अजित पवारांनी तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्याचा अर्थ काय?

अजित पवार

फोटो स्रोत, FACEBOOK

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसंच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक बड्या नेत्यांवर ईडीने गुन्हा दाखल केला. ईडीच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी शरद पवार उभे ठाकले.

शुक्रवारी ईडीच्या चौकशीसाठी नंतर वेळ नसल्याचं सांगत शरद पवार यांनी स्वतःहून चौकशीसाठी जाणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं.

शुक्रवारी (27 सप्टेंबर) शरद पवारांच्या ईडीमध्ये हजेरी लावण्यावरुन नाट्य रंगलं असतानाच अचानकपणे अजित पवारांच्या राजीनाम्याची बातमी समोर आली.

एकीकडे शरद पवार यांच्या ईडीबाबतच्या घडामोडी सुरू असतानाच अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा निर्णय घेताना शरद पवारांशीही चर्चा केली नसल्याची माहिती समोर आली. अजित पवारांनी अचानक दिलेल्या या राजीनाम्याचा अर्थ काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.

राजीनामा देण्याची वेळ चुकीची ?

अजित पवारांचा हा निर्णय म्हणजे वेडेपणाचा निर्णय असल्याचं मत राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांनी व्यक्त केलं.

"त्यांची नेमकी नाराजी काय आहे हे आपल्याला माहीत नाही. त्यांनी ती स्पष्ट केली नाही. राजीनामा देण्याची वेळ अजित पवारांनी चुकीची निवडली. शरद पवार यांनी सरकार तसंच ईडीच्या विरोधात संघर्ष करत मोठं यश मिळवलं. योग्य वेळी कार्यालयात जाण्यापासून माघार घेऊन जबाबदारीची जाणीवही दाखवून दिली. पण अजित पवारांच्या निर्णयामुळे शरद पवारांच्या यशाचं महत्त्व कमी झालं आहे," असं आसबे यांनी म्हटलं.

अजित पवार

आसबे यांनी पुढे म्हटलं, की काल शरद पवार यांनी ईडी चौकशीच्या माध्यमातून पक्षाला मोमेंटम देण्याचा प्रयत्न केला होता. त्यादरम्यान अजित पवारांनी अशी कृती करण्याला अनेक अर्थ आहेत. हे टायमिंग अजित पवार यांनी मुद्दामहून निवडलं असंही वाटतं. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अजित पवारांनी राजीनामा दिला आहे. गेल्या महिनाभर पक्षातून आऊटगोईंग चाललं होतं. निराशेचं वातावरण होतं. ईडीच्या चौकशीच्या माध्यमातून कार्यकर्ते चार्ज झाले होते. त्यांच्यावर या राजीनाम्याचा परिणाम होईल.

नाराजी चव्हाट्यावर

अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील त्यांची नाराजी प्रकर्षाने दिसून आली, असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात.

"कालचा दिवस राजीनाम्यासाठी योग्य नव्हता. मुळात राजीनामा पक्षातील कोणत्याही नेत्यांशी चर्चा न करता देण्यात आला. विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. अशा वेळी राजीनामा देण्याला तसा काही अर्थ नाही. असा राजीनामा म्हणजे निषेध सिद्ध करण्याचा एक प्रयत्न असतो, असं देशपांडे यांनी म्हटलं.

अजित पवार

फोटो स्रोत, Getty Images

"माझ्यामागे ईडीची चौकशी लागल्याने अजित पवारांनी राजीनामा दिल्याचं शरद पवारांनी सांगितलं. पण तसं काहीच दिसून आलं नाही. तसं असतं तर त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन राजीनामा दिला असता. कालच्या महत्त्वाच्या क्षणी ते शरद पवारांच्या सोबत दिसले असते आणि कालचा दिवस राजीनाम्यासाठी निवडला नसता," असं देशपांडे सांगतात.

देशपांडेंनी पुढे सांगितलं, की अजित पवारांनी राजीनामा दिल्याचं कारण स्वतः सांगितल्याशिवाय काहीच स्पष्ट होणार नाही. पण दोन-तीन अंदाज लावता येऊ शकतात. सध्या विधानसभेची निवडणुकीची उमेदवारी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासंबंधी त्यांची एखादी नाराजी असू शकते. तसंच त्यांचे शरद पवार यांच्यासोबत मतभेद असू शकतात. त्यांचा मुलगा पार्थ पवार याला विधानसभेची उमेदवारी मिळण्यावरून काही मतभेद असण्याची शक्यता आहे. तसंच आपल्यावरच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी तात्पुरते राजकारणातून बाजूला राहणे असाही त्यांचा प्रयत्न दिसून येतो.

शरद पवार डॅमेज कंट्रोल करतील

"अजित पवार मुंबईत असल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवारही मुंबईकडे निघाले आहेत. त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न होईल. पण त्यातून तोडगा नाही तर कदाचित अजित पवार निवडणुकीपासून दूर राहतील अशी शक्यता आहे," असं अभय देशपांडे सांगतात.

अजित पवार

फोटो स्रोत, Getty Images

लोक पक्षाबाबत तसंच पवार कुटुंबीयांबद्दल काय विचार करतायच याचा कोणताही विचार न करता त्यांनी राजीनामा दिला आहे, असं प्रताप आसबे यांना वाटतं. ते सांगतात, "या राजीनाम्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खचलं जाण्याची शक्यता आहे. पण शरद पवार परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहेत. ते कधीच डगमगत नाहीत. शरद पवार त्यांची भूमिका योग्य प्रकारे निभावतील."

"अजित पवार पुन्हा निवडणुकीला उभे राहतील किंवा नाही याबाबत आत्ताच काही सांगू शकत नाही. निवडणुकीचं यश हे शेवटी अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचं नेतृत्व शरद पवार करत आहेत. त्यामुळे ते योग्यरित्या हे प्रकरण हाताळतील," असं प्रताप आसबे यांना वाटतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)