आरे कॉलनी: त्या झाडाला शेवटचं आलिंगन द्यावं असं मला वाटलं आणि...

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"मला असं वाटलं की एक शेवटच्या क्षणी आलिंगन द्यावं त्या झाडाला. मी खरंच कोसळलो तिथे आणि रडणं आवरू शकलो नाही."

मुंबईच्या आरे कॉलनीत मेट्रो कारशेडसाठी तोडलेली झाडं पाहिल्यावर सुशांत बळी आपल्या आपल्या भावना रोखू शकला नाही. 4 ऑक्टोबर 2019च्या रात्री झाडं तोडण्यास सुरूवात झाली, तेव्हा सुशांतसारख्या शेकडो नागरीक, पर्यावरणप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी आरे कॉलनीत धाव घेतली होती.

"आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा पोलीस जमा झाले होते. स्टालिन दयानंद तिथे होते. ते या प्रकरणातले याचिकाकर्ते आहेत आणि त्यांना आत जाण्याचा अधिकार आहे. त्यांना तरी आत जाऊ द्या अशी विनंती आम्ही केली. पोलीस हो-नाही करत होते, त्यात अर्धा-पाऊण तास गेला. लोक चिडले आणि दोन बॅरिकेड्समधल्या एका फटीतून आत शिरू लागले. आम्हीही त्यांच्या मागोमाग आत शिरलो."

आत काय पाहायला मिळणार आहे याची कल्पना असतानाही, ते दृश्य पाहून सुशांतला धक्का बसला. तो सांगतो, "खूप उदासवाणं दृश्य होतं ते. ते म्हणतात की इथे जंगल नाही, पण आत घनदाट झाडी होती आणि एवढी झाडं पडली होती तिथे. कत्तल झाल्यासारखंच दृश्यं होतं. आम्ही इतकी वर्षं ही झाडं वाचवण्यासाठी लढत होतो."

झाडाला आलिंगन देऊन रडताना सुशांतचा फोटो दुसऱ्या दिवशी बातम्यांमध्ये झळकला. पण त्या रात्री अश्रू अनावर होऊन कोसळणारा सुशांत एकटाच नव्हता. त्याच्यासारखेच अनेक तरुण-तरुणी गेल्या काही वर्षांत आरे कॉलनीतील झाडांसाठी निदर्शनं करताना दिसले.

'पुढच्या पिढ्यांच्या भविष्यासाठी आंदोलन'

'सेव्ह आरे'सारख्या मोहिमेत उतरलेल्या मुंबईकरांमध्ये तरुणांचा आणि लहान मुलांचा मोठा सहभाग दिसून आला आहे. त्यातेल काही जण आधी कधीही पर्यावरणाविषयी कुठल्या मोहीमेत सहभागी झाले नव्हते. स्वतः सुशांतही आधी जाहीरातविश्वात काम करायचा. त्यानं मास मीडिया आणि एमबीएचं शिक्षण घेतलं होतं.

"पर्यावरणासाठी काहीतरी करावं असं वाटत होतं कारण भरपूर लेख वगैरे वाचले होते, ज्यावरून हवामान बदलाविषयी परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट झालं. मी माझ्या परीनं झाडं लावणं, कंपोस्टिंग, अशा काही गोष्टी करू लागलो. याच क्षेत्रात काही काम करता येईल का हे पाहू लागलो. मी आहारातून मांसाहार पूर्णपणे वगळून 'व्हेगन' होण्याचा निर्णय घेतला."

तीन वर्षांपूर्वी सुशांतनं नोकरी बदलली आणि तो कचरा व्यवस्थापनात काम करणाऱ्या एका संस्थेत रुजू झाला. पण 'आरे'मधल्या परिस्थितीविषयी त्याला फारशी कल्पना नव्हती. "माझं ऑफिस आरेपासून जवळच होतं. मी तिथून जा-ये करायचो. एक दिवस मी बघितलं तिथे बॅरिकेड्स वगैरे लागले. थोडंसं असं वाटलं की जंगलामध्ये असं का चाललंय?" वर्षभरापूर्वी सुशांत 'सेव्ह आरे' मोहिमेतील कार्यकर्त्यांच्या संपर्कात आला आणि या मोहिमेशी जोडला गेला.

विशेषतः त्याच्या मुलाच्या जन्मानंतर सुशांतला भावी पिढ्यांसाठी पर्यावरण टिकवणं जास्त गरजेचं वाटू लागलं. तो सांगतो, "मला पाच वर्षांचा मुलगा आहे. पुढे जाऊन माझ्या मुलाला काय होणार आहे, कसा तो जगणार आहे, काय श्वास घेणार आहे माहित नाही. पाणी तर आपण विकत घेतोच आहोत, एसी आहे, पुढे ऑक्सिजनलाही पैसे मोजावे लागतील. माहित नाही काय होणार आहे. त्यामुळे आम्ही पुढे येतो आहोत. पुढच्या पिढीचं भविष्य चांगलं असावं असं आम्हाला वाटतं."

