हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरमधून भाजपच्या उमेदवारीचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश झाला.

'आजचा दिवस ऐतिहासिक आहे. माझ्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ताकद दिली,' असं हर्षवर्धन पाटील यांनी प्रवेशावेळी म्हटलं.

प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामांची स्तुती केली.

"गेल्या पाच वर्षांपासून आम्ही हर्षवर्धन यांचा प्रवेश केव्हा होईल याकडे डोळे लावून बसलो होतो. त्यांचं भाजपमध्ये स्वागत करत आहे," असं मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळेस म्हटलं.

हर्षवर्धन पाटील यांनी अनेक मुख्यमंत्र्यांसाठी बुलेटप्रुफ जॅकेट म्हणून काम केल्याचंही फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.

हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरमधून भाजपकडून उमेदवारी मिळेल, असे संकेत यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी दिले.

जनतेनं आग्रह केला म्हणून मी हा निर्णय घेतल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलंय.

"मी 23 एप्रिल पासून राष्ट्रवादी काँग्रेसशी बोलत होतो, लोकसभेला आम्ही त्याचं काम केलं होतं, विधानसभेला त्यांनी जागा सोडायचा शब्द द्यायचा होता, वेगळं काय बोलणं करायचं होतं? मला वाटतं की त्यांना जागा सोडायची नव्हती, आमच्याही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी जागा भांडून घ्यायला पाहिजे होती, तिथं आमचेही काही नेते मागे पडले असं मला वाटतं. त्यामुळे आता तो विषय संपला आहे," असं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं आहे.

नेते पक्ष का साडून चालले आहे याचा विचार पक्षाच्या प्रमुखांनी करावा असा टोलाही हर्षवर्धन यांनी हाणला आहे.

'पुणे भाजपचा मोठा चेहरा ठरतील'

प्रवेशानंतर भाजप हर्षवर्धन पाटलांना पुणे जिल्ह्यातला मोठा चेहरा म्हणून समोर करण्याची शक्यता असल्याचं मत राजकीय विश्लेषक संजय मिस्कीन व्यक्त करतात.

ते सांगतात, "हर्षवर्धन पाटलांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात भाजपला पवारांच्या विरोधातला एक मोठा मराठा चेहरा मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाचं पुण्यात मोठं स्थान आहे. आमदारही जास्त आहेत. पण ते आपापल्या मतदारसंघापुरते मर्यादीत आहेत."

विशेषतः पवारांच्या विरोधातील राजकारणासाठी हर्षवर्धन पाटील यांचा वापर भाजप करून घेऊ शकतो. जिल्ह्याच्या राजकारणात भाजप त्यांना मोठ्या प्रमाणात पाठबळ देईल. कदाचित त्यांना मंत्रिपदाची संधीही दिली जाऊ शकते, असा अंदाज मिस्कीन यांनी व्यक्त केला.

स्वत: हर्षवर्धन पाटलांनी इंदापुरातल्या मेळाव्यात सांगितलं होतं की, लोकसभा निवडणुकीवेळीच देवेंद्र फडणवीसांनी त्यांना भाजपकडून बारामती लोकसभा लढवण्यास सांगितलं होतं.

त्यामुळं 'मिशन बारामती' सर करण्यासाठी भाजप हर्षवर्धन पाटलांचा वापर करू शकते, असा अनेकांचा अंदाज आहे.

भाजपमध्ये आतापर्यंत दाखल झालेले नेते

  • रणजितसिंह मोहिते पाटील
  • शिवेंद्रराजे भोसले
  • वैभव पिचड
  • मधुकर पिचड
  • राणा जगजितसिंह पाटील
  • सुजय विखे पाटील
  • राधाकृष्ण विखे पाटील
  • कालिदास कोळंबकर
  • जयकुमार गोरे
  • धनंजय महाडीक
  • चित्रा वाघ
  • सागर नाईक

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)