You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार यांच्याबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले, 'जो कर्माने मरणार त्याला धर्माने मारू नका'
मुंबई येथे शिवसैनिकांशी संवाद साधताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही चिमटा काढला. शरद पवार यांचं नाव शिखर बॅंक घोटाळा प्रकरणी आल्यामुळे त्यांचे पुतणे अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.
या सर्व घडामोडींवर ठाकरे यांनी भाष्य केलं की, "मला कुणाचं वाईट झाल्यावर आनंद होत नाही. मला पवारांच्या कौटुंबिक भांडणात रस नाही. बाळासाहेब म्हणायचे जो आपल्या कर्माने मरणार आहे, त्याला धर्माने मारू नका. गेल्या 50 वर्षांत जे जे आपल्याशी जसेजसे वागले, तीच परिस्थिती त्यांच्यावर ओढावली."
काल झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सांगितलं होतं की अजित पवारांनी आपल्या मुलांना शेती आणि व्यवसाय करण्याचा सल्ला दिला आहे. त्याबद्दलही उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं "मी राजकारण सोडणार नाही, शेती करणार नाही तर शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन."
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर 10 वर्षं जुनं प्रकरण काढून गुन्हा दाखल करण्यात आला होता, याची आठवण उद्धव यांनी शिवसैनिकांना करून दिली.
हा महाराष्ट्र कधीही सुडाचं राजकारण सहन करणार नाही. आम्ही कोणाशी सुडानं वागणार नाही, असंही उद्धव यांनी म्हटलं.
शिवसेनाप्रमुखांना मी वचन दिलं आहे, की एकेदिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल. मी हे वचन पूर्ण करेनच, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
रंगशारदामध्ये जिल्हाप्रमुख, शिवसेनेचे कार्यकर्ते तसंच इच्छुक उमेदवार उपस्थित होते. त्यांच्याशी संवाद साधताना उद्धव यांनी युतीबद्दलही भाष्य केलं.
मी 288 मतदारसंघातील इच्छुकांना बोलावलं आहे. याचा अर्थ युती तुटणार असा नाही, असं उद्धव यांनी स्पष्ट केलं. त्यांनी पुढं म्हटलं, की युतीबाबतची घोषणा एक दोन दिवसांत होईल. युती झाल्यानंतर आपली ताकद भाजपच्या मदतीला आली पाहिजे. भाजपशी मनापासून दोस्ती केली आहे. जिथं भाजप असेल तिथं मदत करू.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)