त्यासाठी स्वतः नागरिकांनीच पुढे यायला हवं असं सुशांतला वाटतं. "सत्ता कुठल्याही पक्षाची असो, राजकारण्यांना जनतेच्या कल्याणाची खरी चिंता असते का असा प्रश्न पडतो. हे दुर्दैवी आहे. फक्त मतदान करून आपली जबाबदारीही संपत नाही. पर्यावरणाविषयी धोरणं ठरवताना नागरिकांनीही पुढाकार घेतला पाहिजे. तुम्ही फार काही केलं नाहीत तरी चालेल, फक्त कुठलीही एक चांगली सवय लावा. प्लास्टिक रिसायकल करा, कंपोस्टिंग करा, जे तुम्हाला जमत असेल ते करत राहा. कारण पर्यावरण आपल्या सर्वांचं आहे"

मुंबईत 'मायक्रोफॉरेस्ट'चा प्रयोग

सुशांत फक्त निदर्शनं करून थांबलेला नाही. काही महिन्यांपूर्वी त्यानं आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईत micro-forest म्हणजे छोटं जंगल उभं करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. मुलुंडमध्ये मुंबई महापालिकेच्या एका बागेतील कोपऱ्यात दोनशे चौरस फूटांवर झाडं लावण्याची परवानगी त्यांना मिळाली आहे.

सुशांत हा प्रकल्प कसा सुरू झाला त्याची माहिती देतो. "पावसाळ्याआधी बीएमसीचे लोक कुठला अपघात होऊ नये म्हणून झाडांची छाटणी करतात. पण ती योग्य पद्धतीनं होत नसल्याचं आणि झाडांना नुकसान होत असल्याचं दिसल्यावर मी महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसात गेलो. त्यावर उपाय म्हणून आपण काही करू शकतो का, याची चौकशी केली."

'मियावाकी' पद्धतीनं त्यांनी इथे झाडं लावली आहेत. जपानचे वनस्पतीशास्त्रज्ज्ञ अकिरा मियावाकी यांनी निर्माण केलेल्या या पद्धतीमध्ये छोट्यातल्या छोट्या जागेतही घनदाट जंगलाची निर्मिती करता येते. सुशांत सांगतो, "मी उत्तराखंडमध्ये एका कार्यशाळेत सहभागी झालो होतो, तिथे याविषयी शिकायला मिळालं.

या पद्धतीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक प्रजाती ज्या जवळच्या एखाद्या जंगलात नैसर्गिकरित्या उगवतात, अशीच झाडं लावली जातात. त्यासाठी झाडांचा अभ्यास करायला मी आरेच्या जंगलातच गेलो होतो. मग त्याच झाडांची रोपं आणून आम्ही इथे लावली. त्यातली बरीचशी फोफावली आहेत. मुसळधार पावसामुळं काही झाडं तग धरू शकली नाहीत, पण त्यांनाही आता पुन्हा फुटवे आले आहेत."

सुशांतसोबत या प्रकल्पावर काम करणाऱ्या डॉ. रश्मी मेनन सांगतात, "इथे एवढ्या छोट्या जागेत झाडं लावताना आणि ती जगवताना आम्हाला एवढे कष्ट घ्यावे लागतायत. आणि तिथे 'आरे'मध्ये मात्र रातोरात शेकडो झाडं तोडली गेली, जी कित्येक दशकांपासून उभी होती. ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे."

"लढा सुरूच राहील"

मुंबईसारख्या शहराला मेट्रोची गरज असल्याचं पर्यावरणप्रेमीही मान्य करतात. "मी स्वतः कार चालवत नाही, सार्वजनिक वाहनंच वापरण्याचा माझा प्रयत्न असतो. मेट्रो रेल्वे आली तर ती सर्वांनाच हवी आहे. पण त्यासाठी झाडं तोडून एकप्रकारे आमच्या श्वासांची किंमत द्यायला हवी का?" असा प्रश्न रश्मी विचारतात.

मेट्रो कारशेडसाठी आरेमधली 2,141 झाडं तोडल्याचं मुंबई मेट्रो रेल्वे प्राधिकरण अर्थात MMRCनं मान्य केलं आहे, मात्र त्याबदल्यात 23,846 झाडं लावल्याचा दावाही केला आहे. तसंच मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये आता आणखी वृक्षतोड करणार नसल्याचंही म्हटलं आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 21 ऑक्टोबरला सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की मेट्रोचं काम सुरू राहील पण एकही झाडं तोडता कामा नये. पुढील सुनावणी 15 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

पण भविष्यात आरेमध्ये अन्य प्रकल्प आणण्याचा सरकारचा प्रस्ताव असून, इथे पुन्हा वृक्षतोड केली जाईल अशी भीती पर्यावरणप्रेमींना वाटते. त्यामुळंच अजून बरच काम बाकी असल्याचं सुशांत सांगतो.

आरेमध्ये मेट्रो कारशेडच्या जागेवरची झाडं वाचवता आली नसली, तरी या लढ्याला मिळालेला प्रतिसाद आणि झाडांसाठी रस्त्यावर उतरलेले लोक, हे चित्र आशादायी असल्याचं त्याला वाटतं. "नक्कीच एक समाधान वाटतं की मी काहीतरी करतो आहे मुंबईसाठी, माझ्या मुलासाठी आणि भावी पिढ्यांसाठी. आणि चांगली गोष्ट आहे की मी एकटा नाहीये. असे भरपूरजण आहेत जे निरपेक्ष भावनेनं या चळवळीत आहेत. एक महिन्याहून अधिक काळ लोक आरेमध्ये येतायत, त्याच्यासाठी लढतायत. तर हा लढा सुरू राहील. "

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)