निकाल विधानसभेचा: नालासोपाऱ्यात प्रदीप शर्मा हे क्षितिज ठाकूर यांच्याकडून पराभूत

पालघरमध्ये नालासोपाऱ्यात शिवसेनेकडून प्रदीप शर्मा यांना बहुजन विकास आघाडीच्या क्षितिज ठाकूर यांनी पराभूत केलं आहे.

नालासोपाऱ्यात सध्या हिंतेद्र ठाकूर यांच्या बविआ) वर्चस्व आहे. हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर हेच नालासोपऱ्याचे विद्यमान आमदार आहेत. 'एन्काऊंटर स्पेशालिस्ट' म्हणून ओळख असणारे प्रदीप शर्मा यांना नालासोपाऱ्यातून शिवसेनेचं तिकीट मिळाल्यानं इथली निवडणूक रंगतदार झाली होती.

कशी रंगली ही लढत?

क्षितिज ठाकूर विरुद्ध प्रदीप शर्मा

आधी ठाणे आणि आता पालघर जिल्ह्यात येणाऱ्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघात गेल्या दोनवेळा बहुजन विकास आघाडीचाच उमेदवार विजयी होत आला आहे. बविआचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर हे 2009 आणि 2014 अशा दोन्ही वेळा नालासोपाऱ्यातून आमदार म्हणून निवडून आले. 2009 साली क्षितिज ठाकूर हे 40,782 मतांनी, तर 2014 साली 54,499 मतांनी विजयी झाले होते.

तर त्यांच्याविरुद्ध लढत असलेले प्रदीप शर्मा हे मुंबईतील अंधेरी भागात राहतात. मात्र त्यांच्या मित्रमंडळींनं सुरू केलेल्या 'प्रदीप शर्मा फाऊंडेशन'च्या माध्यमातून नालासोपरा भागात छोटे-मोठे उपक्रम आधीपासूनच केले जात होते. त्यामुळे एका अर्थानं प्रदीप शर्मा यांनी नालासोपाऱ्यातून रिंगणात उतरण्याची तयारी केली होती.

मनगटावर "शिवबंधन" बांधल्यानंतर ते आता बहुजन विकास आघाडीच्या क्षितिज ठाकूर यांना टक्कर देतील.

मतदान कसं पार पडलं?

नालासोपाऱ्यात एकूण 5 लाख 19 हजार 82 मतदार आहेत. त्यापैकी केवळ 2 लाख 68 हजार 979 मतदारांनी म्हणजेच 51.82 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार, नालासोपाऱ्यात तब्बल एक लाखाहून अधिक बोगस मतदार असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीनं केला होता. अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्यासंदर्भात बविआकडून तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत. नालासोपारा पोलिसांनी एका तरुणालाही ताब्यात घेतलंय. दोन ठिकाणी खऱ्या मतदारांचे पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आलं.

प्रदीप शर्मा विरुद्ध क्षितिज ठाकूर: कुणाचं पारडं जड?

"प्रदीप शर्मा आता नालासोपाऱ्यातूनच का, असा प्रश्न सहाजिक आहे. मात्र, त्याचं कारण सरळ आहे की, नालासोपाऱ्यातील आमदार क्षितिज ठाकूर यांचे वडील हितेंद्र ठाकूर यांची लोकांमध्ये असलेली प्रतिमा पाहून प्रदीप शर्मांना शिवसेनेनं उतरवल्याचं दिसून येतं," असं वरिष्ठ पत्रकार जितेंद्र दिक्षित सांगतात.

किंबहुना, स्वत: प्रदीप शर्मांनीही माध्यमांशी बोलताना आपण इथली गुन्हेगारी संपवण्यासाठी आल्याचं सांगितलं आहे.

मात्र, वरिष्ठ पत्रकार सुहास बिऱ्हाडे म्हणतात, "हितेंद्र ठाकूर यांना आव्हान द्यायचं असतं तर ते वसईतून उभे राहणं अपेक्षित होतं, कारण हितेंद्र ठाकूर वसईतून उभे आहेत. नालासोपाऱ्यात त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर हे उभे आहेत. क्षितिज ठाकूर हे परदेशात शिकलेले असून, त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाहीये. ही त्यांची जमेची बाजू आहे."

प्रदीप शर्मा यांनी नालासोपारा मतदारसंघ निवडण्यामागचा अंदाज सांगताना बिऱ्हाडे म्हणतात, "नालासोपऱ्यात परप्रांतीय मतं प्रभावी आहेत. त्यामुळं त्यांची भिस्त त्यांच्यावरच दिसून येते. प्रदीप शर्मांच्या प्रचारासाठी भोजपुरी गायक, अभिनेते यांना आणत आहेत. शिवाय, प्रदीप शर्मांची पोलीस म्हणून एक प्रतिमा आहे. लोकांना ग्लॅमरचं आकर्षण असतं. त्याचा फायदा प्रदीप शर्मांना फायदा होऊ शकतो," असं सुहास बिऱ्हाडे सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)