हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर इंदापूर मतदारासंघातली 'फाइट' कशी होईल?

हर्षवर्धन पाटील

फोटो स्रोत, भाजपा महाराष्ट्र/twitter

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"मी विनाअट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापुढे पक्ष जी काही जबाबदारी माझ्यावर टाकेल, ती मी प्रामाणिकपणानं निभावेल," असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर इंदापूर मतदारसंघातली समीकरणं बदलणार आहेत, असं मत स्थानिक पत्रकार नोंदवतात.

'बदलती समीकरणं'

इंदापूरमधील राजकीय समीकरणांविषयी एका ज्येष्ठ पत्रकारानं सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जवळपास 7 जण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. यामध्ये इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे आणि पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रवीण माने यांची नावं आघाडीवर आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्या अंतर्गत पेच वाढण्याची चिन्हं आहेत.

दुसरीकडे युती असल्यानं राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसेना उमेदवारीसाठी फारशा हालचाली करणार नाहीत. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत सेनेला 2 ते 3 हजाराच्या दरम्यान मतं मिळाली होती. त्यापेक्षा भाजपला मिळालेली मतं जास्त होती. त्यामुळे यंदा इंदापूरची जागा भाजपला म्हणजेच पर्याने पाटलांना मिळण्याची जास्त शक्यता आहे, असं ते पुढं सांगतात.

पण ही जागा शिवसेनेची आहे असा दावा शिवसेना नेते करतात. इतकंच नाही तर पाटलांनी शिवसेनेत यावं असंही आवाहन पुणे जिल्हाध्यक्षांनी केलं आहे.

"इंदापूर मतदार संघ हा परंपरागत शिवसेनेचा मतदार संघ आहे. 1990 पासून शिवसेना इथून लढत आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना इथून निवडणूक लढवायची असल्यास त्यांनी शिवधनुष्य उचलून शिवेसेनेत प्रवेश करावा," असं मत शिवसेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र काळे यांनी व्यक्त केलं आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

"विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपा, शिवसेना आणि इतर मित्रपक्ष मिळून पूर्वीपेक्षाही अनेक जागा जिंकतील. त्यामध्ये आता इंदापूरच्याही जागेचा समावेश झाला आहे," असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हर्षवर्धन पाटील यांचा पक्ष प्रवेशावेळी केलं आहे.

'राष्ट्रवादी मजबूत पण...'

"इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांची एक व्होट बँक आहे, जी कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी राहते. याशिवाय, भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास त्यांना शिवसेना आणि भाजपची मतंही मिळतील. यामुळे त्यांना इथून विजयाची आशा आहे," इंदापूरचे लोकमतचे पत्रकार सतिश सांगळे सांगतात.

2014च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा जवळपास 14 हजार मतांनी पराभव केला होता.

यंदाच्या निवडणुकीविषयी सांगळे सांगतात, "इंदापूरमध्ये राष्ट्रवादी पक्षात गटबाजी आहे. पण राष्ट्रवादी एकसंध राहून लढली, तर राज्यात एक नंबरची फाईट इंदापूरमध्ये होईल."

दत्तात्रय भरणे

फोटो स्रोत, facebook@dattatrayBharne

इंदापूरमध्ये कुणाची ताकद किती?

इंदापूरमध्ये सहकारी संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे. राष्ट्रवादीकडे छत्रपती सहकारी साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, सोनाई आणि मंगलसिद्धी हे 2 खासगी दूध संघ, इंदापूर खरेदी विक्री संघ आहेत, अशी माहिती स्थानिक पत्रकारांनी दिली.

तर हर्षवर्धन पाटील यांच्याकडे 2 साखर कारखाने, पंचायत समिती आणि इंदापूर अर्बन बँक आहे.

हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार

शिवसेना 1990 पासून इथून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे, असं शिवसेनेचं मत आहे.

पवार-पाटील वाद कायम

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं सरकारच या राज्याला न्याय देऊ शकतं, असा विश्वास राज्यात व्यक्त झाला आहे. निष्ठा, प्रामाणिकपणा आणि तत्त्वानं वागायचं असेल, तर आताच्या काळात भाजपशिवाय पर्याय नाही," असं हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी सांगितलं.

हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

त्या म्हणाल्या, "भांडण झालंय दिराशी आणि नवऱ्याला सोडून चाललंय, अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. राष्ट्रवादीशी नाराजी असेल, तर ते काँग्रेस का सोडत आहेत? दीर कोही बोलला म्हणून वाईट वाटलं, तर आपण नवरा नाही सोडत."

इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचा प्रभाव कमी करून भाजपचं वर्चस्व स्थापन करण्यासाठी पाटलांची मदत होऊ शकते असं ज्येष्ठ पत्रकार संजय मिस्कीन यांना वाटतं.

"पवारांच्या विरोधातील राजकारणासाठी हर्षवर्धन पाटील यांचा वापर भाजप करून घेऊ शकतो. जिल्ह्याच्या राजकारणात भाजप त्यांना मोठ्या प्रमाणात पाठबळ देईल. कदाचित त्यांना मंत्रिपदाची संधीही दिली जाऊ शकते."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)