You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टक्कल पडल्यामुळे खरंच पुरुषांची लग्न होत नाही का?
- Author, श्रद्धा दामले
- Role, बीबीसी मराठीसाठी
फायनली.. त्याच्या डोक्यावर केस भुरभुरायला लागले आणि तो कमालीचा खूश झाला. कितीतरी वर्षांनी त्यानं स्वतःलाच इतकं खूश पाहिलं असेल.
हेअर ट्रान्सप्लांटची ट्रिटमेंट सुरु असताना आरशासमोर तासनतास बसावं लागणं आणि आता स्वतःहून आरशात सारखं सारखं पाहायला जाणं... यात कमालीचा फरक होता. त्याला काहीतरी गवसलं होतं. आत्मविश्वास होता तो.
राहुल मोरे. वय वर्षं 30. वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षापासून त्याच्या डोक्यावरचे केस कमालीच्या स्पीडने गळायला लागले आणि तो अस्वस्थ व्हायला लागला. मूळ स्वभाव इन्ट्रॉव्हर्ट, त्यात तरुण वयात प्रवेश करताना केसांनी ही अशी साथ सोडलेली.. राहुल अगदीच गप्प गप्प होऊन गेला. लोकांनी त्याला वेगवेगळी लेबलं लावली. पण खरं कारण हेच, केस गळण्याचं.
उजडा चमन आणि बाला हे हिंदी सिनेमे अनुक्रमे 8 नोव्हेंबर आणि 22 नोव्हेंबरला रिलीज होतायंत. बॉलिवुडमध्ये हा विषय कॅश करण्याचा या वर्षातला तिसरा प्रयत्न आहे. गॉन केशपासून सुरू झालेला हा प्रवास उजडा चमन आणि बालापर्यंत आला आहे.
आजारामुळे एका मुलीचे केस जाणं हा गॉन केशचा विषय होता. तर केस हळूहळू जाऊन टकलू होण्याकडचा प्रवास म्हणजे उजडा चमन आणि बाला हे सिनेमे आहेत.
या सिनेमाचे ट्रेलर पाहताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे हे असेच्या असे डायलॉग्ज कुठेतरी ऐकलेत. कुठेतरी काय आपल्या आजूबाजूलाच. आपल्या ओळखीतच. कुणीना कुणीतरी या त्रासातून, नकोशा अनुभवातून जात असतं. पण तो त्रास बाकीच्या केसाळू व्यक्तींना तितकासा भिडत नाही. जाणवत नाही.
राहुललाही हा अनुभव टाळता आला नाही. टीन एजमध्ये असतानाच त्याच्या केसांनी साथ सोडायला सुरुवात केली. राहुलसाठी हा धक्काच होता. ज्या वयात आपण कूल दिसलं पाहिजे, मुलींशी मैत्री झाली पाहिजे असं वाटत असतं, व्यक्तिमत्त्व विकास होत असतो त्याच काळात त्याला स्वतःबद्दल न्यूनगंड यायला लागला.
"मी फक्त वीस वर्षांचा होतो आणि मला कुणीतरी लहान मुलानं काका हाक मारली. आणि मग काका, दादा हे वरचेवर ऐकायला यायला लागलं. मला वाईट वाटायचं." राहुल सांगत होता.
"मी अजिबात कूल दिसत नाही. माझ्याकडे कुणीतरी दोन मिनिटं मागे वळून पाहावं. मलाच का असं झालं... अशा सगळ्या प्रश्नांमध्ये माझी महत्त्वाची वर्षं जात होती. सुरुवातीला मी खूप मेहनत घेतली. केस गळतायंत म्हणून आई, काकू, मावशा, ताया, मित्र जे कुणी जो काही उपाय सांगेल तो अनेक वर्षं करत होतो.
कुणी म्हटलं हे सगळं सोड आयुर्वेदिक तेल लाव. पक्का रिझल्ट आलाय. कुणाला पक्का रिझल्ट आला होता ती व्यक्ती काही मला कधीच भेटायची नाही, पण माझ्या मनात नवीन आशा निर्माण व्हायची. मी ताबडतोब तो उपाय करायला लागायचो. कसलेकसले रस, तेलं, मसाज सगळं सगळं केलं. पण केस गळणं थांबणं सोडाच... ते आपले जास्तच स्पीडनं गळायला लागले," राहुल त्याच्या केस गळण्याच्या त्रासाविषयी बोलत होता.
एका क्षणी मी रागात सगळे केस काढून टाकले. पूर्ण टकलू केलं. राहुल सांगत होता. "मी स्वतःचं टक्कल स्वीकारायचा प्रयत्न करत होतो. अनोळखी लोक सोडाच पण कधीतरी माझेच एक-दोन मित्र मला टोमणे मारायचे. ते लागायचं. मैत्रिणीही मला फक्त त्यांचा चांगला मित्र मानायच्या. माझ्या केस नसण्याचे पुरेपूर तोटे झेललेत मी. पण नोकरी करायला लागल्यावर मी ठरवलं होतं की मी पैसे साठले की हेअर ट्रान्सप्लांट करेन. आताशा आईला माझ्या लग्नाची प्रचंड काळजी लागलेली आहे. दोन-चार मुलींनी फोटोत टक्कल पाहून पुढे पाहायलाही नकार दिला होता. मला तेव्हा काही वाटलं नव्हतं. कारण माझ्या लहान वयात मला साध्या क्लोज मैत्रिणीही या कारणामुळे मिळ्याल्या नव्हत्या. पण आईला फारच टेन्शन आलेलं. आता मी थोडा सेटल झालोय आणि मग हेअर ट्रान्सप्लांटची ट्रिटमेंट सुरू केली."
