'मी मुसलमान आहे आणि मी गणपती बाप्पा मोरया म्हणतो'

JAVED SAYYAD

फोटो स्रोत, JAVED SAYYAD

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी

"होय, माझ्याकडून चूक झाली आहे आणि मी पुन्हा अशी चूक करणार नाही. मी सुद्धा एक माणूस आहे आणि माणसाकडून चूक होत असते," असा वारिस पठाण यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी एका गणेश मंडळाच्या कार्यक्रमात वारिस यांनी 'गणपती बाप्पा मोरया' म्हटलं होतं.

त्यासंदर्भात माफी मागितल्यानं वारिस वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

वारिस पठाण हे AIMIM पक्षाचे नेते असून ते भायखळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"मी गणपती मंडळात जे काही बोललो तो व्हीडिओ आणि त्यानंतर आलेला व्हीडिओ असे दोन्ही व्हीडिओ उपलब्ध आहेत. मी आजारी असल्यानं अधिक बोलू शकत नाही," असं वारिस पठाण यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

पण व्हीडिओत तुम्ही माफी मागताना दिसत आहात. गणपती मंडळाच्या कार्यक्रमातील तुमच्या उपस्थितीबद्दलच ती माफी आहे काय, असं विचारल्यावर वारिस यांनी सांगितलं की, "होय तो व्हीडिओ त्यासंबंधीच आहे."

'मी स्वत: गणपती बाप्पा मोरया म्हणतो'

कोल्हापुरातल्या बाबुजमाल दर्ग्यात हिंदू-मुस्लीम दरवर्षी एकत्र येत गणेशोत्सव साजरा करतात. जावेद सय्यद या दर्ग्याचे मुजावर आहेत.

बाबुजमाल दर्ग्यातील यंदाचा गणेशोत्सव

फोटो स्रोत, SWATI PATIL RAJGOLKAR

फोटो कॅप्शन, बाबुजमाल दर्ग्यातील यंदाचा गणेशोत्सव.

ते सांगतात, "मी मुसलमान असून दरवर्षी गणपती बसवतो आणि गणपती बाप्पा मोरया म्हणतो. वारिस पठाण यांची वर्तणूक पूर्णत: चुकीची आहे. त्यांचं हे असं वर्तन म्हणजे समाजात तेढ निर्माण करणारं आहे. प्रत्येक माणसानं मग तो राजकारणी असो की अन्य कुणी, स्वत:चा धर्म घरात ठेवला पाहिजे आणि घरातून ज्यावेळेला तो बाहेर पडतो त्यावेळेला त्यानं कुणाच्याही भावना दुखावू नये."

"वारिस यांनी सामाजिक एकोप्याचं भान ठेवलं पाहिजे. कोल्हापूर आणि महाराष्ट्रातली जनता राष्ट्रीय एकोप्यासाठी प्रयत्न करत असताना असं कुणीतरी उलट-सुलट वक्तव्य करणं चुकीचं आहे," वारिस यांच्या व्हीडिओबद्दल विचारल्यावर जावेद पुढे सांगतात.

जावेद गणपतीची पुजा करताना

फोटो स्रोत, JAVED SAYYAD

"निर्माता हा एकच आहे. मग त्याला तुम्ही गणपती म्हणा, अल्ला म्हणा, गॉड म्हणा किंवा जीजस म्हणा, त्याने काही फरक पडत नाही. प्रत्येकाची प्रथा वेगळी असेल पद्धतही वेगळी असेल, शेवटी ज्याच्यासमोर नतमस्तक व्हायचं तो एकच आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येत एकमेकांचे सण साजरे केले पाहिजेत," जावेद पुढे सांगतात.

वारिस पठाण गणपती बाप्पा मोरया कसं म्हणतात? - नौशाद उस्मान

यानंतर आम्ही मुस्लीम धर्माचे अभ्यासक नौशाद उस्मान यांच्याशी संपर्क साधला.

