You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'पार्किंगसाठी 23 हजार दंड भरला तर आम्ही रस्त्यावर येऊ'
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मुंबईमध्ये रस्त्यालगत 'नो पार्किंग'मध्ये पार्क केलेल्या गाड्यांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. त्यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने अवैध पार्किंगवर कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे.
मुंबई महापालिका पार्किंग क्षेत्रातील 500 मीटरच्या आवारात असलेल्या 'नो पार्किंग' झोनमध्ये अवैधरीत्या पार्क केलेल्या गाड्यांना किमान 5 ते 23 हजारांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे.
दुचाकी वाहनाला 5 हजार, चारचाकी वाहनाला 10 हजार आणि अवजड वाहनांना 15 हजार रुपये अशी दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
जर दंड भरला नाही तर वाहन 'टोईंग व्हॅनने' उचलून नेलं जाईल आणि दंड भरायला जितके दिवस उशीर होईल तितका तो वाढत वाढत 23 हजारांपर्यंत जाईल.
मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिलेल्या आदेशानुसार 7 जुलैपासून या निर्णयाची पहिल्या टप्यातल्या 23 ठिकाणी ही अंमलबजावणी सुरू केली आहे. या अंमलबजावणीनंतर दोन दिवसांत साडेतीन लाख रूपये इतका दंड महापालिकेकडून वसूल करण्यात आला आहे.
कोणाला किती दंड?
टो करून नेलेल्या वाहनावर 30 दिवसांच्या आत ताबा सांगितला नाही तर ते वाहन लिलावात काढून विकणार असल्याचं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलंय.
दंड भरला तर खाणार काय?
"गेली 25 वर्षे मी मुंबईत टेम्पो चालवतो. माझं महिन्याचं उत्पन्न 10 हजारांच्या खाली आहे. त्यात मी कसंबसं घर चालवतो. आता मला 23 हजार दंड लावला तर मी कुठून भरू? माझं दोन महिन्याचंही उत्पन्नही 23 हजार नाही." वरळीला रहाणार्या किशोर शेलार यांचे हे शब्द आहेत. उत्पन्नापेक्षा जास्त दंड भरायचा म्हणजे आम्हाला कुटुंबासहित रस्त्यावर येण्याची वेळ येईल, असं ते म्हणतात.
परळच्या एसआरए इमारतीत राहणारे चेतन मस्के सांगतात, "मी गेली अनेक वर्षे या भागात शेअर टॅक्सी चालवतो. एका सीटचे 10 रूपये. दिवसभरात किती धंदा होत असेल याचा विचार तुम्हीच करा. पण जर उद्या चुकून जरी हा दंड लागला तर एक महिना माझं घर चालणार नाही. आम्हाला पार्किंगची सुविधा करून द्या मग आम्ही कुठेही गाडी पार्क करणार नाही."
वरळी बीडीडी चाळीत राहणारे दिलीप राऊत सांगतात, "हा सर्वसामान्य माणसांना वेठीला धरण्याचा प्रयत्न आहे. हेच का अच्छे दिन? माझी बाईक आहे. बाईकला 5 हजार फाईन आहे. एकदम पाच हजार सामान्य माणूस भरू शकतो का? बीएमसीने आधी रस्ते नीट करावेत. सगळीकडे पार्किंग उपलब्ध करावी मग असे निर्णय घ्यावे."
रस्त्यांवरच्या खड्यांचं काय?
"अवैध पार्किंगविरोधात नक्कीच पावलं उचलली पाहिजेत. पण त्याआधी लोकांनाही विश्वासात घेणं गरजेचं आहे. सर्वप्रथम लोकांना पार्किंग उपलब्ध करून द्या, मग जी कारवाई करायची आहे ती करा," असं मत मुंबई महापालिकेचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी व्यक्त केलंय.
"10 हजार आणि 15 हजार ही काही छोटी रक्कम नाही. दुचाकी वाहन चालवणारे एकावेळी पाच हजार दंड भरू शकतात का? याचा विचार का केला गेला नाही. हा मुद्दा सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत चर्चेलाही आणला गेला नाही. हा मनमानी पध्दतीने घेतलेला निर्णय आहे. जे लोकं गाड्या चालवतात ते रोड टॅक्स भरतात. त्यांना खड्डेमुक्त रस्ते हे देऊ शकत नाहीत आणि इतका दंड भरायला लावणं हे सामान्यांना वेठीस धरणं आहे. याचा आम्ही विरोध करतो."
अवैध पार्किंगमुळे रस्त्यावर वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. लोकांना चालताना त्रास होतो त्यासाठी हा निर्णय घेतलाय. पण जर खरच सामान्य लोकांना याचा त्रास होत असेल तर आम्ही या निर्णयाचा पुर्नविचार करू असं शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी याविषयी बोलताना म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)