साताऱ्यातल्या 'त्या' EVM मशीनचं लोकांसमोर प्रात्यक्षिक घेण्याची मागणी

फोटो स्रोत, Getty Images
निवडणुकीत इव्हीएमच्या वापराच्या विश्वासार्हतेवरून विविध राजकीय पक्ष प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात. पण निवडणुक आयोग तसंच सरकारनं ही बाब वारंवार फेटाळून लावली आहे. अशीच घटना यंदाच्या निवडणुकीत साताऱ्यात घडल्याची चर्चा आहे.
पण निवडणूक आयोगानं मात्र ही चर्चा फेटाळून लावली आहे.
साताऱ्यात खटाव तालुक्यात नवलेवाडीत कोणत्याही पक्षाला मतदान केलं तरी मत भाजपला जात असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली. प्रशासनानेही प्रसिद्धीपत्रक काढून अशी कोणतीच घटना घडली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
साताऱ्यामध्ये नेमकं काय घडलं?
सातारा मतदारसंघात विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकांसाठी एकत्रित मतदान सोमवारी (ता. 21) घेण्यात आलं.
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे याठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीसोबतच लोकसभेची पोटनिवडणूकही घेण्यात येत आहे.
उदयनराजे भोसले या मतदारसंघात भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील उभे आहेत. तसंच याठिकाणच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्याविरुद्ध शिवसेनेचे महेश शिंदे यांचं आव्हान आहे.
साताऱ्यातील नवलेवाडीच्या एका मतदारकेंद्रावर इव्हीएम मशिनमध्ये बिघाड होऊन कोणतंही बटन दाबलं तरी मतदान भाजपला होत असल्याची तक्रार करण्यात आली. हा प्रकार दुपारी तीन वाजता घडला. त्यानंतर मतदानाची पुढील प्रक्रिया नवीन मशिनवर पूर्ण करण्यात आल्याचं वृत्त दैनिक सकाळने दिलं आहे.
तक्रारदाराचं काय म्हणणं?
दीपक रघुनाथ पवार हे मतदान करण्यासाठी गेले असता अधिकाऱ्यांनी त्यांना बॅलेट दिला. पण मतदान करण्यापूर्वीच कमळाच्या चिन्हापुढचं लाईट लागून मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याचा आरोप त्यांनी केला. असाच प्रकार रोहिणी दीपक पवार, आनंदा ज्ञानेश्वर पवार, माजी उपसरपंच सयाजी श्रीरंग निकम, प्रल्हाद दगडू जाधव, दिलीप आनंदा वाघ यांच्यासोबतही घडल्याचं त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं. यानंतर आमदार शशिकांत शिंदे तिथं पोहोचले. त्यांनी मतदार, कार्यकर्ते आणि निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्यासमोरही असाच प्रकार घडल्यामुळे त्यांनी मशिनमध्ये बिघाड असल्याचं सांगितलं. त्यानंतर ते मशिन सील करून नवीन मशिनवर पुढचं मतदान घेण्यात आलं. असा उल्लेख सकाळच्या बातमीत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था असल्याचं स्थानिक पत्रकार विशाल पाटील यांनी सांगितलं. असा प्रकार घडल्याचा काही नागरिकांचा आरोप आहे. पण नागरिकांनी इव्हीएमबाबत लेखी तक्रार दिली नाही, असा कोणताही प्रकार घडला नाही, असं प्रशाननाने म्हटल्याचं पाटील सांगतात.
कोणतंही बटन दाबलं तरी मत भाजपला जात असल्याची तक्रार काही स्थानिक मतदारांनी केली होती, पण प्रशासनाने असं काही झालं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे, असं स्थानिक पत्रकार महेश पवार सांगतात.
प्रशासनाने वृत्त फेटाळलं
या प्रकरणावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रक काढून स्पष्टीकरण दिलं आहे. "विविध इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमं आणि समाजमाध्यमांमध्ये मतदान केंद्र क्रमांक 250, नवलेवाडी, ता. खटाव, जि. सातारा इथं सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि कोरेगाव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता मतदान प्रक्रियेबाबत बातमी प्रसिद्ध झाली आहे. दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेपाच वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे प्रतिनिधी दीपक रघुनाथ पवार आणि दिलीप आनंदराव वाघ हे यंत्राची चाचणी घेताना उपस्थित होते. यावेळी व्हीव्हीपॅट मतदान चिठ्ठीच्या मुद्रणाबाबत दोन्ही प्रतिनिधींनी आक्षेप घेतला नाही.

"सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असतानाही कोणत्याच मतदाराने असा आक्षेप घेतला नाही. दीपक रघुनाथ पवार यांनी दुपारी आक्षेप घेतल्यानंतर त्यानां संबधित केंद्राध्यक्षांनी चाचणी मतदानासाठी जोडपत्र 15 भरून देण्यास सांगितलं. पण त्यांनी तसं करण्यास नकार दिला, त्यानंतर या मतदानकेंद्रावरची मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू होती. या तक्रारीमध्ये कोणतंही तथ्य नाही. तसंच अशी कोणतीही घटना घडलेली नाही," असं या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी लिहिलं आहे.
या ठिकाणच्या निवडणूक निर्णय अधिकारी कीर्ति नलावडे यांनी याबाबतचं प्रसिद्धीपत्रक दिलं आहे.
वातावरण पेटलं
मंगळवारी यासंबंधित बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर साताऱ्यातील वातावरण पेटलं आहे. आमदार शशिकांत शिंदे याबाबत रितसर तक्रार दाखल करणार आहेत.
या संबंधीत मशीनचं लोकांसमोर प्रात्यक्षिक घेण्याची मागणी शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
काँग्रेसची जॅमर बसवण्याची मागणी
तर दुरीकडे काँग्रेसनं निवडणूक आयोगाला पत्र लिहून टज्या ठिकाणी ईव्हीएम मशिन्स ठेवण्यात आल्या आहेत त्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत,' अशी मागणी केली आहे.
तसंच "प्रत्येक फेरीच्या मतांची मोजणी झाल्यानंतर मतांची आकडेवारी तात्काळ जाहीर करावी आणि त्यानंतरच पुढच्या फेरीची मोजणी करावी. व्हीहीपॅटच्या मोजणीसाठी मतदान यंत्र निवडीची मुभा उमेदवारांना द्यावी," असंही काँग्रेसनं म्हटलंय.
मतदान यंत्राबाबात शंका निर्माण झाल्यास त्या मतदान यंत्रातील मतांची मोजणी सलग चारवेळा करण्यात यावी, आणि ५० टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी करावी अशीही मागणी काँग्रेसनं केली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








