You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रियंका गांधी महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रचारासाठी येणार - सत्यजित तांबे
विधानसभेसाठी काँग्रेस आणि शिवसेनेची रणनीती काय असेल, यासह वेगवेगळ्या मुद्दयांवर काँग्रेस नेते सत्यजित तांबे आणि शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी बीबीसी मराठीशीच्या राष्ट्र-महाराष्ट्र कार्यक्रमात मोकळेपणानं चर्चा केली. एकमेकांना कोपरखळ्या मारताना त्यांनी प्रेक्षकांच्या प्रश्नांनाही उत्तरं दिली.
सर्व पक्षांच्या यात्रा निघाल्या पण काँग्रेसची यात्रा का निघाली नाही असं विचारलं असता काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी म्हटलं, की नुसत्या यात्रा काढून निवडणुकीत जिंकता येत असत्या तर राजस्थानमध्ये वसुंधरा राजे आणि मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांनी निवडणूक जिंकली असती. पण ते निवडणूक जिंकले नाहीत. लोकांपर्यंत पोहोचण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात त्यानुसार आम्ही कार्य करतो. येत्या काळात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे प्रचाराला येऊ शकतात. आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची तुलना एका अँकरनं केल्याबद्दल काय वाटतं असं विचारलं असता सत्यजित तांबे म्हणाले, की पत्रकारांनी आपलं मत व्यक्त करताना कसं नसावं याचं हे उत्तम उदाहरण आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवेंनी म्हटलं, "राहुल गांधी यांनी गेल्या काही वर्षांत प्रचंड मेहनत घेतली आहे. विजयी होणं न होणं या गोष्टी राजकारणात होतच असतात. काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांचं एक वेगळं स्थान आहे आदित्य ठाकरे यांचंही पक्षात एक वेगळं स्थान आहे. आदित्य ठाकरेंनी जनआशीर्वाद यात्रा काढली त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला.
'धर्माच्या नावावर राजकारण न करता विकासाचं राजकारण करावं'
"काळ बदलला आहे त्यामुळे त्यानुसार आता धर्माच्या नावावर राजकारण न करता विकासाचं राजकारण करावं," असं दानवे यांनी सांगितलं.
"आम्ही मुसलमानांना उमेदवारी देत नाही असा समज पसरवला जातो, पण आम्ही ती देऊ शकतो आमच्याकडे बरेच मुस्लीम कार्यकर्ते आहेत. आता तरुणांच्या नेत्यांकडून खूप अपेक्षा आहेत तेव्हा आपण केवळ हिंदू-मुस्लीम हे राजकारण करणं योग्य नाही," असं दानवे यांनी म्हटलं.
लोकसभेला औरंगाबादमध्ये हारल्याचं आम्हाला दुःख आहेच. एमआयएमनं जातीचं जे राजकारण केलं, हर्षवर्धन जाधव यांनी बंडखोरी केली. ते नसते तर सेना दोन-अडीच लाखांनी जिंकली असती. नुकसान झालं हे मान्य आहे. जनतेमध्ये नाराजी होती जरूर. पण माझ्या विजयानंतर ती भरून काढू असं वाटतं, असं दानवे यावेळी म्हणाले.
शिवसेनेनं पीकविम्याचा मोर्चा चुकीच्या कार्यालयावर नेला - तांबे
शिवसेनेनं मुंबईच्या बीकेसीच्या कार्यालयावर मोर्चा नेला पण रब्बी पिकांसाठी असलेला मोर्चा त्यांनी खरीप पिकांसाठी असलेल्या कंपनीवर नेला, असा चिमटा सत्यजित तांबे यांनी काढला. पण शिवसेनेचं मी अभिनंदन करतो, की ही योजना फेल झाली हे सांगण्यासाठी ते सत्ताधारी असूनही समोर आले. याला प्रत्युत्तर देताना दानवे म्हणाले, की हा प्रतीकात्मक मोर्चा होता. त्यामुळे तो मोर्चा रब्बीच्या ऑफिसवर गेला की खरीपच्या ऑफिसवर गेला याला महत्त्व नाही. त्यामागची भावना महत्त्वाची आहे. शिवसैनिकांनी पीकविम्याचा प्रश्न लावून धरला आहे. आम्ही सत्तेत असून सुद्धा आम्ही प्रश्न मांडले, पण काँग्रेस विरोधक असूनही हे प्रश्न विचारत नाहीयेत.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या तरुणांपैकी एकाने प्रश्न विचारला की जनतेनी पक्षासोबत जावं की नेत्यांसोबत जावं. पक्षासोबत जावं म्हणावं तर पक्षात दुसऱ्याही पक्षातले लोक येत आहेत आणि नेत्यांसोबत जावं म्हणावं तर नेते सतत पक्ष बदलत आहेत. त्यावर उत्तर देताना सत्यजीत तांबे म्हणाले की, आपण हा विचार केला पाहिजे की आपली विचारधारा काय आहे? अमेरिकेला आपण जगातली सर्वांत प्रगल्भ लोकशाही मानतो त्याचं काय कारण आहे. कारण तिथं दोनच प्रमुख पक्ष आहेत. इतरही २०-२५ पक्ष आहेत पण मुख्य पक्ष दोनच आहेत. डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन. हे पक्षच नाहीत तर विचारधारा आहेत. जनतेनेच ही निवड करावी की आपली विचारधारा काय आहे आणि त्यासोबतच आपण राहावं. जर तसं झालं तर इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांची संख्या आपोआप कमी होईल आणि आपलीही लोकशाही तशीच प्रगल्भ होईल.
मतदार जोपर्यंत विचाराला अनुसरून मतदान करणार नाहीत तोपर्यंत हे इकडून तिकडे उड्या मारणारे लोक मतदारांना घाबरणार नाहीत असं तांबे म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)