हर्षवर्धन पाटील: भाजप प्रवेशाचा निर्णय उशिरा घेतला असं वाटतं | विधानसभा निवडणूक

पाहा संपूर्ण मुलाखत -

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

"गेल्या पाच-दहा वर्षांपासून काँग्रेसमध्ये असताना मला असमाधानकारक वाटत होतं. अनेक गोष्टी स्वतःला कराव्या लागायच्या, त्याचं समाधानही मिळत नव्हतं. पण भाजपमध्ये तसं नाही. इथे शिस्त आहे आणि कार्यकर्त्यांचं जाळंही आहे. पक्षाची काम करण्याची पद्धत आहे. त्यामुळेच मला इथे समाधान मिळेल, असं वाटलं आणि मी हा निर्णय घेतला. हा निर्णय जरा उशिराच घेतला असं आता वाटतंय..."

काँग्रेसमधून भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील यांच्याशी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी संवाद साधला. त्या मुलाखतीचा हा संपादित अंश. काँग्रेसमधील अस्वस्थता आणि भाजप प्रवेशाबाबत ते बोलत होते.

तुम्ही पूर्वी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकलेली आहे. मग पुन्हा अपक्ष म्हणून लढण्याऐवजी भाजपत जावं का वाटलं?

इथे शिस्त असल्यामुळे आपल्या मतदारसंघासाठी काम करता येईल, असं वाटलं. इथे थेट अॅक्सेस आहे. इथं कामाचं योग्य मोजमाप होतं. नरेंद्र मोदींनी जे निर्णय 100 दिवसांत राबवले आहेत, ते विलक्षण आहेत.

तसंच तरुण जे काम करत आहेत ते ऊर्जा देणारं आहे. आपण परिस्थितीनुसार निर्णय घेत असतो. अपक्ष राहण्यापेक्षा पक्षात जाऊन राष्ट्रीय स्तरावर काम करणं जास्त आवश्यक वाटलं म्हणून मी इथे आलेलो आहे.

तुम्ही आधी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचा. आता तुम्ही पक्षाप्रमाणे रंग बदलला आहे का?

हर्षवर्धन पाटील

माझा रंग अजिबात बदललेला नाही. जनताजनार्दन हेच माझं ध्येय आहे. त्यांच्यासाठी मला काम करायचंय. इथे येऊन तेच करणार आहे. हो... मला शब्द न पाळणं अजिबात आवडत नाही, आम्ही शब्द पाळणारी माणसं आहोत.

सलग चारवेळा आम्ही शब्द पाळला. पण आम्हाला मदत करण्याची जी आश्वासनं दिली होती ती लोकसभेत पूर्ण झाली नाहीत आणि आताही होणार नव्हती. कळत नकळत मला ढकलून दिल्यासारखं झालं होतं. ते सहन करणं आता शक्य नव्हतं.

पक्ष बदलल्यामुळे आयडियॉलॉजी बदलते असं तुम्हाला वाटत नाही का?

आयडियॉलॉजी काय असते? जनतेच्या साथीमुळे सगळं घडत असतं. मला तर वाटतं, जनताच आयडियॉलॉजी ठरवत असते. जनता काय ठरवते ते आत्मसात करणं गरजेचं आहे. भाजप असो की काँग्रेस. हे काही वेगवेगळ्या देशांमधले पक्ष नाहीत. त्या काळातले लोक काँग्रेसला मानत होते.

पण आता वेळ बदलली आहे. त्यामुळे मला वाटतं की जनताच आयडियॉलॉजी असते. प्रत्येक घरामध्ये बदलाची प्रक्रिया सुरू झालेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

बीबीसीच्याच मुलाखतीत यशोमती ठाकूर म्हणाल्या होत्या, की भ्रष्ट होते ते पक्ष सोडून गेले. त्यावर तुम्हाला काय म्हणायचंय?

मी गेली 25 वर्षं या क्षेत्रात कार्यरत आहे. कोण काय आणि कसं आहे, ते लोकांना माहिती आहे. त्यावर मी वेगळं काय बोलू?

