विधानसभा 2019: 'युती होणार', मग शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या मतदारसंघात मुलाखती का घेतायत?

    • Author, तुषार कुलकर्णी आणि हर्षल आकुडे
    • Role, बीबीसी मराठी

"युतीची जेवढी चिंता तुम्हाला आहे तितकीच मला पण आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत सांगितलं.

"युतीचं जागावाटप, राणे साहेबांचा प्रवेश, या सर्व गोष्टींबाबतचा निर्णय योग्यवेळी घेण्यात येईल. थोडी वाट पाहा," असंही ते पुढे म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील म्हटलं आहे की आमच्यात काही 'खळखळ' नाही.

दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते युतीमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं सांगत आहेत खरे, पण त्याच वेळी राज्यभरात दोन्ही पक्षांतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत.

निवडणुका आल्यावर उमेदवारांच्या मुलाखती घेणं हे नैसर्गिक आहे, पण मित्रपक्षांच्या पारंपरिक मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखतीही सुरू असल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

युती होणार आहे तर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती कशासाठी, असा प्रश्न साहजिकच अनेकांच्या मनात येत आहे.

भाजपने गेल्या निवडणुकीत 122 जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी काही मतदारसंघ शिवसेनेकडे होते. त्यावेळी युती नव्हती, पण आता युती झाल्यावर ते मतदारसंघ पुन्हा भाजप शिवसेनेकडे सोपवेल का, हाही एक प्रश्न आहे.

तसंच काही जण स्वतंत्ररीत्या निवडून आले होते. ते देखील आता भाजपमध्ये गेले आहेत.

मुलाखतीनंतर काय?

गेल्या काही दिवसांत भाजपमध्ये विविध पक्षांमधून जे नेते आले आहेत, ते देखील भाजपच्या तिकिटावर लढण्यास इच्छुक आहेत.

परभणी जिल्ह्यातल्या पाथरी मतदारसंघातून आमदार मोहन फड निवडून आले होते. ते आपल्या समर्थकांसह नंतर भाजपमध्ये गेले.

परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, जिंतूर-सेलू आणि पाथरी या मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी सावली विश्रामगृहात मुलाखती घेतल्या. परभणीसाठी आनंद भरोसे, जिंतूर-सेलू मतदारंसघासाठी मेघना बोर्डीकर, समीर दुधगावकर, पाथरी मतदारसंघासाठी विद्यमान आमदार मोहन फड तर गंगाखेडसाठी अभय चाटे यांनी मुलाखती दिल्या.

मात्र या मुलाखती संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एका वाक्यात म्हणाले - 'महायुती होणार आहे'.

2009 ला शिवसेना-भाजप युती झाली त्यावेळी परभणी मतदारसंघ शिवसेनेकडे होता. 2014 मध्ये युती झाली नव्हती, त्यावेळी तिथून शिवसेनेचे डॉ. राहुल पाटील निवडून आले होते. त्यावेळी भाजपच्या आनंद भरोसे यांना 40 हजारांच्यावर मतं मिळाली होती.

2014 ला युती न झाल्यामुळे परभणीसारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातही भाजपची ताकद वाढली आहे. पाच वर्षांच्या तुलनेत भाजपची जिल्ह्यातली ताकद कैकपटीने वाढल्याचा दावा भाजप जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे करतात.

"परभणी शहरात भाजपचे 8 नगरसेवक आहेत. जिल्हा परिषदांमध्येही 5 सदस्य आहेत, पंचायत समितीमध्ये चार सदस्य आहेत, सोनपेठ नगरपालिका, सेलू नगरपालिका, मानवत नगरपालिका, या ठिकाणी भाजपचाच नगराध्यक्ष आहे. त्यामुळे आता परभणी मतदारसंघ भाजपकडे यावा असं कार्यकर्त्यांना वाटतं," असं भरोसे सांगतात.

हा मतदारसंघ आम्हाला मिळाला तर महायुतीचाच फायदा होईल, असंही ते सांगतात.

युती झाली तर काय?

युती झाली तर या जागेवर तुम्ही दावा करणार का, असं विचारलं असता भरोसे सांगतात की "याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेतील. पण ही जागा आमच्या वाट्याला यावी, ही भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे."

जिंतूर-सेलू मतदारसंघासाठी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि त्यांची कन्या मेघना बोर्डीकर-साकोरे यांनीही मुलाखत दिली. तसेच समीर दुधगावकर यांनी देखील मुलाखत दिली.

"गेल्या कित्येक वर्षांत राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे जिल्ह्याची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. हे चित्र बदलण्यासाठी आपण राजकारणात येत आहोत. प्रगतीच्या दृष्टीने परभणी जिल्ह्याचा क्रमांक 36 जिल्ह्यांपैकी 34वा आहे. ही स्थिती बदलणं आवश्यक आहे," असं दुधगावकर सांगतात.

भाजपच्या मुलाखती झाल्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना काय वाटतं, हे जाणून घेण्यासाठी परभणीचे शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्याशी बीबीसीनं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. ती आल्यास, ही बातमी पुढे अपडेट केली जाईल.

'महाजनादेश यात्रेचा दुहेरी फायदा'

परभणीतून प्रकाशित होणाऱ्या 'दै. समर्थ दिलासा'चे संपादक संतोष धारासुरकर सांगतात की "भाजपने महाजनादेश यात्रेच्या वेळी जिथं-जिथं भेटी दिल्या, तिथं त्यांनी सभेमध्ये मोठ्या स्थानिक नेत्यांचं नाव स्पष्ट घेऊन लोकांना हे सूचित केलं की पुढचा उमेदवार हाच असू शकतो.

