गणपतीः कराचीतल्या मराठी घरात ‘गणपती बाप्पा मोरया’
- Author, शुमाईला जाफरी
- Role, बीबीसी प्रतिनिधी, कराची, पाकिस्तान
कराची म्हणजे पाकिस्तानातलं संवेदनशील शहर. महाराष्ट्रापासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या कराचीत चक्क गणपती बाप्पाचं आगमन होतं. आश्चर्य, धक्का, अविश्वास- अशा सगळ्या भावना मनात दाटल्या ना! पण हे अगदी खरं आहे.
कराचीतल्या क्लिफटन भागात एक छोटीशी बिल्डिंग आहे. गणेशोत्सवाच्या काळात या बिल्डिंगमध्ये जल्लोषाचं, आनंदाचं वातावरण असतं.
बिल्डिंग आहे देवानंद संदीकर नावाच्या माणसाची. संदीकर हे पाकिस्तानातल्या महाराष्ट्र पंचायतीचे प्रमुख आहेत.
सख्खे शेजारी पाकिस्तानमध्ये मराठी समाज आहे. त्यांची संख्या अगदीच कमी आहे पण त्यांचं अस्तित्व नक्कीच आहे.
गणपतींच्या निमित्तानं अख्खी बिल्डिंग धार्मिक कार्यासाठी तय्यार झाली आहे. रंगीबेरंगी साड्या आणि सोन्याच्या दागिन्यांनी वातावरण सजलं आहे. मोदक तयार करण्याचं काम जोरात सुरू आहे. गणपती बाप्पाला नैवैद्य म्हणून मोदक आवडतात म्हणून हा घाट घातला गेला आहे.

संदीकर यांच्या पत्नी मलका सांगतात, 'गणपतीला नैवैद्य म्हणून अनेक पक्वान्नं तयार होतात पण मोदक त्यांना सगळ्यांत प्रिय आहेत. तांदुळाची पिठी, नारळ, गूळ आणि रवा यांच्या मिश्रणातून मोदक तयार होतात. आता मोदक तयार करतानाही अनेक प्रयोग केले जातात. चॉकलेट मोदक, व्हॅनिला फ्लेव्हर मोदक असे अनोखे प्रयोग केले जातात.
भारतातून मागवली जाते मूर्ती
मलका यांनी दिवे, रंग आणि रांगोळ्यांनी घर सुंदर असं सजवलं आहे. धूप जाळून वातावरण प्रसन्न झालं होतं. गणपतीआधी देवानंद थोडेसे काळजीत होते. गणपतीची मूर्ती भारतातून दुबईमार्गे मागवली जाते.

"गणपतीची मूर्ती आमच्यासाठी महत्त्वाची आहे. हा गणपतीचा सण आहे. ही मूर्ती सुरेख असावी अशी आमची इच्छा असते. पाकिस्तानमध्येही मूर्ती बनवल्या जातात. मात्र त्या मूर्तींमध्ये सुबकता, आखीवरेखीवपणा नसतो. त्यामुळे भारतातले आमचे नातेवाईक मूर्ती पाठवतात. यंदा मूर्ती यायला उशीर झाला. कस्टम्सच्या प्रक्रियेत मूर्ती खोळंबली होती." वेळेत मूर्ती आली नाही तर काय करायचं याचा विचार देवानंद यांना सतावत होता. दुबईतल्या नातेवाईकांना एक मूर्ती विकत घेऊन पाकिस्तानात यायला सांगितलं. पुढच्याच दिवशी भाऊ बाप्पांच्या मूर्तीसह पाकिस्तानात अवतरला आणि देव यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

लगेचच गणपती उत्सवाला सुरुवात झाली. मोदकांचा नेवैद्य दाखवण्यात आला. बुंदीचे लाडू तयार करण्यात आले. आजूबाजचे सगळेजण जमले. पूजा झाली, आरत्या झाल्या. नाचत गात सगळी मंडळी कराचीतल्या रत्नेश्वर मंदिरात पोहोचले. त्याठिकाणी मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली.
रत्नेश्वर महादेव मंदिर कराचीतल्या क्लिफटन भागातल्या समुद्रकिनाऱ्याजवळच आहे. मंदिराला अनेक वर्षांचा इतिहास आहे. गणेशोत्सवाच्या काळात सगळे कार्यक्रम याच मंदिरात केलं जातं.
दूधाने पूजा
इथे साधारण पाचशे माणसं जमतात. मराठी माणसांच्या बरोबरीनं हिंदूधर्मीय माणसंही भक्तिभावानं जमतात. या सोहळ्यात कोणीही सामील होऊ शकतं. कसलाही प्रतिबंध नसतो. मंदिराल्या एका मोठ्या सभागृहात बाप्पा विराजमान होतात. सभागृहालाही घरच्याप्रमाणे सजवण्यात आलं आहे. संध्याकाळी इथं शेकडो माणसं जमतात.

मंदिराचे पुजारी रवी रमेश गणेशाची पूजाअर्चा करतात. वेगवेगळ्या पद्धतीने फुलं वाहली जातात. दूध आणि मधानं अभिषेक केला जातो.
रवी रमेश गणेशोत्सवाच्या आठवणींना उजाळा देतात. ते सांगतात, 'आम्ही दरवर्षी गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करतो. संपूर्ण सिंध प्रांतातून माणसं इथे जमतात."
जेवढी माणसं येतात, प्रत्येकाला गणपतीची पूजा करण्याची संधी मिळते. दिवसरात्र पूजाअर्चा, अभिषेक सुरू असतं. दुसऱ्या दिवशी सगळे भाविक पुन्हा जमतात. सगळे मिळून अरबी समुद्रात बाप्पांचं विसर्जन केलं जातं.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा जयजकार निनादतो. मूर्ती विसर्जनासह गणेशोत्सवाची सांगता होते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









