You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भाजपला बहुमत मिळालं तर स्वतंत्र विदर्भाचा मार्ग वेगाने पुढे जाईल - मुनगंटीवार
भारतीय जनता पार्टीला येत्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं तर स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव मांडू शकतो, असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. बीबीसी मराठीच्या 'राष्ट्र महाराष्ट्र' या नागपूरमधल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
"आम्ही स्वतंत्र विदर्भाच्या विषयावर ठाम आहोत, पण आमच्याकडे स्पष्ट बहुमत नाही आणि शिवसेनेचं या विषयावर वेगळं मत आहे," असं ते म्हणाले.
"स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आमचा भुवनेश्वर ठराव आहे. विधानसभेत ज्या क्षणी बहुमताची स्पष्टता येईल त्या क्षणी त्या ठरावावर अंमलबजावणी होईल." जर युतीत लढूनही भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं तर काय कराल, असं विचारल्यावर ते म्हणाले, "…तर कदाचित हा (स्वतंत्र विदर्भाचा) मार्ग वेगाने पुढे जाईल."
काँग्रेस-राष्ट्रवादी तर केवळ भाजपची अडचण व्हावी म्हणून हा मुद्दा काढतात, असंही ते म्हणाले.
या कार्यक्रमात स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा निवडणुकीत विसरला गेलाय का? या विषयावर विदर्भातील नेत्यांची चर्चा झाली. या चर्चासत्रात आशिष देशमुख (काँग्रेस), शिवानी दाणी (भाजप), क्रांती धोटे-राऊत (राष्ट्रवादी) हे नेते सहभागी झाले होते.
भाजपाने स्वतंत्र विदर्भ देऊ म्हणून मतं घेतली आणि आता गेल्या पाच वर्षांत जनतेच्या तोंडाला अक्षरशः पानं पुसली. हा मुद्दाच भाजप विसरून गेली आहे, असं मत आशिष देशमुख यांनी मांडलं. आता तर स्वतंत्र विदर्भाबद्दल अवाक्षरही काढले जात नाही असं क्रांती धोटे-राऊत म्हणाल्या.
परंतु, शिवानी दाणी यांनी हा मुद्दा फेटाळला. भाजपही छोट्या छोट्या राज्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवतं. आम्ही स्वतंत्र विदर्भासाठी ताकदीनं आंदोलनं केली आहेत. पण आम्ही त्याला चिकटून राहिलेलो नाहीत. आम्ही कामांच्या मागे लागलो आहोत. आणि योग्य वेळ आल्यावर स्वतंत्र विदर्भ नक्की होईल, अशी सरकारची बाजू त्यांनी मांडली.
त्यांनी उच्चारलेल्या `योग्य वेळ' या शब्दप्रयोगावर प्रेक्षकांमध्ये खसखस पिकली.
भाजपाला स्वतंत्र विदर्भ करण्यापासून कुणीही रोखू शकत नाहीत. पण ते का करत नाहीत हे जाणून घ्यायला नक्की आवडेल, असंही आशिष देशमुख म्हणाले.
या चर्चेत, क्रांती धोटे-राऊत यांनी भाजपा महाराष्ट्रातल्या मुद्द्यांवर राजकारण करण्यापेक्षा 370 वर अडकलं असल्याचं म्हटलं आहे. काश्मीर प्रश्न सोडवणं हे उत्तम काम आहेच. परंतु शेतकरी, बेरोजगारी यासारख्या प्रश्नाकडे भाजप पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. 370 सोडवल्यामुळे आमच्या तरूणांना रोजगार मिळणार का असा सवालही यावेळी उपस्थित केला आहे.
शिवानी दाणी यांनी मात्र भाजपा सरकारनं उत्तम रस्तेबांधणी, कारखान्यांसाठी उभारणी, जलशिवारसारख्या अनेक योजना राबवत असल्याचं सांगितलं आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांचा विचार कुणी केला नव्हता. 50 वर्षांत जे केलं नाही ते करायला आम्ही किमान सुरुवात तर केली आहे. ते एकदम बदलणं शक्य नाही पण सुरुवात झाली आहे, असं ठाम वक्तव्य केलं.
आशिष यांनी कारखान्यांच्या प्रवेशाच्या वक्तव्याला विरोध दर्शवला. मी स्वतः भाजपचा त्रस्त आमदार होतो आणि कार्यकाळ अर्धा सोडून बाहेर पडलोय. तेव्हा यांच्या रोजगारी सोडवण्याच्या प्रश्नालाही विदर्भातल्या तरूणांनो तुम्ही भुलू नका असं आवाहन आशिष देशमुख यांनी केलं आहे. भाजप फक्त खोट्या भूलथापा देते. भाजप म्हणतं आम्ही रोजगार देऊ मेगाभरती करू. मेगाभरती नोकऱ्यांमध्ये नाही तर फक्त पक्षातच होते आहे, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.
क्रांती धोटे-राऊत यांनीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नाकडे पूर्ण दुर्लक्ष करणारी भाजपा शिवसेना बरोबर असेपर्यंत स्वतंत्र विदर्भ कधीही करणार नाही असं मत नोंदवलं. शिवानी दाणी यांनी मात्र विकासकामांना सुरुवात झाली असून, तरूणांना थोडा आणखी वेळ देण्याचं आवाहन केलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)