दारू धोकादायकच : नवं संशोधन सांगतं 'लिटिल लिटिल' घेतली तरी होतील हे परिणाम

    • Author, लॉरेल आयविस
    • Role, बीबीसी हेल्थ

जर तुम्ही पार्टीला गेलात आणि दारुला नाही म्हणालात तर कुणीतरी एखादी व्यक्ती तिथं असते जी चटकन म्हणते "अरे, एका ड्रिंकनं काही होणार नाही. नाहीतर वाईन घे. वाईन हृदयासाठी चांगली असते. घे थोडी."

किंवा सर्दी झाली की ब्रॅंडी किंवा रम घे असा सल्ला देणारेही असतात. 'संतुलित प्रमाणात मद्यपान करणं हे चांगलं असतं,' असं बऱ्याचदा म्हटलं जातं. पण त्यात किती प्रमाणात तथ्य आहे याचा आपण विचार केला आहे का?

'दिवसातून एखादा ग्लास वाइन पिणं हे आरोग्यासाठी लाभदायी आहे,' असं तुम्हाला वाटतं का? जर तसं वाटत असेल तर तुमच्यासाठी ही वाईट बातमी आहे.

लॅन्सेटनं प्रसिद्ध केलेल्या नवीन संशोधनात असं म्हटलं आहे की कोणत्याही परिस्थितीत मद्यपान करणं हे आरोग्यासाठी घातकच आहे. याआधी झालेल्या संशोधनात देखील मद्यपान हे आरोग्यास घातक असल्याचं म्हटलं आहे तो अभ्यास योग्यच असल्याचं लॅन्सेटनं म्हटलं आहे.

"जर संतुलित प्रमाणात मद्यपान केलं तर हृदयरोगापासून संरक्षण मिळू शकतं पण कॅन्सर आणि इतर रोगांच्या धोक्याचं प्रमाण संरक्षणाहून जास्त आहेत," असं त्यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात, रोगापेक्षा इलाज भयंकर ठरण्याचा इशारा लॅन्सेटनं दिला आहे.

संतुलित मद्यपान करणं आरोग्यास कसं अपायकारक आहे?

आतापर्यंत या विषयावर झालेल्या संशोधनांपैकी हे संशोधन सर्वांत महत्त्वपूर्ण असल्याचा दावा या प्रकल्पातील संशोधकांनी केला आहे. हे संशोधन करताना अनेक घटकांचा अभ्यास करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

या अभ्यासाची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. 1990 ते 2016 या काळात जगातील तब्बल 195 देशातल्या नागरिकांचा विचार या अभ्यासादरम्यान केला आहे. मद्यपानामुळं लोकांवर काय परिणाम होतात याचे निष्कर्ष आपल्याला 'द ग्लोबल बर्डन ऑफ डिसिज स्टडी'मध्ये वाचायला मिळतील.

अभ्यासासाठी 15 ते 95 वर्षं वयोगटातील व्यक्तींचा विचार करण्यात आला. या गटातील मद्यपान करणाऱ्या व्यक्तींची (दिवसाला एक ड्रिंक घेणारे) बिल्कुल मद्यपान न करणाऱ्या व्यक्तींबरोबर तुलना करण्यात आली.

मद्यपान न करणाऱ्या एक लाख लोकांपाठीमागे 914 जणांना कॅन्सर किंवा इतर रोगांचा धोका असतो. पण दिवसाला एक ड्रिंक घेणाऱ्यांमध्ये हेच प्रमाण 4 नं वाढतं.

दिवसाला दोन ड्रिंक करणाऱ्या लोकांमध्ये वर्षभरात हेच प्रमाण 63नं वाढतं. दिवसाला पाच ड्रिंक करणाऱ्यांमध्ये हे प्रमाण 338नं वाढतं.

सोनिया सक्सेना या इंपेरियल कॉलेज लंडनमध्ये प्राध्यापक आहेत आणि त्या जनरल प्रॅक्टिशनर देखील आहेत.

संशोधकांच्या टीममधल्या सक्सेना सांगतात, "एका ड्रिंकमुळं देखील आरोग्याला अल्प प्रमाणात का होईना धोका संभवतो हेच या अभ्यासातून दिसतं. अभ्यासात असलेला आकडा हा प्रतिनिधिक स्वरूपाचा आहे. जर आपण युनायटेड किंगडमच्या पूर्ण लोकसंख्येचा विचार केला तर हाच आकडा खूप मोठा दिसू शकतो. तसंच, लोक फक्त एकच ड्रिंकवर थांबत नाहीत."

या संशोधनांचे मुख्य लेखक डॉ. मॅक्स ग्रिसवल्ड हे युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन इथं इंस्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅंड एव्हॅल्युएशनमध्ये संशोधक आहेत.

"मागील काही संशोधनात असं आढळलं होतं की मद्यामुळं आरोग्याला काही प्रमाणात फायदा होतो. पण आमचं संशोधन असं सांगतं की, मद्यपानामुळं एकूणच होणाऱ्या अपायांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कितीही अल्प प्रमाणात मद्यपान केलं तरी धोका टळत नाही."

कॅन्सरचा धोका, जखमी होणं, संसर्गजन्य रोग या गोष्टींचं मद्यपानाबरोबर असलेलं दृढ नातं या संशोधनात अधोरेखित करण्यात आलं आहे.

"दिवसाला एक ड्रिंक घेतल्यानं हे प्रमाण जरी कमी आहे असं दिसत असलं, तरी जसं ड्रिंकच प्रमाण वाढतं तसं आरोग्याला अपाय होणं देखील वाढतं," असं अभ्यास सांगतो.