"इस्लाम सर्वमानवसमभाव मानतो, सर्वधर्मसमभाव नाही. वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना इस्लाम मान्य करतो. पण त्यासाठी मतभेद असूच शकत नाही, भेद नाहीतच असा अतार्किकपणा इस्लामला मान्य नाही. तसंच देखावा इस्लामला मान्य नाही. कुणाला खूश करण्यासाठी नाटक करणं हेही इस्लामला मान्य नाही.

माझ्या मानेवर तलवार ठेवली तरी मी भारत माता की जय म्हणणार नाही, असं म्हणणारे वारिस पठाण गणपती बाप्पा मोरया कसं काय म्हणतात?" वारिस यांच्या वक्तव्याबद्दल सांगतात.

अभिनेता शाहरुख खान याच्या घरातील गणपती.

फोटो स्रोत, Shah Rukh Khan/Twitter

फोटो कॅप्शन, अभिनेता शाहरुख खानच्या घरातील गणपती.

"अल्लाहशिवाय कुणीच सुखकर्ता आणि दुखहर्ता नाही. तेच आम्ही अजानमध्ये 5 वेळा सांगत असतो. गणपती बाप्पा मोरया म्हणण्याला आमचा आक्षेप नाही. पण त्या व्हीडिओत वारिस यांनी आधी जी प्रार्थना म्हटली...मैं प्रार्थना करता हू गणेशजी से की गणेशजी आपको हॅपीनेस दे, गणेशजी आपके संकट दूर करे, याला आमचा आक्षेप आहे.

अल्लाहशिवाय दुसऱ्या कुणाचंतरी नाव घेऊन प्रार्थना करणं मग ते पैगंबरांचही नाव का असेना, याला आमचा आक्षेप आहे. वारिस यांनी आधी प्रार्थना केली आणि आता माफी मागितलीय. हे आमच्या हिशोबानं चांगलं झालं आहे. परंतु अशा प्रकारचं नाटक करायची काही गरज नव्हती," उस्मान पुढे सांगतात.

नेत्यांनी धार्मिक राजकारण करू नये - शमसुद्दीन तांबोळी

"आज लोक मोहरम आणि गणेशोत्सव एकत्र साजरा करत आहे. या माध्यमातून एकमेकांबद्दलचा आदर व्यक्त करण्यात येत आहे. लोकांना आज सलोखा हवाय, सद्भाव हवाय. या पार्श्वभूमीवर एखादा नेता म्हणतो की मी माफी मागतो, माझी चूक झाली तेव्हा आपण समाजाला काय मेसेज देत आहे हे पाहिलं पाहिजे.

अशा प्रकारचं वक्तव्य म्हणजे समाजात विष कालवण्याचा प्रयत्न आहे," वारिस यांच्या व्हीडिओबद्दल विचारल्यावर मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी सांगतात.

वारिस पठाण

फोटो स्रोत, Waris Pathan/Facebook

फोटो कॅप्शन, वारिस पठाण

"मुस्लीम समाजातही धार्मिक बहुसांस्कृतिकता आहे. काही लोक दर्गा संस्कृती मान्य करतात तर काही लोकांना ती मान्य नाही. शिया आणि सुन्नींमध्ये मोहरम साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. असं असताना काही मूठभर लोक वक्तव्य करतात आणि त्याचे परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतात. समाजाचे नेते म्हणवणाऱ्या लोकांनी अशा पद्धतीचं धार्मिक राजकारण करू नये," शमसुद्दीन पुढे सांगतात.

"भारतीय समाज धार्मिक आहे. सामाजिक वातावरण बिघडू नये, अशा पद्धतीनं सण साजरे करणं गरजेचं आहे. डीजेचा वापर करणं, मोठ्या आवाजात अजान देणं या बाबी जर आजच्या काळात सुसंगत नसेल तर त्याला सुसंगत करता आलं पाहिजे. काळानुरुप यात बदल व्हायला पाहिजेत.

धार्मिक सणाला मानवताभिमुख करणारे आदर्श नेत्यांनी घालून द्यायला पाहिजेत. पण हे लोक तसं न करता उन्मादी पद्धतीनं वागत आहेत," शमसुद्दीन त्यांची चिंता व्यक्त करतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)