हर्षवर्धन पाटील यांच्या काँग्रेसवरील नाराजीचं शरद पवारांशी असलेलं कनेक्शन

शरद पवार, हर्षवर्धन पाटील

फोटो स्रोत, Facebook

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस राज्यात सत्तेत असताना मंत्रिपदी राहिलेले नेते हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये दाखल झाले आहेत. ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये का गेले? याचा हा आढावा.

"आता पवारांसोबत आरपारची लढाई असेल. आतापर्यंत चांगुलपणा पाहिला, आता आक्रमकपणा बघा." असं म्हणत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरातल्या 4 सप्टेंबर 2019 च्या 'जनसंकल्प' मेळाव्यात मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. अजित पवार हे त्यांच्या मुख्यत्वानं निशाण्यावर होते.

हर्षवर्धन पाटील यांच्या नाराजीचं 'पवार कनेक्शन'

हर्षवर्धन पाटील यांच्या नाराजीचं कारण हे शरद पवारांशी जोडलेलं आहे. "1991 साली हर्षवर्धन पाटील यांचे काका आणि माजी मंत्री शंकरराव पाटील यांचं बारामती मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट कापून शरद पवार यांनी पुतणे अजित पवार यांना तिकीट दिलं. तेव्हापासून शंकरराव पाटील आणि हर्षवर्धन पाटील हे पवार कुटुंबीयांबाबत नाराजी आहे," असं ज्येष्ठ पत्रकार दत्ता सावंत सांगतात.

शंकरराव पाटील हे 1980 साली आणि 1989 साली अशा दोनवेळा बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून संसदेत निवडून गेले होते.

"1994 साली हर्षवर्धन पाटील पुणे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होते. मात्र, त्यावेळी काँग्रेसनं तिकीट नाकारलं गेलं. अजित पवारांमुळे तिकीट नाकारल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळं काँग्रेसविरोधात अपक्ष उभे राहून हर्षवर्धन पाटील झेडपीत विजयी होऊन गेले," असं दत्ता सावंत सांगतात.

हर्षवर्धन पाटील

फोटो स्रोत, Facebook

ते पुढे म्हणतात, "1995 साली हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून विधानसभा निवडणूक लढू इच्छित होते. मात्र, तेव्हाही त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. मग अपक्ष लढून ते विजयी झाले. त्यामुळं अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचा संघर्ष सुरूच झाला."

"स्वपक्षातून हर्षवर्धन पाटलांना काहीच त्रास नव्हता. पक्षाअंतर्गत विश्वासू नेते होते ते. आताही निवडून आले असते आणि आघाडीची सत्ता असती, तर ते मंत्री झालेच असते. त्यामुळं स्वपक्षाकडून त्रासाचा प्रश्नच नव्हता." असंही दत्ता सावंत सांगतात.

हर्षवर्धन पाटलांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत पोहोचलेला असला, तरी गेल्या काही वर्षांपासून त्यांना इंदापूर या त्यांच्या मतदारसंघापुरतेच मर्यादित राहावं लागल्याचं चित्र आहे.

पुणे जिल्हा परिषद ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री

केंद्र सरकारच्या लेजिस्लेटिव्ह बॉडीज इन इंडिया या वेबसाइटनुसार पाटलांनी भिगवणमध्ये प्राथमिक ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत शिक्षण घेतलं. पुढे बी. कॉम. आणि एलएलबीचं शिक्षण घेतलेल्या हर्षवर्धन पाटील यांचं मराठीसह हिंदी आणि इंग्रजीवरही प्रभुत्व आहे. पुणे जिल्हा परिषदेत सदस्य इथपासून हर्षवर्धन पाटलांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

1995, 1999, 2004 आणि 2009 अशा चारवेळा ते विधानसभेत इंदापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले.

1995 ते 1999 या कालावधीत हर्षवर्धन पाटलांनी कृषी, जलसंधारण आणि फलोत्पादन या तीन खात्याचं राज्यमंत्रिपद सांभाळलं. त्यानंतर 2002 ते 2004 या कालावधीत ते राज्याचे विपणन आणि रोहयो मंत्री होते. 2004 ते 2009 या कालावधीत विपणन, रोहयोसह संसदीय कामकाज मंत्रीपद सुद्धा होते. 2009 ते 2014 या दरम्यान सुद्धा ते कॅबिनेट मंत्री होते.

2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्ता भारणेंनी हर्षवर्धन पाटलांना पराभूत केलं. तेव्हापासून राष्ट्रवादीविरोधात त्यांनी उघड नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली होती आणि मित्रपक्षासोबतची धुसफूस वारंवार समोर येत राहिली.

स्वपक्षामुळं नव्हे, मित्रपक्षामुळं नाराज झालेला नेता

चार सप्टेंबरच्या जनसंकल्प सभेत हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. त्यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, "मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस दगाबाजी, फसवणूक, लबाडी केली आणि स्वपक्षाने वाऱ्यावर सोडलं. आपण कात्रीत सापडलो, आता माझा मार्ग मोकळा आहे. आता पवारांसोबत आरपारची लढाई असेल. आतापर्यंत चांगुलपणा पाहिला आता आक्रमकपणा बघा."