आठवड्याला किती मद्यपान करावं याची पातळी युनायटेड किंगडम सरकारनं घोषित केली आहे. याला मद्यपानाची सुरक्षित पातळी म्हणतात. 2016मध्ये सरकारनं सुरक्षित पातळी कमी करून मद्यपानाचं प्रमाण हे आठवड्याला 14 युनिटवर आणलं.

14 युनिट म्हणजे साधरणतः बीअरचे सहा पाइंट्स किंवा वाइनचे सात ग्लास. म्हणजेच दिवसाला दोन पाइंट्स किंवा वाइनचा एखादा ग्लास घेणं हे 'सुरक्षित' आहे असं सरकारनं सांगितलं आहे.

प्रत्येक ग्लासमध्ये किती एकक अल्कोहोलचे प्रमाण असते?

  • वाईनचा मोठा ग्लास - ३ एकक
  • बिअरचा (स्ट्राँग) एक पाईंट किंवा कॅन - ३ एकक
  • वाईनचा मध्यम आकाराचा ग्लास - २ युनिट
  • बिअरचा (माईल्ड) एक पाईंट किंवा कॅन - २ एकक
  • बिअरची बाटली - १.७ एकक
  • स्पिरीटचा एक शॉट - १ एकक

स्रोत - NHS Choices

या घोषणेनंतर इंग्लडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रा. डेम सॅली डेव्हिज यांनी म्हटलं होतं, "मद्याचं सेवन हे कोणत्याही परिस्थितीत अपायकारकच आहे. जरी मद्याचं प्रमाण कमी असलं तरी तुम्हाला रोग उद्भवू शकतात."

"या अभ्यासासाठी अनेक घटकांचा विचार करण्यात आला होता. मद्यविक्री, किती प्रमाणात मद्याचं सेवन केलं हे सांगणारा डेटा, दारू न पिणाऱ्या लोकांचा डेटा, टुरिजम डेटा अशा विविध घटकांना लक्षात घेऊन अभ्यास करण्यात आला. त्यामुळे हे संशोधन महत्त्वपूर्ण आहे," असं सक्सेना सांगतात.

अभ्यास सांगतो की ब्रिटिश महिला ही दिवसाला किमान तीन ड्रिंक्स घेते. जगातल्या सर्वाधिक जास्त ड्रिंक करणाऱ्या देशांच्या यादीत युनायटेड किंगडम मधल्या महिला 8व्या स्थानी आहेत. तर याच यादीत ब्रिटनचे पुरुष हे 62व्या स्थानी आहेत. ते सुद्धा दिवसाला सरासरी 3 ड्रिंक घेतात. मग त्यांच्या आणि महिलांच्या स्थानात इतका फरक का?

कारण इतर देशातील पुरुषांचं ड्रिंक घेण्याचं प्रमाण अधिक असतं. रोमानियातले पुरुष दिवसाला 8 ड्रिंक घेतात.

एका वाइनच्या ग्लासमध्ये 10 ग्राम अल्कोहोल असतं. एका बीअर बॉटलमध्ये 10 ग्राम अल्कोहोल असतं. जर दहा ग्राम अल्कोहोल घेतलं तर एक ड्रिंक घेतलं असं म्हटलं जातं. युकेमध्ये हे प्रमाण प्रति ड्रिंक 8 ग्राम अल्कोहोल इतकं असतं.

जगातल्या प्रत्येक तीन व्यक्तीपैकी एक जण अल्कोहोल घेतो, असं म्हटलं जातं. 15 ते 49 या वयोगटात मृत्युमुखी पडणाऱ्या 10 लोकांपैकी एकाचा मृत्यू हा मद्यपानाशी संबंधित असतो.

"युकेमधले बहुतांश लोक सरकारनं जी सुरक्षित पातळी ठरवली आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात अल्कोहोलचं सेवन करतात. पण गोष्ट अशी आहे की मद्यपानाची सुरक्षित पातळीच नाही.

याबाबत सरकारनं विचार करायला हवा. ही पातळी आणखी कमी करायला हवी. जर तुम्ही ड्रिंक करणार असाल तर त्याबाबत माहिती करून घ्या. धोक्याची जाणीव समजून घेऊन ड्रिंक करा," असं सक्सेना सांगतात.

'सुरक्षित पातळी'बाबत प्रा. डेव्हिड स्पीगेलहाल्टर यांचं वेगळं मत आहे. डेव्हिड हे केंब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक अंडरस्टॅंडिंग ऑफ रिस्क हा विषय शिकवतात.

"संतुलित मद्यपानात आनंद वाटतो. पण खूप मद्यपान केलं तर धोका संभवतो. त्यामुळे अनेक जण सरकारनं जाहीर केलेली सुरक्षित पातळी ओलांडत नाहीत.

या संशोधनातील निष्कर्ष आल्यावर सुरक्षित पातळी आणखी कमी करावी अशी अपेक्षा लोक ठेवत आहेत. ड्रिंकची सुरक्षित पातळी नाही म्हणून सरकारनं लोकांना ड्रिंक सोडावं असं आवाहन करावं अशी अपेक्षा ठेवणं अयोग्य आहे. सरकार तसं म्हणू शकत नाही," डेव्हिड सांगतात.

"ड्रायव्हिंगची नेमकी सुरक्षित पातळी नाही, पण सरकार हे कधी सांगत नाही की ड्रायव्हिंग करू नका. सुरक्षित जगण्याची देखील पातळी नाही म्हणून जगूच नका असं देखील म्हणू शकत नाही."

हेही वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)