You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विधानसभा निवडणूक: प्रचारात 'हिरव्या सापांचा विळखा' आणि ‘हिरवे झेंड्यां’चा उल्लेख का?
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"औरंगाबादला हिरव्या सापांनी विळखा दिला आहे. औरंगाबादमध्ये हिरवा झेंडा रोवला गेला आहे. आपल्याला तो उखाडून फेकायचा आहे. या झेंड्याला गाडायचं आहे." - उद्धव ठाकरे, औरंगाबाद
"हिरव्याला गाडणं इतकं सोपं नाही. महाराष्ट्रात 50 ठिकाणी हिरवा झेंडा फडकणार आहे." - असदुद्दीन ओवेसी, मालेगाव
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यात मतदान तोंडावर आलेलं असताना शिवसेना आणि AIMIM पक्षाच्या नेत्यांनी ही वक्तव्यं केली आहेत. पण यामागचा नेमका अर्थ काय आहे?
धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न?
गेल्या 30 वर्षांपासून शिवसेना हिंदू-मुस्लीम या मुद्द्यावर निवडणूक जिंकत आलीय, शिवसेनेचा धोरणाचा हा भाग आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे व्यक्त करतात.
ते सांगतात, "हिंदू-मुस्लीम असा प्रचाराचा मुद्दा करायचा आणि निवडणुका जिंकायच्या, असं शिवसेनेचं धोरण आहे. कारण शिवसेनेकडे ना आर्थिक धोरण आहे ना पर्यावरणीय धोरण. त्यामुळे हे असे वक्तव्यं करून जाणीवपूर्वक लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे."
यापद्धतीची वक्तव्यं म्हणजे दोन्ही बाजूनं धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न दिसतोय, असं मत ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड मांडतात.
ते म्हणतात, "जे कट्टर हिंदू मतदार आहेत, त्यांच्या मनातील मुस्लीम द्वेषाची भावना टिकवून ठेवण्याचा हेतू उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यातून समोर येतो. तर दुसरीकडे मुस्लीम समुदायातील जो तरुण वर्ग AIMIMकडे आकर्षित झाला आहे, त्याला कायम ठेवण्यासाठी असदुद्दीन ओवेसी यांचे प्रयत्न दिसतात. यासाठीच मग दोन्ही बाजूंकडून द्वेषमूलक वक्तव्यं केली जातात."
'राजकारणाचं सूत्र'
राजकारणात दोन जातीयवादी पक्ष एकमेकांचे मदतनीस असतात, तसं सूत्रच असतं, असं जयदेव डोळे सांगतात. त्यांच्या मते, "तुम्ही आमच्याविरोधात बोला, आम्ही तुमच्याविरोधात बोलतो, असं या पक्षांचं धोरण असतं. यामुळे मग स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या पक्ष बाजूला पडतात आणि त्यांचा पराभव होतो."
हाच मुद्दे पुढे नेत संजय वरकड सांगतात, "AIMIMच्या प्रवेशानंतर औरंगाबादमधील काँग्रेस पक्ष संपत चालला आहे. पण AIMIMचा प्रभाव वाढतोय, असं शिवसेना म्हणू शकत नाही. त्यामुळे मग 'हिरवे साप' असं प्रतीकात्मक उदाहरण देऊन AIMIMवर सेनेकडून निशाणा साधला जात आहे. यामुळे AIMIM विरुद्ध शिवसेना-भाजप अशी लढत होते. यामुळे मग स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष बाजूला पडतात."
'विकासावर बोलू शकत नाही, कारण...'
"खरं तर औरंगाबाद शहरात सगळीकडे खड्डे झालेत, घाण साचलीय, रस्त्यावर कुत्र्यांचा सुळसुळाट आहे, महापालिका दिवाळखोरीत निघालीय, असं चित्र आहे. 5 वर्षं AIMIMचे इम्तियाज जलील आमदार असताना त्यांनी काय विकास केला, हा प्रश्न आहे. पण 5 वर्षांच्या तुलनेत 25 वर्षं मोठी असतात, हे विसरून चालणार नाही. या 25 वर्षांत शिवसेनेनं काय केलं, हाही मोठा प्रश्न आहे," जयदेव डोळे सांगतात.
तर ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांच्या मते, "लोकसभा निवडणुकीच्या वेळेस AIMIMचा जितका प्रभाव होता, तितका आता दिसत नाही. कारण, औरंगाबादकरांनी मोठ्या विश्वासानं AIMIMचे 20 ते 25 नगरसेवक निवडून दिले होते, पण त्यांनी म्हणावं तसं काम केलं नाही."
महाराष्ट्र टाइम्सचे जिल्हा प्रतिनिधी प्रमोद माने यांच्या मते, "औरंगाबाद सेनेचा बालेकिल्ला होता, पण लोकसभा निवडणुकीच्या वेळी तो ढासळला. लोकसभेला शिवसेनेचं 'खान की बाण' हे धोरण चाललं नाही. असं असलं तरी, शिवसेनेनं यातून काही धडा घेतला नाही. सेना खान की बाण असं राजकारण करतं, पण विकासाच्या नावानं मात्र शून्य आहे. दुसरीकडे AIMIMनंही काही काम केलं नाही. विकासाच्या मुद्द्यावर मत मागू शकत नाही, अशी या दोन्ही पक्षांची अवस्था आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)