You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रो कबड्डी 2019: कबड्डीमुळे कोट्यधीश झालेल्या कोल्हापूरच्या देसाई बंधूंची गोष्ट
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी
9 एप्रिल 2019, मुंबई, प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामासाठी मुंबईत कबड्डीपटूंचा लिलाव सुरू होता. सिद्धार्थ देसाईच्या नावाची घोषणा झाली.
आधीच्या हंमामातल्या त्याच्या कामगिरीमुळे त्याचं नाव देशातल्या तरुणांच्या ओठावर होतं. यु मुंबाकडून खेळताना आपल्या पहिल्याच सामन्यात 15 गुण या पठ्ठ्याने आपल्या चढाईने वसूल केले. हा स्पर्धेतला विक्रम होता.
पूर्ण स्पर्धेत त्याने दीडशतक गाठलं. 6 फूट 3 इंचाची शरीरयष्टी आणि त्याला शोभणारी अशी ताकद यामुळे हमखास गुण मिळवून देणारा चढाईपटू अशी त्याची ओळख लगेचच तयार झाली.
मग काय? लिलावात सिद्धार्थसाठी बोलीवर बोली लागल्या. आणि तेलगू टायटन्स संघाने 1 कोटी 45 लाख एक, 1.45 दोन, 1.45 तीन म्हटलं तेव्हा ही चढाओढ थांबली.
गावात जल्लोष
सिद्धार्थ चक्क करोडपती झाला होता. जेमतेम 24व्या वर्षी कोल्हापूरच्या आडगावातून आलेला एक मुलगा असा कोट्यधीश झाला. दुसऱ्या दिवशी आणखी एक चांगली बातमी आली, ती म्हणजे सिद्धार्थचा मोठा भाऊ आणि त्याला कबड्डीचे प्राथमिक धडे देणारा सूरज देसाईही त्याच्याच म्हणजे तेलगू टायटन्स संघाकडून उचलला गेला.
देसाई कुटुंबात आता तर जल्लोष सुरू झाला. फक्त घरचेच नाही तर कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातलं हिंदळेवाडी गावच आनंदात न्हाऊन निघालं.
सिद्धार्थ आणि सूरज यांचे वडील शिरिष देसाई शेतकरी आहेत. शेतात ऊस आणि भात पिकतो. जे शेतात पिकतं, तेच घरी येतं, बाहेरून काही आणायला नको अशा पद्धतीने गुजराण करणारं हे कुटुंब. खाऊन पिऊन सुखी.
त्यामुळे मुलाच्या बँक खात्यात पहिल्या वर्षी 34 लाख आणि दुसऱ्या वर्षी चक्क 1 कोटी 45 लाख रुपये आले म्हटल्यावर अख्खं घर वेडं झालं. तसे घरातले लोक एकदम साधेसुधे आहेत.
'वडील छान, छान एवढंच म्हणाले. एवढे पैसे कुणीच कधी बघितले नव्हते. पहिलं मम्मीला सांगितलं की पैसे जमा झालेत. आधी तिला कळलंच नाही. पण, घरी फोर व्हीलर आली आणि मोठा भाऊ सूरजच्या लग्नात खर्च केले तेव्हा तिला समजलं.' अगदी साधेपणाने सिद्धार्थने पहिल्या लिलावाची गोष्ट सांगितली.
'बाहुबली' देसाई
सिद्धार्थने 2018चा प्रो कबड्डी हंगाम चांगलाच गाजवला. यु मुंबा संघाला त्याने फायनलही गाठून दिली. त्यातून त्याची ओळख निर्माण झाली.
'आधी कुणी ओळखत नव्हतं. पण, सहाव्या हंगामानंतर चित्र बदललं. आता लोक विमानतळावर नाहीतर, स्टेडियम बाहेर सारखे सेल्फी आणि ऑटोग्राफ मागतात त्याने घाबरल्यासारखं होतं,' असं सिद्धार्थ सांगतो. यंदा त्याच्या नवीन तेलगू टायटन्स संघाने त्याला बाहुबली देसाई असं नाव दिलंय.
शांत आणि लाजाळू सिद्धार्थ त्याच्या गावी हिंदळेवाडीमध्ये मात्र एकदम तोऱ्यात असतो. गावात सगळ्यांनाच कबड्डी आवडतं.
आणि सिद्धार्थ, सूरजच्या भाषेत सांगायचं तर लोकांना कबड्डीची नशा आहे. वडील शिरिष देसाईही स्थानिक स्पर्धांमध्ये खेळलेले आहेत.
'वडिलांना कधी खेळताना बघितलं नाही. पण ते पण चढाईत निष्णात होते. त्यांच्यावेळी बक्षीस म्हणून बकरी, कोंबडी नाहीतर 2 हजार रुपये मिळायचे. कबड्डीत करियर नव्हतं. आज मला कबड्डी लीगमुळे पैसे मिळाले याचा वडिलांना अभिमान आहे. गावातल्या लोकांनाही आम्हा दोन भावांबद्दल कौतुक आहे.'
पैसे आल्यावर काय बदललं?
सिद्धार्थने एकदम 34 लाख आणि पुढच्या वर्षी जवळ जवळ दीड कोटी हातात आले तेव्हा काय केलं?