हर्षवर्धन पाटील

फोटो स्रोत, Facebook

ते पुढे म्हणाले, "इंदापूरची जागा मिळण्याबाबत अद्याप साशंकता आहे. काँग्रेस पक्षाकडून आपल्याला हमी मिळत नाही. लोकसभेला सुप्रिया सुळे यांना मदत करा, विधानसभेला इंदापूरची जागा तम्हाला सोडू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसने दिली होती. आम्ही आमचा शब्द पूर्ण केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आता या जागेचा हट्ट करून विश्वासघात करत आहे. राष्ट्रवादी कांग्रेसकडून वारंवार विश्वासघात होत असतानाही काँग्रेसने आपल्याला वाऱ्यावर सोडलं. काँग्रेस हतबल असली तरी माझ्यामागे जनतेचा भक्कम पाठिंबा आहे."

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा इंदापुरात आल्यापासूनच हर्षवर्धन पाटील अस्वस्थ होते. ही अस्वस्थता त्यांनी जनसंकल्प मेळाव्यातूनही दिसून आलं.

पवारविरुद्ध पाटील संघर्ष पूर्वीपासूनच

ज्येष्ठ पत्रकार संजय मिस्किन सांगतात, "पवार आणि पाटील यांच्यात पूर्वीपासूनच राजकीय संघर्ष आहे. पाटील यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासूनच त्यांचे वेळोवेळी पवारांशी खटके उडाले आहेत. त्यांनी इंदापूरमध्ये सुरूवातीला अपक्ष, नंतर काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला होता. मागच्या वेळी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आल्यानंतर हा मतदारसंघ आघाडीत काँग्रेसला सुटत नाही अशी त्यांना भीती होती."

हर्षवर्धन पाटील

फोटो स्रोत, Facebook

या मतदारसंघात शिवसेना आणि भाजप या दोघांचंही अस्तित्व कमकुवत आहे. तिथं फक्त गटबाजीचं राजकारण आहे. दोन्ही पक्षातही मोठे नेते नाहीत. युती झाल्यानंतर सेना ही जागा सोडूही शकते त्यामुळे भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला असण्याची शक्यता आहे, असं मिस्कीन सांगतात.

'हर्षवर्धन पाटील पुणे जिल्ह्यातला भाजपचा मोठा चेहरा ठरतील'

भाजप प्रवेशानंतर भाजप हर्षवर्धन पाटलांना पुणे जिल्ह्यातला मोठा चेहरा म्हणून समोर करण्याची शक्यता असल्याचं मत मिस्कीन व्यक्त करतात.

ते सांगतात, "हर्षवर्धन पाटलांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात भाजपला पवारांच्या विरोधातला एक मोठा मराठा चेहरा मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाचं पुण्यात मोठं स्थान आहे. आमदारही जास्त आहेत. पण ते आपापल्या मतदारसंघापुरते मर्यादीत आहेत."

विशेषतः पवारांच्या विरोधातील राजकारणासाठी हर्षवर्धन पाटील यांचा वापर भाजप करून घेऊ शकतो. जिल्ह्याच्या राजकारणात भाजप त्यांना मोठ्या प्रमाणात पाठबळ देईल. कदाचित त्यांना मंत्रिपदाची संधीही दिली जाऊ शकते, असा अंदाज मिस्कीन यांनी व्यक्त केला.

हर्षवर्धन पाटील

फोटो स्रोत, Facebook

स्वत: हर्षवर्धन पाटलांनी इंदापुरातल्या मेळाव्यात सांगितलं होतं की, लोकसभा निवडणुकीवेळीच देवेंद्र फडणवीसांनी त्यांना भाजपकडून बारामती लोकसभा लढवण्यास सांगितलं होतं.

त्यामुळं 'मिशन बारामती' सर करण्यासाठी भाजप हर्षवर्धन पाटलांचा वापर करू शकते, असा अनेकांचा अंदाज आहे.

फडणवीसांचं कौतुक आणि भाजपप्रवेशाचे संकेत

कोणतेही काम घेऊन गेल्यास कधी नाही म्हटलं नाही, असं म्हणत हर्षवर्धन पाटलांनी जनसंकल्प मेळाव्यात फडणवीसांचं कौतुक केलं होतं. त्याचवेळी त्यांनी स्पष्टपणे भाजपप्रवेशाचे संकेत दिले होते.

हर्षवर्धन पाटील

फोटो स्रोत, Facebook

मात्र त्याआधीही हर्षवर्धन पाटलांनी फडणवीसांचं कौतुक केलंय. काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या 'विधानगाथा' पुस्तकाचं शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झालं.

या पुस्तकात सुद्धा हर्षवर्धन पाटलांनी 'उत्कृष्ट संसदपटू' या मथळ्याखाली देवेंद्र फडणवीस यांची भरभरून स्तुती केली होती. त्यामुळं एका अर्थानं गेल्या काही महिन्यांपासूनच हर्षवर्धन पाटलांनी भाजपप्रवेशाचे संकेत दिले होते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)