अशी दोन सत्ता केंद्र निर्माण होतील आणि यामुळे आपल्या अधिकारांवर गंडांतर आल्याचं पंकजांना वाटू शकतं. याशिवाय वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम कोणाची मत घेतात, हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणूनच जयदत्त क्षीरसागरांची जागा धोक्यात वाटतेय," सुशील कुलकर्णी सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)