You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युतीचा निर्णय योग्यवेळी, थोडी वाट पाहा - देवेंद्र फडणवीस
"युतीची चिंता मलाही आहे. योग्य वेळी युती करू. सगळे फॉर्म्युले सादर करू. राणे साहेबांच्या बाबतीत योग्य निर्णय घेऊ, थोडी वाट पाहा," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
तसंच देशहितामध्ये बोलणारी व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसला दुष्मन वाटते, अशी टीका सुद्धा यावेळी त्यांनी केली आहे.
"आरेमधल्या वृक्षतोडीबद्दल लोकांचा विरोध समजून घेतला पाहिजे. परंतु या विरोधाच्या आडून काही लोकं त्यांचा मनसुबा साधायचा प्रयत्न करत नाहीत ना, हे तपासणं गरजेचं आहे," असं आरेबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलंय.
"आरेसंदर्भात आलेल्या एकूण विरोधांमधली 10,000 ऑब्जेक्शन्स बंगळुरूच्या एकाच आयपी अॅड्रेसवरून आले आहेत. शिवाय काही लोक आरेसाठी पर्यायी जमिनींचे जे पर्याय सुचवत आहेत, त्याचाही विचार करायला हवा, कारण या जमिनी तब्बल 5 हजार कोटी रुपये देऊन विकत घ्याव्या लागणार आहेत. या खर्चाचा थेट परिणाम तिकिटावर होईल आणि पर्यायाने तो मुंबईकरांवर बोजा पडेल, यामुळे लोकांचे मनसुबे तपासणं अतिशय गरजेचं आहेस"असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे.
निवडणुकांमध्ये राष्ट्रवाद हा अजेंडा का असू नये, असा उलट सवाल मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केला. निवडणुकांमध्ये राष्ट्रवाद हाच मुद्दा का घेतला जातो, या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते.
काश्मीर प्रश्न आपल्या संपूर्ण देशाचा प्रश्न आहे. तो आपल्या सरकारने सोडवला आहे. त्याचा आपल्याला अभिमान असायला हवा. कुठल्या देशात राष्ट्रवाद या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जात नाहीत. मग आपण केलेल्या कामगिरीवर का बोलू नये, असे सवालही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी उपस्थित केले.
कॉर्पोरेट टॅक्स आणि इतर गुंतवणुकीबाबत अधिक माहिती देण्यासाठी फडणवीस यांनी मुंबईत ही परिषद घेतली
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)