EDची कारवाई चुकवणं, संस्था वाचवणं यासाठी नेते भाजपत जाताहेत असं म्हटलं जात आहे. तुमचं यावर काय मत आहे?

जे चुकीचं काम करताहेत त्यांना भीती आहे. मी काहीही चूक केलेली नाही. मला कसलीही भीती नाही.

माझ्यावर अन्याय होत होता, दिलेली वचनं पाळली जात नव्हती. शिवाय माझ्या जनतेचाही आग्रह होता. मला वाटतं अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो. त्यामुळेच मी बाहेर पडलोय.

ईडीच्या चौकशीमध्ये शरद पवारांचं नाव आलंय. यात तथ्य आहे का?

गेल्या पाच वर्षांपासून मी सत्तेच्या प्रवाहापासून दूर आहे. मला याबद्दल काही माहीत नाही.

जितक्या रकमेचा घोटाळा झाला आहे, तितका पैसाच बँकेत नाही, असा दावा अजित पवारांनी केला आहे. तो कितपत खरा आहे?

माझ्या माहितीनुसार हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्यावर मी भाष्य करू शकत नाही. सुप्रीम कोर्टानं पाच दिवसांमध्ये FIR दाखल करायला सांगितला होता. EDनं गुन्हा दाखल करायचा निर्णय घेतला. ते काय, कसं झालं ते त्यांच्यासमोर मांडावं लागणार आहे.

हर्षवर्धन पाटील

ज्या ऑथॉरिटीनं ऑर्डर केली आहे आणि ते आपल्याला पटत नसेल तर ते त्या ऑथॉरिटीसमोर जाऊन सांगावं लागणार आहे. त्यावर मी भाष्य करू शकणार नाही.

सुप्रिया सुळेंनी तुम्हा सर्वांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध आहेत असं म्हटलं आहे. पण ते राजकारणात दिसत नाहीत, असं का?

ताईंनी जे म्हटलंय ते खरंच आहे. आमचे खरोखर जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पण राजकारण त्याच्या जागी असतं. मला वेगळा मार्ग घ्यायला लागला, त्यांचेही मार्ग वेगळे आहेत.

आघाडीचं सरकार असतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण मिळालं होतं. पण बरेचदा महिलांऐवजी त्यांचे पतीच काम करताना दिसतात. जास्तीत जास्त महिलांनी राजकारणात यावं, त्या आमदार-खासदार व्हाव्यात यासाठी काय व्हायला पाहिजे, असं तुम्हाला वाटतं?

नुसत्या आरक्षणाने काही होणार नाही. पुरुषप्रधान संस्कृती बदलून आता समानतेची संस्कृती निर्माण झाली पाहिजे. आपल्या देशात 50 टक्के महिला आहेत. त्यांना जे आरक्षण मिळतं, त्यात एक त्रुटी आहे. ते दर पाच वर्षांनी बदलतं. एकदा आरक्षण मिळालं तरी ते पुढच्या वेळेस ओपन होतं आणि तिथे महिला निवडून येऊ शकत नाही. हे आरक्षण किमान 10 वर्षं पडलं पाहिजे.

दुसरं म्हणजे आरक्षण निघालं म्हणून महिलेला उमेदवारी द्यायची तरी दोन पदं निर्माण होतात. महिला पदाधिकारी सरपंच होते आणि तिचे पती 'मिस्टर सरपंच' म्हणून ओळखले जायला लागतात. तर हे दोन बदल व्हायला हवेत.

तुमचा मुलगा आणि मुलगी यांच्यापैकी तुमचा वारसाहक्क कुणाला मिळणार?

वारसाहक्क कर्तृत्वातून सिद्ध केला जातो. मी मुलगा आणि मुलीमध्ये अंतरच मानत नाही. सध्याचा जमाना कॉम्पिटिशनचा आहे. राजकारण ही एक ऑनगोईंग प्रोसेस आहे. पण जे समाजकार्य करतात ते टिकतात. त्यामुळे समाजकारणाचा प्रयत्न केला पाहिजे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)