Motor Vehicle Act 2019: राज्यात नवीन मोटार वाहन कायद्याला स्थगिती - परिवहन मंत्री, #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. राज्यात नवीन मोटार वाहन कायद्याला स्थगिती - परिवहन मंत्री

नवीन मोटार वाहन कायद्यातील तरतुदींमुळे सामान्य जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे, त्यामुळे या कायद्यातील दंडाच्या तरतुदींबद्दल पुन्हा विचार करावा, असं पत्र महाराष्ट्र सरकारनं केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना लिहिलं आहे. इंडिया टुडेनं ही बातमी दिलीय.

नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया मिळेपर्यंत या कायद्याच्या अंमबलबजाणीस स्थगिती देण्यात आहे, असंही सरकारनं स्पष्ट केलंय.

"या कायद्यान्वये निर्धारित केलेली दंडाची रक्कम खूपच जास्त आहे आणि सामान्य व्यक्ती एवढी रक्कम भरू शकत नाही," असं राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलंय.

दरम्यान, गुजरात, उत्तराखंड आणि कर्नाटक सरकार या कायद्यातील दंडाची रक्कम कमी करणार आहे. याव्यतिरिक्त मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल आणि पंजाब या राज्यांनी या कायद्याला तूर्तास स्थगिती दिली आहे.

2. 'फेसबुक'वर राजकीय पक्षांचा 32 कोटींचा खर्च

राजकीय पक्षांच्या 6 महिन्यांच्या जाहिरात खर्चाचा लेखाजोखा 'फेसबुक'नं प्रसिद्ध केला आहे. देशातील प्रमुख राजकीय पक्षांनी फेसबुक प्रचारासाठी 32 कोटी रुपये खर्च केल्याचं यातून समोर आलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या फेसबुक पेजवर सर्वाधिक 4 कोटी 34 लाखांचा खर्च झाला असून त्यापाठोपाठ काँग्रेसच्या पेजवर 1 कोटी 82 लाखांचा जाहिरात खर्च करण्यात आला आहे.

प्रादेशिक पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं 4 लाख 25 हजार, शिवसेनेनं 4 लाख 63 हजार, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं फेसबुकवरील प्रचारावर एक दमडीही खर्च केलेली नाही.

3. ईडीची चौकशी झाल्यापासून राज ठाकरे कमी बोलतात : अजित पवार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीमार्फत चौकशी करण्यात आल्यापासून ते बोलायचे कमी झाले, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

बारामती मधील सोमेश्वर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

"या प्रकारच्या कितीही गोष्टी त्यांनी माझ्यावर केल्या तरी माझं तोंड बंद होणार नाही, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी चौकशीनंतर दिली होती. मात्र ही चौकशी करण्यात आल्यापासून राज ठाकरे बोलायचे कमी झालं आहेत," असं पवार यांनी म्हटलंय.

सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या नेत्यांना पैशांची आणि विविध चौकशीची भीती दाखवत आहेत, असंही ते म्हणाले.

4. DRDOकडून अ‍ॅन्टी टँक मिसाइलची यशस्वी चाचणी

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) बुधवारी आंध्र प्रदेशच्या कुर्नुलमधील फायरिंग रेंजवरून मॅन पोर्टेबल अ‍ॅन्टी टँक गाइडेड मिसाइलची यशस्वी चाचणी केली आहे. द हिंदूनं ही बातमी दिलीय.

DRDOनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय की, "DRDOनं ही क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली आहे. या क्षेपणास्राला मॅन पोर्टेबल ट्राइपॉड लाँचरद्वारे लाँच केले गेले होते. यानंतर त्यानं त्याचे लक्ष्य अत्यंत अचुकतेनं गाठलं आहे."

5. मोहन भागवत यांच्या ताफ्यातील कारच्या धडकेमुळे एकाचा मृत्यू

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील कारच्या धडकेमुळे एका 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे, तर त्याच्या 66 वर्षांच्या आजोबांना गंभीर दुखापत झाली आहे, इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.

अलवर जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

"माझे भाऊ चेत्राम यादम दवाखान्यातून घरी येत होते. त्यांच्यासोबत त्यांचा 6 वर्षांचा नातू होता. यादरम्यान मोहन भागवत यांच्या ताफ्यातील कारनं त्यांना धडक दिली," असं कर्तार सिंग यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मोहन भागवत यांनी ताफा लगेच थांबवला आणि दोघांना दवाखान्यात पाठवल्यानंतर पुढचा प्रवास सुरू केला, असं RSSनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)