ई-सिगारेटवर बंदी: ई-सिगारेटचे धोके काय? भारतात ई-सिगारेट कोण वापरतं?

केंद्र सरकारने ई-सिगारेटचं उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात घोषणा केली.

ध्रूमपानाची समस्या सोडवण्यात ई-सिगारेट अयशस्वी ठरली असून, शाळकरी मुलांमध्ये याचं फॅड वाढलं आहे, असं त्यांनी सांगितलं. म्हणूनच ई-सिगारेटचं उत्पादन, आयात-निर्यात, वाहतूक, विक्री, साठवणूक आणि जाहिरात यासगळ्यावर बंदी घालण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

"तरुणांना ई-सिगारेट कुल वाटते. त्याचं कीट आकर्षक आहे. हे युवा वर्गाला आकर्षित करतं. ई-सिगारेटच्या वापराने अमेरिका तसंच अन्य काही देशात मृत्यूही ओढवले आहेत. ई-सिगारेटमध्ये निकोटीन असतं. त्याचा गंभीर परिणाम होतो. हे व्यसन टाळणं कठीण आहे," असं सीतारामन यांनी सांगितलं.

ई-सिगारेटपेक्षा सिगारेट घातक आहे. त्यावर बंदी का घातली जात नाही, असा प्रश्न केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना विचारण्यात आला. ते म्हणाले, "तंबाखूच्या सिगारेटवर बंदीविषयी हर्षवर्धन यांच्याशी चर्चा करूच. पण आज मंत्रिमंडळाने काही हिताचा निर्णय घेतला आहे. त्याला तुम्ही पाठिंबा द्यायला हवा."

ते पुढे म्हणाले, "ई-सिगारेटचं अद्याप व्यसन लागलं नसून, सरकारने त्याआधीच त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ई-हुक्क्यावरही सरकारने बंदी घातली आहे. पहिल्यांदा गुन्हा केल्यास आरोपीला एका वर्षाची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. दुसऱ्यांदा आरोपीला पकडलं तर पाच लाखांपर्यंत दंड किंवा तीन वर्ष तुरुंगावास किंवा दोन्ही होऊ शकतं. भारतातल्या अग्रगण्य डॉक्टर्सनी याची शिफारस केली आहे."

"परिणामांचा विचार करण्यापेक्षा आरोग्याची काळजी घेणं कधीही चांगलं आहे. कमी धोकादायक की जास्त धोकादायक यावर चर्चा करण्यापेक्षा देशाने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करायला हवं," असं सचिव प्रीती सूजन यांनी सांगितलं.

काय असते ई-सिगारेट?

  • ई-सिगारेटमध्ये तंबाखूचा वापर केला जात नाही. त्यातून राख तयार होत नाही आणि दातांवर डाग पडत नाहीत.
  • ई-सिगारेटच्या टोकाला LED लाईट असतो. सिगारेट ओढताना खऱ्या सिगारेटप्रमाणे प्रकाशमान होतं.
  • ई-सिगारेटमध्ये बॅटऱ्यांचा समावेश असतो.
  • खऱ्या सिगारेटसारखा धूर येत असल्याने सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी प्रयत्नशील लोकांना ई-सिगारेटचा पर्याय दिला जातो.
  • कॅनडा आणि इंग्लंडने ई-सिगारेटवर बंदी घातली आहे.

ई-सिगारेट्सची लोकप्रियता

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, ध्रूमपान करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. ई-सिगारेट्स पाठवणाऱ्यांची संख्या 2011मध्ये 70 लाख होती. 2018 मध्ये हे प्रमाण वाढून 4.1 कोटी झालं आहे. 2012 पर्यंत ही संख्या साडेपाच कोटी होईल, अशी चिन्हं आहेत.

ई-सिगारेट्स वापरणाऱ्यांची संख्या वाढती असल्याने ई-सिगारेट्स उद्योग वाढीस लागला आहे. पाच वर्षात ई-सिगारेट्स उद्योगाचा पसारा 6.9 अब्ज डॉलर्सवरून 19.3 अब्ज डॉलर्स एवढा वाढला आहे. अमेरिका, युके आणि फ्रान्स या देशांत ई-सिगारेट्स ओढणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

जगभरात तंबाखू सेवनावरील Global Adult Tobacco Survey या सर्वेक्षणानुसार 2016-17 मध्ये फक्त 0.02 टक्के भारतीय इ-सिगारेट्स वापरायचे. भारतात 150 ते 2000 रुपयांपर्यंतच्या ई-सिगारेट्स उपलब्ध आहेत, असं इकॉनॉमिक टाइम्सने एका बातमीत म्हटलं आहे.

2017मध्ये भारतात साधारण 1.56 कोटी डॉलर्स एवढा मोठा हा उद्योग होता आणि 2022 पर्यंत हा पसारा वर्षाला 60 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज युरोमॉनिटर इंटरनॅशनल या बाजारपेठांचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने व्यक्त केला आहे.

ई-सिगारेट्स सुरक्षित आहे का?

अमेरिकेत मिशीगन राज्याने फ्लेवर्ड ई-सिगारेट्सवर बंदी घातली आहे. डॉक्टर, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील जाणकार तसंच कॅन्सरसंदर्भात काम करणाऱ्या चॅरिटी संस्था यांच्या मते सिगारेट्सच्या तुलनेत ई-सिगारेट्स कमी धोकादायक असतात.

ई-सिगारेट्स आजाराची लक्षणं काय?

तरुणांमध्ये ई-सिगारेट वापरण्याचं प्रमाण लक्षणीय आहे. ई-सिगारेट्स वापरणाऱ्यांना तीव्र न्युमोनिया, श्वास घेण्यात त्रास, कफ, ताप, थकवा अशी लक्षणं जाणवतात.

जागतिक आरोग्य संघटनेचं काय म्हणणं?

ई-सिगारेट्स वापरण्याचे दूरगामी परिणाम पूर्णत: माहिती नाहीत. मात्र ई-सिगारेट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या निकोटीनचं व्यसन लागू शकतं.

ई-सिगारेट्समधील गोडसर फ्लेवर्समुळे वातावरण प्रदूषित होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)