शरद पवार: विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला ED चौकशीचा फायदा होईल का?

शरद पवार

फोटो स्रोत, Twitter/@PawarSpeaks

    • Author, नामदेव अंजना
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"महाराष्ट्रात निवडणुका आहेत आणि नेमका हा विषय निघणं, यात लोकच काय ते समजतायत," राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी EDनं गुन्हा दाखल केल्याच्या वृत्तानंतर बुधवारी हे वक्तव्य केलं.

महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँक घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 70 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात शरद पवारांचं नाव आहे का, हे अद्याप स्पष्ट नाही, पण या प्रकरणातील चौकशीत आपण पूर्ण सहकार्य करू, असंही पवारांनी बुधवारी दुपारी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. मी स्वत: शुक्रवारी दुपारी 2 वाजता EDच्या ऑफिसला जाणार, असंही ते यावेळी म्हणाले.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या EDच्या या कारवाईविषयी शंका उपस्थित केली जात आहे.

"EDचा राजकीय उपयोग सर्रास देशभरात केला जात आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांची तोंडे बंद करण्यासाठी शस्त्र म्हणून EDचा वापर केला जात आहे," असा आरोप या प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.

मात्र "राज्य सरकार सुडानं वागतंय, कुणाला टार्गेट करतंय असं वाटणं चुकीचं आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"ही कारवाई सुडापोटी होतेय का, या खोलात मी जाऊ इच्छित नाही," असं पवार म्हणाले. "मला महाराष्ट्रात जो काही अभूतपूर्व प्रतिसाद लाभतोय, तो पाहिल्यानंतर सूडबुद्धीची शंका अनेकांना येते. माझ्याकडे त्याची माहिती नाही," असंही ते पुढे म्हणाले.

त्यामुळं EDची कारवाई खरंच सुडापोटी आहे का आणि या पावलाचा राष्ट्रवादीला काही फायदा होईल का, असे प्रश्न आता चर्चेत आले आहेत.

शरद पवार

फोटो स्रोत, Twitter/@PawarSpeaks

हे सुडाचं राजकारण आहे का?

"बँक घोटाळ्याच्या कारवाईची प्रक्रिया फेब्रुवारीपासून सुरू झालीय. पण आता निवडणुकीच्या तोंडावर गुन्हा दाखल झाल्यानं टायमिंग जुळून आलंय आणि ते राष्ट्रवादीला फायदेशीर ठरणार आहे," असं पत्रकार धर्मेंद्र जोरे सांगतात.

तर ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर सांगतात की "EDची कारवाई सुडापोटी नसेल, पण त्याचा अर्थ तसाच लावला जाईल. प्रत्येकजण या संस्थांचा उपयोग करूनच घेत असतो. काँग्रेस सत्तेत असताना मोदी-शाहांना खटल्यांना सामोरं जावं लागलं होतं, तो याचाच भाग होता. आता भाजपला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर ते या संस्थांचा वापर करत नसतील, असं म्हणता येणार नाही. पण ज्यानं काही केलंच नसेल, त्यांनी घाबरण्याचं कारण नाही."

पत्रकार शुभांगी खापरे म्हणतात, "या घोटाळ्याचा मुद्दा कोर्टासमोर होता. कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई झालीय. त्यामुळं सुडाचं राजकारण आहे, असं म्हणता येणार नाही."

शरद पवार

फोटो स्रोत, TWITTER/@PAWARSPEAKS

बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. दिल्लीच्या तख्तापुढे झुकणं आम्हाला मान्य नाही."

यावर बोलताना वरिष्ठ पत्रकार योगेश पवार म्हणतात, "इतिहासाचा आधार घेण्याची महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना सवय आहे. पण याचा काहीच फायदा होईल, असं वाटत नाही."

तर मृणालिनी नानिवडेकर म्हणतात, "महाराष्ट्रावर अन्याय केला जातोय, असं म्हणण्यात अर्थ नाही. पवारांवर केला जात असेल, पण महाराष्ट्राला मोदी सरकारनं अनेक योजना दिल्यात. त्यामुळं अन्याय होतंय, असं वाटत नाही. तसंही, राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय."

मात्र गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांनी भाजपची वाट धरली. त्यानंतर शरद पवारांनी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांना तरुणांचा चांगला प्रतिसाद लाभल्याचं पाहायला मिळाला. त्यामुळे अचानक ही कारवाई झाली, असंही म्हटलं जातंय.

याबाबत वरिष्ठ पत्रकार योगेश पवार म्हणतात, "कृषी क्षेत्रात अनेक समस्या आहेत, लोकांमध्ये असंतोष आहे. अशा स्थिती स्वत: शरद पवार प्रचारासाठी बाहेर पडल्यानं, ते हमखास या गोष्टी सार्वजनिकरीत्या उपस्थित करतील. त्यामुळं अर्थात त्यांची भीती असणारच."

मात्र यामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार की या संकटात पवार आणखी एक संधी शोधणार?

'राष्ट्रवादीला फायदा होईल, पण…'

"EDच्या कारवाईचा निवडणुकीवर नक्कीच परिणाम होऊ शकतो. राष्ट्रवादीला एक मुद्दा मिळालाय," असं वरिष्ठ पत्रकार धर्मेंद्र जोरे म्हणतात.

ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणतात, "EDने दाखल केलेल्या गुन्ह्याचा राष्ट्रवादीनं मनात आणलं तर वापर करून घेऊ शकतात, सहानुभूतीत परावर्तित करू शकतात. पण राष्ट्रवादीच्या केडरमध्ये ती ताकदच दिसून येत नाही."

"राष्ट्रवादीच्या मशिनरी अजूनही स्लो आहेत. त्या पटकन प्रतिक्रिया देत नाहीत. त्यामुळं ते किती फायदा घेतील, हाही प्रश्न आहे," असं वरिष्ठ पत्रकार योगेश पवार म्हणतात.

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, ज्येष्ठ पत्रकार शुभांगी खापरे म्हणतात, "EDच्या कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेस वापर करून घेत असेल, तर ते सहाजिक आहे. भाजप किंवा शिवसेना असती तर त्यांनीही केला असता. पण सद्यस्थिती पाहता, EDच्या कारवाईचा भावनिक वापर केला तरी लोकांवर परिणाम होईल, असं वाटत नाही."

मतांवर किती परिणाम होईल?

शुभांगी खापरे म्हणतात, "शरद पावर, ED नोटीस या पलीकडे महाराष्ट्राची निवडणूक आहे. आताच्या 20 ते 30 या वयोगटातील मतदार अधिक आहेत. ते शरद पवार किंवा पूर्वीच्या पक्षांबद्दल भावनिकरीत्या जोडलेले नाहीत. त्यामुळे EDच्या कारवाईचा निवडणुकीत एक मुद्दा असेल, पण यावरच निवडणुकीचा निकाल ठरणार नाही."

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

"पवारांनी महाराष्ट्रासाठी केलेलं काम लक्षणीय आहे. ते कुणालाही अमान्य करता येणार नाही," असं म्हणत मृणालिनी नानिवडेकर पुढे सांगतात, "EDच्या कारवाईचा मतांवर थोडाफार परिणाम होऊ शकतो, पण राष्ट्रवादी जिंकेल इतका काही परिणाम होईल, असं वाटत नाही."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)