पुणे गणेशोत्सव: गणपती मंडळातला एक कार्यकर्ता पुढे नेता कसा बनतो?

फोटो स्रोत, Hindustan Times/getty
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कोणत्याही सणांवर, विशेषत: गणेशोत्सवावर राजकीय नेत्यांची आणि पक्षांची भिस्त कशी असते हे सर्वश्रुत आहे. पण जिथं सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली त्या पुणे शहरात गणेशोत्सव आणि राजकारण यांची वीण वैशिष्ट्यपूर्ण आहे.
पुण्यात नगरसेवकच नव्हे, तर आमदार आणि खासदारपदापर्यंत जाणारा मार्ग या गणपती मंडळाच्या नेटर्वकमधूनच जातो.
पुणे शहरात नोंदणी झालेल्या सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या काही हजारावर आहे. त्यातली कित्येक अर्धशतकाहूनही अधिक काळ जुनी आहेत.
गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते नेता हा प्रवास कसा असतो? हे दिनेश थिटे यांनी बीबीसीला सांगितलं.
मंडळ कार्यकर्ता ते नेता
दिनेश थिटे यांनी पत्रकार म्हणून अनेक वर्षं पुण्याचा गणेशोत्सव अभ्यासला आहे आणि त्यांच्या पी. एच. डी प्रबंधाचा विषय हा 'पुण्याचा गणेशोत्सव आणि राजकारण' हा होता.
ते म्हणतात,"गणेशोत्सव मंडळात काम करतांना कार्यकर्ता लोकांशी संपर्क कसा करायचा, टीममध्ये काम कसं करायचं अशी सार्वजनिक कामासाठी आणि संघटना बांधणीसाठी आवश्यक असणारी कौशल्यं शिकतो. त्या अर्थानं गणेशोत्सव ही राजकीय कारकीर्दीची बालवाडी आहे. पण राजकारणाचं स्वरूप गुंतागुंतीचं असतं आणि अलीकडच्या काळात तर ते अधिक गुंतागुंतीचं झालं आहे."

फोटो स्रोत, Getty Images
"त्यामुळे सध्या गणेशोत्सवातून जे प्रशिक्षण मिळतं ते पुरेसं ठरत नाही. त्याच्या पुढे जाऊन त्या कार्यकर्त्याला संबंधित राजकीय संघटनेत काम करावं लागतं. केवळ गणेशोत्सवाच्या माध्यमातनं स्थानिक पातळीवर उत्तम जनसंपर्क झाला आहे, तेवढं पुरत नाही. पण सुरुवात करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी हे खूप चांगलं माध्यम आहे. आपली प्रतिमा निर्माण करणं, सहका-यांची टीम तयार करणं हे सगळं इथं करता येतं," थिटे सांगतात.
पुण्याच्या राजकारणावर मंडळांचा प्रभाव
गणपती मंडळांचा पुण्याच्या राजकारणावर नेमका काय प्रभाव पडतो हे पाहण्यासाठी तन्मय कानिटकर यांचं मत पाहणं योग्य ठरू शकतं.
तन्मय कानिटकर यांची 'परिवर्तन' ही संस्था पुण्यात काम करते. राजकीय पक्षांचे, नगरसेवकांचे, महानगरपालिकेचे कामकाज यावर ही संस्था नजर ठेवून असते. त्यांनीही गणेशोत्सवाचा राजकारणावर प्रभाव पुण्यात कसा असतो याचं अनेक वर्षं निरिक्षण केलं आहे.
या विषयावर लिहलेल्या ब्लॉगमध्ये तन्मय लिहितात, "गणेश मंडळांचा अत्यंत मोठा फायदा म्हणजे कार्यकर्ते. निष्ठावान आणि पडेल ते काम करण्याची तयारी व कुवत असलेले कार्यकर्ते न मिळणं ही तक्रार सामाजिक संस्थांपासून राजकीय पक्षांपर्यंत सर्वांचीच.
"त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीमुळे तावून सुलाखून निघालेला कार्यकर्ता राजकीय पक्षाच्या सभा-मोर्चा, निवडणुकीच्या वेळी मतदारांना त्यांचे मतदान केंद्र वगैरे सांगणाऱ्या स्लिपा वाटण्याचे काम अशा विविध वेळी उपयोगी पडतो. वर्गणीच्या निमित्ताने त्या भागातलं घर अन् घर माहीत झालेला कार्यकर्ता राजकीय पुढाऱ्याला प्रचाराच्या दृष्टीने फारंच महत्वाचा असतो यात नवल ते काय!

