कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी, राम शिंदेंचा पराभव

शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे कर्जत जामखेडमधून विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या राम शिंदेंचा पराभव केला आहे.
रोहित पवार हे नावही राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चिलं जात होतं. विशेषतः, पार्थ पवारांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर रोहित पवारांचं भवितव्य काय याविषयी उत्सुकता होती पण त्यांनी भाजपचे मातब्बर नेते राम शिंदे यांचा पराभव केला.
कशी झाली ही लढत?
कर्जत-जामखेड मतदारसंघात मागच्या वेळेपेक्षा जास्त मतदान यंदा झालं आहे. 2014 च्या निवडणुकीत या मतदारसंघात 66.07% टक्के मतदान झालं होतं, तर यंदा 73.98 टक्के मतदान झालं. गेल्या निवडणुकीत भाजपचेच राम शिंदे 37 हजार 816 इतक्या मताधिक्याने निवडून आले होते.
पण आताच्या निवडणुकीत रोहित पवार जायंट किलर ठरतील का हा खरा प्रश्न आहे.
या संदर्भात बीबीसी मराठीचे अभिजीत कांबळे सांगतात की रोहित पवारांनी नक्कीच आव्हान निर्माण केलंय. "1995 पासून सलग भारतीय जनता पक्षाचा आमदार इथून निवडून आलेला आहे. राम शिंदे विद्यमान आमदार आहेत.
देवेंद्र फडणवीस याठिकाणी दोन वेळा प्रचारासाठी येऊन गेले. पण रोहित यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नक्कीच नाही. शरद पवारांनी खास लक्ष घातलंय. जातीची समीकरणं निवडणुकांच्या निकालावर परिणाम करत असतात."
पुण्य नगरीच्या राही भिडे यांच्यानुसार, "रोहित पवारांनी चांगला जम बसवलाय. साखर कारखाना चांगल्या प्रकारे चालवला आहे. शेतकरी वर्ग त्यांच्याबरोबर आहे. रोहितचं व्यक्तिमत्व शरद पवारांसारखं संयमी आहेत. या सगळ्याचा परिणाम निवडणुकीवर होतो. या भागातल्या धनगरवाड्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. पण त्यांच्या समाजाचा मंत्री असूनसुद्धा राम शिंदेंनी काय केलं."
"तिथून निवडणूक लढवण्याचा निर्णय नऊ महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. राम शिंदे स्वतः धनगर आहेत. पण राम शिंदेंनी कधीही धनगर जमातीसाठी काही केल्याचा उल्लेखही केलेला नाही. त्यामुळे तिथे नाराजी आहे," वरिष्ठ पत्रकार संजय जोग म्हणतात.
वरिष्ठ पत्रकार किरण तारे यांच्या मते, स्थानिक मुद्द्यांचा परिणाम नक्की होणार आहे. "रोहितनं योजनाबद्ध पद्धतीनं तयारी सुरू केलेली आहे. रोहित जर त्यांचा वारसदार आहे हे लोकांसमोर मांडायचं असेल तर पवारांना त्या भागावर जोर लावणं गरजेचं होतं."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