"पाथरीमध्ये ते गेले, तिथे त्यांनी 'मोहन फड यांना तुम्ही कौल देणार का?' असा सवाल जनतेला केला. जनतेने त्यावर 'हो' म्हटलं," असं धारासुरकर सांगतात.

"फक्त परभणीच नाही तर नांदेड आणि इतर जिल्ह्यातही भाजपने मुलाखती घेतल्या आहेत. महाजनादेश यात्रेचा फायदा त्यांना दुहेरी झाला, एक तर लोकांशी संपर्कही झाला. त्याचबरोबर तिथल्या स्थानिक नेतृत्वाचं त्या भागात किती वजन आहे, याचा अंदाज त्यांना घेता आला," असं धारासुरकर सांगतात.

"भाजपचं तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची मतदारसंघागणिक संख्या डझनाच्या वर आहे. अर्थात हे सर्व तुल्यबळ आहेत, असं नाही. पण काही जण आपलं नशीब आजमावून पाहायलाही आलेले असतात," ते सांगतात.

"आणि फक्त भाजपच मुलाखती घेत आहे, असं नाही तर शिवसेनादेखील मुलाखती घेत आहेत. शिवसेनेच्या इच्छुकांनी मुंबईत जाऊन मुलाखती दिल्या आहेत. परभणी, पाथरी या ठिकाणाहून प्रत्येकी सात आठ उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहे," धारासुरकर सांगतात.

'मुलाखती हा प्लॅन-बी'

"मुलाखती घेणं हा त्या-त्या भागात आपली किती ताकद आहे, हे समजून घेण्याचा एक मार्ग असतो. तसंच याद्वारे मित्रपक्षांना हे सूचित केलं जातं की आमच्याकडेही उमेदवार आहेत. जेव्हा मित्रपक्षांसोबत जागावाटपाबाबत चर्चा होते, त्यावेळी आपली किती ताकद आहे हे सांगण्यासाठी मुलाखतीमधून मिळालेल्या माहितीचा वापर होतो. त्यामुळेही मुलाखती घेतल्या जातात. पण ऐनवेळी काही अनपेक्षित घडलं तर प्लान-बी म्हणूनही पक्ष तयार असतात," असं धारासुरकर सांगतात.

सोलापूर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात शिवसेना नेते हे मुलाखतीसाठी 'मातोश्री'वर जात आहेत.

सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघातून किमान तीन-चार जण हे इच्छुक म्हणून मुलाखतीसाठी गेल्याचं ज्येष्ठ पत्रकार एजाज हुसैन मुजावर सांगतात.

"युती होणार असं दोन्ही पक्षांचे नेते म्हणत असले तरी मागच्या निवडणुकांमध्ये लागू असलेलं सूत्रच यावेळी वापरलं जाईल, अशी शक्यता नाही. त्यामुळे युती तुटल्यास स्वतंत्रपणे लढण्याची तयारी असावी, यासाठी दोन्ही पक्ष मुलाखती घेत आहेत," असं ते सांगतात.

मुजावर पुढे सांगतात, "2014 पूर्वीच्या निवडणुकांमध्ये भाजप-सेना ठरलेल्या सूत्रानुसारच जागावाटप करायचे आणि निवडणुकांना सामोरे जायचे. पण 2014 साली ऐन विधानसभा निवडणुकांच्या वेळी युती तुटल्यामुळे शिवसेनेची तारांबळ झाली होती. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षालाही अनेक ठिकाणी तुल्यबळ उमेदवार मिळाले नव्हते. त्यामुळे या निवडणुकीसाठी इतर पर्याय खुले ठेवून भाजप आणि सेना हे दोन्हीही पक्ष प्रत्येक मतदारसंघासाठी स्वतंत्रपणे मुलाखती घेत आहेत,"

"भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग झालं आहे. विशेष म्हणजे युतीची शक्यता डोळ्यांसमोर ठेवूनच नेत्यांनी युतीतील जागावाटपाच्या सूत्रानुसार त्या त्या पक्षात प्रवेश घेतला आहे. पण स्वबळावर लढण्याची तयारीसुद्धा दोन्ही पक्षांनी करून ठेवली आहे," असं मुजावर सांगतात. 

'शिवसेना आमच्यासाठी नक्की जागा सोडेल'

"जितकी काळजी आम्हाला नाही, त्यापेक्षा तुम्हाला युतीची काळजी लागली आहे," असं विधान भाजप खासदार गिरीश बापट यांनी केलं होतं. "आमचा विस्तार शिवसेना समजून घेईल आणि ते आमच्यासाठी त्याप्रमाणे नक्की जागा सोडतील," असं बापट गेल्या आठवड्यात पुण्यात बीबीसी मराठीच्या कार्यक्रमात म्हणाले होते.

एकीकडे, युतीच्या जागावाटपाचा 50-50 हाच फॉर्म्युला लोकसभेवेळीच ठरलाय, असं शिवसेना वारंवार म्हणत आहे. तर दुसरीकडे, गिरीश बापट यांच्या वक्तव्यावरून असं वाटतंय की भाजपला हा फॉर्म्युला मान्य नाहीत आणि लोकसभेच्या यशानंतर त्यांना जास्त हव्या आहेत.

विधासभेच्या 288 जागांपैकी शिवसेनेला तुम्ही 144 जागा देणार का, असं विचारल्यावर बापट म्हणाले, "आमचं उद्दिष्ट सरकारमध्ये बहुमत आणण्याचं आहे. भाजप आणि सेनेला मिळून ते करायचं आहे. पण सगळ्यांचे प्रश्न वेगळे आहेत. काही ठिकाणी भाजप मजबूत आहे तर काही ठिकाणी सेना मजबूत आहे. त्याचा आढावा घेऊन जागा ठरवू."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)