फोटो स्रोत, AFP
"असा कार्यकर्ता त्याला गणेश मंडळ सोडून कुठेही मिळत नाही ही आजची सत्य परिस्थिती आहे. आम्हाला आमच्या 'परिवर्तन' संस्थेत काम करतानाही गणेश मंडळात काम केलेल्या आणि न केलेल्या कार्यकर्त्यांत फरक जाणवतो. सहजपणे आलेला बिनधास्तपणा, आत्मविश्वास हे गुण त्यांना त्यांच्या मंडळात केलेल्या कामामुळे मिळालेले असतात. शिवाय छोट्या मोठ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी जी धडाडी लागते तीही मंडळाचे काम केलेल्यांमध्ये अधिक असल्याचे जाणवते," कानिटकर लिहितात.
भाऊ-दादा-साहेब म्हणणाऱ्यांची फौज
साहजिक आहे की सगळेच राजकीय पक्ष आणि नेते या गणेश मंडळांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतात. "पुण्याच्या स्थानिक राजकारणातील बहुतांश राजकीय नेत्यांची मुळं ही सार्वजनिक गणेशोत्सवात आहेत. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या मंडळांच्या पातळीवरच्या जनसंपर्काचा परिणाम अधिक होतो. विधानसभा-लोकसभेच्या निवडणुकीची गणितं वेगळी आहेत. तेवढे मोठे झाले की मग नेते वेगवेगळ्या मंडळांना जवळ करतात," दिनेश थिटे म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
राजकीय पक्ष आणि गणेश मंडळातला फरक समजावून सांगताना कानिटकर लिहितात,"गणेश मंडळाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे गणेश मंडळाचा डोलारा एकाच व्यक्ती भोवती उभी राहू शकतो. पण राजकीय पक्षात मात्र असे होत नाही. राजकीय पक्षाचे एखादे पद आज आपल्याकडे असेल पण उद्या नसले तर आपण आपले राजकारणातले अस्तित्व टिकवून ठेवायचे कसे हा मोठाच प्रश्न आमच्या राजकीय नेत्यांना पडतो."
पुढे ते लिहितात, "तेव्हा त्यांना आधार मिळतो स्वतःच्या गणेश मंडळाचा. या मंडळाकडून सातत्याने इतर उत्सव आणि कार्यक्रम वगैरे घेऊन निदान आपल्या भागात तरी आपल्याच राजकीय पक्षाला समांतर असे स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.
"यामुळे होते असे की निवडणुकीत तिकिट कोणत्याही पक्षाकडून मिळाली तरी विजयाची शक्यता वाढते. याच विचारधारेतून निवडणूकपूर्व बंडखोरीला ऊत येतो. 'निवडून येण्याची क्षमता' या महत्त्वपूर्ण निकषावर राजकीय पक्ष तिकीट देत असल्याने, त्यांनाही संस्थाने बनलेल्या गणेश मंडळांच्या राज्यावर राज्य करणाऱ्या मंडळींचे पाय पकडण्यात काही चूक वाटत नाही. साहजिकच व्यक्तिवादी राजकारण करण्यासाठी, आपल्याला भाऊ-दादा-साहेब म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज निर्माण करण्यासाठी गणेश मंडळांचा फार मोठा उपयोग होतो," तन्मय कानिटकर या विषयावरच्या ब्लॉगमध्ये लिहितात.
गणेशोत्सवाने अलीकडच्या काळात पुण्याला दिलेले नेते
या गणेशोत्सवानं अनेक नेते पुण्याला दिले आहेत. पुण्याचे बहुतांशी नगरसेवक हे त्यांच्या प्रभागातल्या मंडळाचे अध्यक्ष असतातच. 'अखिल मंडई मित्र मंडळ' म्हणजे पुण्याचा मंडईचा गणपती तर महत्वाच्या गणपतींपैकी एक. एकेकाळी मंडई ही पुण्याच्या राजकारणाचं केंद्र मानलं जायचं. या मित्र मंडळाचे अध्यक्ष वसंतराव ऊर्फ तात्या थोरात हे पुण्याचे कसबा मतदारसंघाचे आमदार होते.
सुरेश कलमाडी अनेकदा पुण्याचे खासदार झाले. त्यांनीही त्यांच्या राजकारणात पुण्यावर असलेल्या गणेशोत्सवाच्या प्रभावाचा उपयोग करून घेतला. 'पुणे फेस्टिव्हल' त्यांनी सुरू केला आणि त्याला पुण्याची ओळखही बनवली.
त्यातून प्रतिमा निर्मितीसोबतच शहरांतल्या वेगवेगळ्या भागातल्या मतदारांनाही त्यांनी जोडलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