'पहिल्या वर्षी तर मोठा भाऊ सूरजचं लग्न केलं. तो सेनादलात कामाला असल्यामुळे त्याला लीगमध्ये कबड्डी खेळायला परवानगी मिळाली नाही. पण, मला संधी मिळाल्यावर घरचं लग्नकार्य पार पाडलं. पैसे मला मिळाले काय, भावाला सगळं सारखंच आहे. पैसे घरीच राहणार, सिद्धार्थ सांगतो.
पुढच्या वर्षी तर सिद्धार्थने एक मोठी जीप खरेदी करून ती मॉडिफाय केलीय. आणि रिकाम्या वेळेत ही जीप घेऊन फिरायला त्याला खूप आवडतं. जीपवरून देसाई बंधू कुठेतरी निघाले आहेत हे लोकांना कळतं. ते ओळखीचा हात दाखवतात. आणि सिद्धार्थ, सूरजला ते बरं वाटतं.
आज राष्ट्रीय स्तरावर पुरेशी कबड्डी खेळण्यापूर्वीच सिद्धार्थला हे यश मिळालंय. कबड्डी सारख्या देशी खेळात व्यावसायिकता आलेली बघून त्यांना बरं वाटतं.
या स्पर्धेमुळे योग्य वयात खेळाडूंना स्पर्धात्मक संधी मिळतेय. सिद्धार्थचा मोठा भाऊ सूरजला मात्र ती संधी उशिरा मिळाली. खरंतर तो सेनादलाकडून पाच राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा खेळला आहे. पण, सुरुवातीला सेनादलातील खेळाडूंना भारत सरकारने प्रो कबड्डी लीगमध्ये खेळायला परवानगी दिली नव्हती.
त्यानंतर जेव्हा 2016मध्ये ती मिळाली, तेव्हा सूरज दुखापतग्रस्त होता. त्यामुळे जयपूर पँथर्सकडून निवड होऊनही तो एकही सामना खेळू शकला नाही.
पण, सूरज सजग आहे. आणि कबड्डी लीगचं महत्त्वही त्याने वेळेत ओळखलं होतं. त्यामुळे छोटा भाऊ सिद्धार्थला त्याने कायम व्यावसायिक लीगसाठी प्रोत्साहन दिलं.
खरंतर सिद्धार्थचं लक्ष सुरुवातीला अभ्यासाकडे होतं. आणि तो होताही हुशार...फिजिक्समध्ये त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. नंतर शारीरिक शिक्षणातही डिगरी मिळवली.
त्यानंतर मात्र 2014च्या सुमारास सूरजने सिद्धार्थला कबड्डीकडे गांभीर्याने बघण्याचा सल्ला दिला. त्याच्यातल्या नैसर्गिक चढाईपटूच्या गुणांची त्याला जाणीव करुन दिली. शिवाय लीगमध्ये त्याला संधी मिळू शकेल असंही त्याचं मन त्याला सांगत होतं. कबड्डीवर घरच्या सगळ्याच लोकांचं प्रेम होतं. त्यामुळे घरूनही विरोध झाला नाही.
सिद्धार्थला मोठ्या भावाचा सल्ला पटला. आणि पुढे जे घडलं ते आज आपण बघतो आहोत. सिद्धार्थला 2018मध्ये प्रो कबड्डी लीगमध्ये स्थान मिळालं तेव्हा आपल्यालाच खेळायला मिळत असल्यासारखा आनंद झाला असं सूरज सांगतो.
राष्ट्रीय संघात खेळण्याची इच्छा
2019च्या हंगामात सिद्धार्थचा पदार्पणात 15 गुण कमावण्याचा सूरजने 18 गुण कमावत मोडला. दोन्ही भावांची तिथून चर्चा सुरू झाली. आणि आता कबड्डी लीग कुठल्याही शहरात असो. या दोघांभोवती गर्दी होतेच. दुर्देवाने यंदा तेलगू टायटन्सचा संघ तेवढी चांगली कामगिरी करू शकलेला नाही.
आणि लीगमध्ये सध्या संघ शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. अठरा पैकी फक्त पाच सामने संघाला जिंकता आले आहेत. पण, चढाईपटूंच्या यादीत 174 गुणांसह सिद्धार्थ पाचव्या स्थानावर आहे. कबड्डीमध्ये कारकीर्द घडवण्याचा विश्वास त्याला या लीगमुळे मिळाला.
आता भारतीय राष्ट्रीय संघातून खेळण्याची त्याची मनिषा आहे आणि लीगमुळे कबड्डीत जशी व्यावसायिकता येऊ पाहतेय त्याचा फायदा कबड्डी खेळाला व्हावा ही दोन्ही भावांची इच्छा आहे. कबड्डीपटूंसाठी फीजिओ, मसाज डॉक्टर अशा सुविधा वाढल्या पाहिजेत. कबड्डीपटूची कारकीर्द लहान असते.
अनेकदा दुखापतींनी ते आणखी लहान होतं. यासाठी कबड्डीत होणारे आजार आणि दुखापती यांचा विशेष अभ्यास व्हावा आणि कबड्डीपटूंना सरावाच्या चांगल्या सुविधाही मिळाल्या पाहिजेत ही एकमेव इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)