You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नोबेल पुरस्कार: आपल्या पेशींना ऑक्सिजन कसा मिळतो, यावरील संशोधनासाठी तिघांना नोबेल
शरीरातील ऑक्सिजनची पातळी ओळखून त्यानुसार पेशींचं कार्य कसं चालतं, याबाबत संशोधन करणाऱ्या तीन शास्त्रज्ञांना यंदाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि फ्रान्सिस क्रिक संस्थेतील सर पीटर रॅटक्लिफ, हॉरवर्ड विद्यापीठातील विल्यम केलीन आणि जॉन हॉपकिन्स संस्थेतील ग्रेग सेमेन्झा या तीन शास्त्रज्ञांना यंदाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आलाय.
अॅनेमिया आणि कर्करोग यांसारख्या आजारांवर उपचारासाठी या संशोधनाचं काम अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
हृदयविकारापासून ते फुफ्फुसाच्या आजारांपर्यंत ऑक्सिजनच्या प्रमाणाची भूमिका किती महत्त्वाची असते, हे शोधण्याचे प्रयत्न सध्या केले जात आहेत.
माझा सन्मान करण्यात आलाय, या गोष्टीचा आनंद झालाय, अशा भावना सर पीटर यांनी व्यक्त केल्यात.
"हा सन्मान माझ्या प्रयोगशाळेला समर्पित करतो, शिवाय तिथं माझ्यासोबत काम करणाऱ्यांनाही. या क्षेत्रातल्या अनेकांना आणि अर्थात माझ्या चढ-उतारात मला संयमानं सोबत देणाऱ्या माझ्या कुटुंबालाही."
नोबेल पुरस्कार देणाऱ्या स्विडिश अकादमीनं म्हटलंय, "ऑक्सिजनचं महत्त्व जाणून शतकं लोटली, मात्र ऑक्सिजनच्या प्रमाणातील बदल बदल ओळखून शरीरातील पेशींचं कार्य कसं चालतं, हे माहीत नव्हतं."
हे संशोधन इतकं महत्त्वाचं का आहे?
शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, या गोष्टीचं रोगप्रतिकार प्रणाली आणि गर्भाशयाच्या प्रारंभीच्या वाढीमध्ये महत्त्व असतं.
जर शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण कमी असेल, तर त्यावर उपाय म्हणून लाल रक्तपेशींची निर्मिती आणि रक्तवाहिन्या सक्रीय होतात.
शरीरात जेवढ्या जास्त रक्तपेशी, तेवढं शरीर ऑक्सिजन सामावून घेण्यात सक्षम होतं. त्यामुळेच खेळाडूंना उंच ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं.
त्यामुळं अॅनेमियासारख्या आजारांवर उपचारासाठी हे संशोधन महत्त्वाचं ठरेल.
"या तिन्ही शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळं आरोग्याशी संबंधित अत्यंत कठीण परिस्थितीत जाणून घेण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाचा मार्ग मोकळा झालाय. नोबेल विजेत्या तिन्ही शास्त्रज्ञांचे आभार. ते या पुरस्कारासाठी अत्यंत योग्य आहेत," असं कँब्रिज विद्यापीठातील डॉ. अँड्र्यू मुरे यांनी म्हटलं.
वैद्यकशास्त्रातील गेल्या चार वर्षातील नोबेल विजेते :
- 2018 - जेम्स पी अॅलिसन आणि तुसुकु होंजो (रोगप्रतिकारक शक्तीच्या आधारे कर्करोगाशी कसं लढता येतं, यावर संशोधन)
- 2017 - जेफ्री हॉल, मायकल रोसबॅश आणि मायकल यंग (सजीवांमधील दैनंदिन प्रक्रियांचे अंतर्गत चक्र)
- 2016 - युशिनोरी ओहसुमी (मानवी शरीरातील पेशींचा स्वत:विरोधातील प्रक्रियेवरील संशोधन)
- 2015 - विल्यम कॅम्पबेल, सतोशी ओमुरा आणि यूयू टू (परोपजीवींना नेस्तनाबूत करणाऱ्या औषधाचं संशोधन)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)