राहुल सध्या एका मल्टीनॅशनल कंपनीत सेफ्टी ऑफिसर म्हणून काम करतो. हेअर ट्रान्सप्लांटमुळे प्रचंड आत्मविश्वास आला आहे असं तो सांगतो.
"पहिल्या दिवशी ऑफिसला जॉइन झालो तेव्हा माझ्या बॉसला मला एकतरी मूल असेल इतक्या वयाचा मी वाटलो होतो. मला कुणाशी बोलतानाही कॉम्प्लेक्स यायचा. समोरच्यावर माझी छाप पडणार नाही असं माझ्या मनात कुठेतरी पक्कं बसलेलं होतं. पण आता माझे कलिगसुद्धा मला - राहुल तू बदलला आहेस असं म्हणतात. माझं प्रेझेंटेशन चांगलं झालं आहे अशी कॉम्प्लिमेंटही मला मिळते. माझा लूक चेंज झालाय. चेहरा वेगळा दिसतोय."
ए टकलू, चिवड्यात लाडू, उजडा चमन.... टक्कल असलेल्या माणसांना या नावांनी हमखास संबोधलं जातं. तरुणपणातले प्रश्न, लग्न जमवताना करावी लागणारी कसरत असं चित्र आपण सगळ्यांनीच आसपास कुठेनाकुठेतरी पाहिलं असेल.
पण केस जाणं ही समस्या अजिबात नाही, असं ठामपणे सांगणारी व्यक्तीही असू शकते. सिद्धार्थ चुरी असं या व्यक्तीचं नाव. ते स्वतः जलतरणपटू आहेत आणि क्रीडा क्षेत्रात दीर्घकाळापासून कार्यरत आहेत.
त्यांनाही विसाव्या वर्षापासून म्हणजे अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावर केस गळतीची समस्या भेडसावू लागली. ते जलतरणपटू आहेत.
ते सांगतात, की "टोपी फक्त मुलींनी घालायची असं मुलं एकमेकांना चिडवायची. त्यामुळे मी पाण्यात सराव करायला उतरलो तरी टोपी घालायचो नाही. पण पाण्यातल्या क्लोरीनचा केसांवर चांगलाच परिणाम व्हायला लागला. तरीही मी त्याची पर्वा करत नव्हतो."
"केसगळती खूपच वाढली, पण मी माझ्याच दुनियेत छान होतो. मी अजिबात त्याकडे लक्ष दिलं नाही. इंजिनिअरिंगचं शिक्षण झालेलं होतं आणि नोकरीही मिळाली. त्यामुळं फार काही इश्यू नव्हते की ज्यावर माझ्या टक्कल असण्याचा परिणाम होणार होता. मुळात मलाच फरक पडायचा नाही. माझ्या मित्रांकडून वगैरेही मला कधी त्रास झाला नाही. हां, रस्त्यावरून जाताना कधीतरी ए टकल्या वगैरे अशी कमेंट येते. पण मी त्याकडे साफ दुर्लक्ष्य करतो. कारण मला माहित्येय मी काय आहे ते," सिद्धार्थ सांगत होते.
लग्नाच्या वेळेससुद्धा त्यांनी याचा फारसा गांभीर्यानं विचार केलेला नव्हता. सुदैवानं त्यांच्या पत्नीनही टक्कल चांगल्या प्रकारे स्वीकारलं. त्यामागचं लॉजिक फार मजेशीर होतं, असं सिद्धार्थ सांगतात.
"आज ना उद्या सगळ्यांचेच केस जाणार आहेत. तू काही वर्षांनंतर कसा दिसशील ते मला आत्ताच दिसतंय. आणि तू असाच छान दिसतोस. उद्या केस ट्रान्सप्लांट करायची संधी मिळाली तरी तू करून नकोस." त्यांना पाहायला आलेल्या मुलीच्या म्हणजेच सिद्धार्थ यांच्या पत्नीच्या या मतानं लग्न हाही प्रश्न संपला होता.
सिद्धार्थ सांगतात की, "माझा हाच लूक मी इतकी वर्ष कॅरी करतो आहे. अठरा वर्षांपेक्षा जास्त काळ मी काम करतोय. माझ्या क्षेत्रात मला सगळेच या लूकने ओळखतात. मी माझ्या कंपनीसाठीचा प्रवक्ताही आहे. तेव्हा अनेकदा प्रसारमाध्यमांशी बोलतो. लोकांशी संवाद साधणं तर माझ्या कामाचाच भाग आहे. पण मलाच काही फरक पडत नाही. माझा हाच लूक माझी आयडेंटिटी आहे," सिद्धार्थ खूप आत्मविश्वासानं बोलत होते.
तुमचं क्षेत्र कोणतं, तुम्ही राहता कुठे, तुमच्या आसपासचे लोक या सगळ्याचा तुमच्यावर फरक पडत असतो. टक्कल असण्याचा कॉम्प्लेक्स येणं किंवा आत्मविश्वासानं त्याला सामोरं जाणं हे ज्याच्या त्याच्या व्यक्तिमत्त्वावर ठरत असतं. ही समस्या सकारात्मक घ्यायची की नकारात्मक.. तुम्हाला काय वाटतं?
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)